Sunday, August 17, 2014

कांही स्वरचित रुबाया

हे मद्य नव्हे मस्तवाल अबलख वारू मोहास सांग या कुठल्यामार्गे वारू वारुणी घेतली म्हणुन न सोडिन ताळ कां करिल क्षमा मज स'माज'बुद्धी बाळ ? मी क्षुल्लक ! माझे नसलेपण अस्तीत्व कापूरआरती, कर्पूरा दिव्यत्व मृत्त्यू न झडकरी कां कवळे मज आता ? चालणार कुठवर क्षेमखुशाली कथा ? विसविशीत वाटा, काटे तळि दडलेले शिव सत्य नि सुंदर घायाळुन पडलेले पिउनी काळोखा होइन म्हणतो काळा घट बुडे,दीपकळि निवली ,समीप वेळा ही कसली गर्दी ? झुंडी धावत येती चिंतातुर नजरा,काय 'बरे' शोधित ? पांगले हळुहळु चेहरे हिरमुसलेले कुणी 'नामचीन' ? बेवारस कुत्रे मेले घट तुटती फुटती रिते, कधी भरलेले ज्यां त्यां नशिबी पण 'घट कुठला ?' ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे

No comments:

Post a Comment