Tuesday, April 30, 2013

प्रेम.. शब्द एक, पण

प्रेम.. शब्द एक, पण व्यक्त व्हायच्या पद्धती, प्रकार, देहबोली, शब्दकळा अनेक.. कविश्रेष्ठ, ज्ञानपीठ-पुरस्कार प्राप्तकर्ते कुसुमाग्रज त्यांच्या, ’प्रेम कुणावर कराव.’ या गाजलेल्या कवितेंत म्हणतांत त्याप्रमाणे, ’ज्याला तारायचं त्याच्यावर तर करांवच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं.. प्रेम कुणावरही करावं..’ संपूर्ण कविता तर प्रेमाची महती सांगतेच पण त्यांतल्या या एका ओळींत, कविवर्यांवी, केवढा मोठा ’भाव-प्रदेश’ कवळलाय्‌ ? या कवितेच्या अंतिम चरणांमधे तर कुसुमाग्रजांनी ’प्रेम-भावनेचं अधिष्ठानच प्रस्थापित केलय्‌ ! ते म्हणतांत, कारण, प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि.. भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा.. ऎकमेव..... आणि खरच, तस बधितलं तर प्रेम-भावनाच निसर्गानं माणसाला बहाल केली नसती तर ? द्वेष, मत्सर, हेवेदावे, भांडणं यांचा जन्म झालां असतां ? या प्रत्येक भावाचं उगमस्थान म्हणून प्रेमाकडे पाहायला गेलं तर, उदाहरणं, दृष्टांत, रुपक लिहितालिगिता एकेक दीर्घ निबंध होईल.. पन मनाला एक बौद्धिक चाला म्हणुन करून बघा ! गंमत म्हणून.. तर असं हे, सर्वपरिचित, सामान्य अर्थानं जगण्याच्या एका हळव्या वळणावर भेटणारं प्रेम..त्याच्या आगमनाच वर्णन, आमचे कविराज मित्र इतकं छान करतांत.. ते म्हणतांत दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित सोनेरी ऊन येत तसच कांहीस..पाउल न वाजवता आयुष्य़ांत प्रेम येतं... सुधीर मोघेंची ही १९७७ साली ताजीताजी असलेली कविता, मी आजचे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार आनंद मोडककडनं स्वरबद्ध करून घेतलिव्‌ती आणि युवदर्शनच्या गीतसंध्या कार्यक्रमांत सादर केलिव्‌ती ! मराठी पॉप्‌ या शीर्षकांतर्गत. नंदू भेंडेनं ती गायली होती इतकी उत्कटपणे.. क्या केहेने.. आतां या प्रेमानं, अत्यंत प्रेम पूर्वक धमन्यांम्धे प्रवेश केल्यावर मग ’प्रेम-पात्रा’चं प्रणयाराधन.. त्यासाठी आजकाल CCD, तसं त्याकाळी एकांतस्थळं शोधणं होत असे.. शांताबाई शेलक्यांच्या शेलक्या रचनांमधली ही रचना तोच चंद्रमा नभांत तीच चैत्र यामिनी ’एकान्ती’ मजसमीप तीच तूहि कामिनी चैत्र.. वसंतसखा चैत्र.. चित्तवृत्ती खुलवणारा-फुलवणारा, चेतवणारा चैत्र..तापल्या उन्हाच्या कांहिलीला सामोर जातांना, बृक्षांच्या शाखांतून उसळणारा स्राव दृश्यमान करणारा आणि निसर्गाचा हा आगळावेगळा मत्तगंध आभाळांत उधळणारा चैत्र..त्यांतली रात्र.. कधी हिंदलाय्‌त अशा रात्री ? किंबा सागरकिनारीच्या, पुळणीवरच्या प्रणयरम्य घटिका सरल्यानंतर.. बा.भ. बोरकरांच्या शब्दांत विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेलं ओसरल्यावर आपण सजणे, अशीचं ओलं उरेलं एक जलधिसान्निध्यांत वाढला पोसलेला कवी, किती सहजपणे आपल्या रोजच्या सृष्टींतलं रूपक.. सागर-कल्लोळ.. कल्लोळ म्हणजे लाट.. आणि किनारा यांचं.. देवून जातो पहा.. सग्ग्ग्गळ अगदी तस्सतस्से असतं की नाही ? पण याचं, अगदी समीप आलेल्या प्रमपात्रानं, नायकाचं प्रम अव्हेरलं, किंवा ती, कदाचित तिच्या मनाविरुद्ध, ’दुसर्‍या कुणाची झाली तर.. मग ? दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले थबकले न पाय जरी, हृदय मात्र थांबले.. बेशीपाशी, उदास हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली सुरेश भटांचा शेर आणि सुधीर मोघ्यांनी स्वरावलेला आणि, श्रीकांत पांरगांवकरच्या सुरांनी भारावलेला...१९८१.. रंग माझा वेगळा, कार्यक्रमाची सुरुवात.. आतां या प्रेमाची परिणिती विवाह बंधनांत झाल्यावर, अर्थातच नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर, अहं त्याच्या आधीच, ताज्याताज्या नवरदेवांवर ’प्रसंग’ गुदरतांत, आधी किरकोळ कारणानं रुसवे-फुगवे, धुसफुस, अश्रुपात, आणि मग मनधरणी.. कशि तुज समजाउ सांग कां भामिनि धरिशि राग बाकिबाबांच्या संस्कृतोद्भव शब्दकळेनं सजलेली ही कविता... ज्याचं बुवांनी..पंडित अभिषेकींनी शुद्ध कल्याण रागांत बांधलेलं, एक अप्रतिम गीत करून गायलय्‌... ती कविता या प्रेम प्रदेशांतल्या एका अवघड वळणाचं.. घडता घडता बिघडलेलं आणि बिघाडावर शरणागतीची धाड घालून, पुनर्घडण करू पाहाणार्‍या परिश्रमांचं.. यथार्थ दर्शन घडविते. याचं शृंगारकाला दरम्यान, म्यान केलेल्या कुरबुरी लपवत आणखी एक शरणागती.. मानापमान नाटकांतली प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मला, मीचं चुरीनं चरणं, दास हो मी तुझा कृष्णाजी प्रभाकर खाडिलेकरांनी, १९११ मधे लिहिलेल्या संगीत मानापमान या नाटकांतलं, मास्टर दीनानाथांनी संगीतबद्ध करून, गाऊन 'Once more' घेत, लोकप्रिय केलेलं हे पद. याची मूळ चाल गोविंदराव टेंब्यांची तितकीच श्रवणीय.. आणि मग रागेजल्या भामिनीला आवरतांना पतिराजांची तारांबळ.. अशीच, प्रेमाचा आणखी एक आयाम धसमुसळ प्रेम, दर्शविणार्‍या पदांत नच सुंदरि करु कोपा. मजवरि धरि अनुकंपा कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला धरुनीया केसाला दंतव्रण करि गाला.. हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा.. अरे काय प्रेम की मारामारी ? हो, मारामारीचं पण प्रेमोद्भव.. तर, अशा या प्रमाचं व्यक्त होण्याच्या कांही नमुने तुमच्यासमोर मांडतांना मजा आला मला. पण अजून आपण या युगुल-प्रेमाच्या टप्प्यापर्यंतच पोहोचलो आहोंत, हे लक्षांत आलय कां तुमच्या ? अजून त्याला परिणामोत्तर, तिसरा आयाम प्राप्त व्हायचाय.. त्यानंतर हा प्रेम प्रवाह कुठल्याकुठल्या उताराकडं धावतो ते पुढच्या भागांत पाहू.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment