Thursday, August 14, 2014

।।दासबोध।। आणि ।।भासबोध।। ओवर १०३ ते १२१

।। दास-वाणी ।। तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्व ब्रह्म म्हणोन बैसला । माहांपापी आणि भला । येकचि मानी ।। ।। जय जय रधुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२५ ब्रह्म म्हणजे काय हे अभ्यासपूर्वक ग्रंथामधून समजून घेतले परंतु आत्मानुभव नसल्याने आत्मरूपाविषयी अज्ञानी ठरला. कीर्तनात सांगुन टाकले सर्व काही ब्रह्मरूप च आहे. अत्यंत दुष्ट पापी मनुष्य आणि संत एकरूप माना ! सामान्यांना हे पटेल का ? आपल्याला नीट समजलेला मुद्दाच कीर्तनात मांडावा. भक्तांमधे ईश्वराविषयी भ्रम निर्माण होऊ नये. तैसे मनुष्य सगळे सारखे । येरे गबाळे चतुर प्रकार अनेके । जैसा वारा तैसे वाके । तृणमात्र ।। १०३ ईश्वर मनी कोंबू नये । निर्मळासि झोंबू नये । उपदेशसीमा लंघू नये । आत्मप्रौढीने ।। १०४ ।। दास-वाणी ।। पाहो जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी । तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौन वदवावी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०४/०९ तसे पाहिले तर या जगामधे अनेक जाती धर्म पंथांचे वेगवेगळे देव मानले जातात. अशा दैवतांची संख्या अगणित आहे. त्यांचे आराधना मंत्र सुद्धा लक्षावधी असतील. मानवाने रोज वेगवेगळे मंत्र म्हणून उपासना करू नये.सर्व दैवते समान मानून एक देव, एक मंत्र या मार्गाने भक्ती केल्यास अधिक लाभ होईल. नामस्मरण, आराधना । साहित्यवृध्दीची अखंड चेतना । ओवी, अभंग, मंत्राविना । ग्रंथभाषा अपूर्ण ।। १०५ झुंजुरका कधि येते सय । आप्त-स्वकीय, बाप, माय । ढवळूनि मनाचा ठाय । दहिवर दाटे डोळ्यांत ।। १०६ ।। दास-वाणी ।। नाना आसने उपकर्णे । वस्त्रें आळंकार भूषणें । मानसपूजा मूर्तिध्याने । या नांव पांचवी भक्ती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/०३ भगवंताच्या मूर्तीला, जो मुळातच ऐश्वर्यसंपन्न आहे त्याला, आपल्या ऐपतीनुसार उत्तम आसन, उत्तम धातूची पूजेची उपकरणे, रेशमी वस्त्रे, उंची दागदागिने अर्पण करावेत. अशा रूपामधील तो परमेश्वर आपल्यासमोर साक्षात उभाच आहे अशा उत्कट भावाने त्या मूर्तीचे ध्यान करावे. ही पाचवी अर्चन भक्ती. कसबी निपुण मूर्तिकार । आभूषणे वस्रालंकार । सजविण्या प्रस्तर निराकार । कोरिती छिन्नि-हातोड्यांनी ।। १०७ त्यास ना धर्म, संप्रदाय । कारागिरी हेचि कार्य । भाकरीसाठी अखंड भय । टोचतसे उदरांत ।। १०८ ओवी चालत राहील अखंड । शब्द-भाव ओवीत स्वच्छंद । कांटेकोर पाळीत निर्बंध । वैयाकरणींचे ।। १०९ ।। दास-वाणी ।। नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे । नमस्कारास कांहीच नलगे । उपकर्ण सामग्री ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०६/२२ साध्या नमस्काराला एक दमडीचा खर्च नाही. नमस्कार केल्याने शरीराला कष्ट म्हणाल तर अजिबात नाही. पूजासाहित्य, नैवेद्य अशी कुठलीही गोष्ट आवश्यक नाही. तरीही संपूर्ण पुण्य या वंदन भक्तीने प्राप्त होते. कर्ज काढून केलेल्या उत्सवापेक्षा निर्मळ मन:पूर्वक केलेला नमस्कार अधिक श्रेष्ठ अन् लाभदायक सुद्धा ! नमस्कार अष्टांग असावा । पदस्पर्शे ऊर्जास्रोत व्हावा । नमस्कारे योग सराव करावा । नित्यनेमाने ।। ११० नमस्काराने प्रसन्नचित्त । होती सहसा अभ्यागत । सभेची चर्या क्षणार्धांत । आशंकाविरहित होतसे ।। १११ दोन हस्तक, एक मस्तक । सामुग्री इतुकीच आवश्यक । धूप-दीप गंधपुष्पादिक । अवडंबर, तुम्हि जाणा ।। ११२ पाहूनी स्वराज्याची दैना । दासामनी दु:ख माईना । धारण करी आज मौना । खंतावुनी ।। ११३ देहवृक्षाच्या शाखा-फुले- फळे-पर्ण । मरणोत्तर करावे स्वेच्छादान । स्मग निरिच्छपणे मोकळून । मातींशी व्हावे एकजीव ।। ११४ जितेपणी राखा भान । अंतरी रुजवा विज्ञान । 'मृत्यूपश्चात' वगैरे जीवन?। भ्रम यापरता कोणता ? ।। ११५ म्हणे 'आत्मा' जाणावा-पाहावा । पिंड 'त्यासि' नेमाने. भरवावा । भाकडकथांचा काक-सांगावा । झटकुनि फेंका लोकहो ।। ११६ ।। दास-वाणी ।। छप्पन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुन वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/३१ जगामधे शेकडो भाषांमधे हजारो ग्रंथ पारमार्थिक उन्नतीसाठी लिहिलेले आढळतात. त्या सर्वांमधुन परमेश्वराचे जे सत्यरूप आहे तेच वेगवेगळया उदाहरणांतून सांगितले आहे. एकं सत् विप्रा बहुधा वदंति । हे समजून घेतले तर वितंडवाद थांबतील. सुसंवाद वाढेल. संवादार्थ बोलीभाषा । उपदेशार्थ ग्रंथभाषा । प्रणय-प्रेमार्थ स्पर्शभाषा । प्रमाणभूत विश्वांत ।। ११७ अश्रू ! भाषा सुख-दु:खाची । शीर्षशूळ ! संताप-क्रोधाची । भावमुद्रा ! नृत्याभिनयाची । नि:शब्द, सर्वमान्य ।। ११८ ईश्वर कैसा असेल नश्वर । पंचमहाभूती तो तर स्थिर । ज्ञानेंद्रियांना देतो साक्षात्कार । क्षणोक्षणी अखंड ।। ११९ धूप-दीप, फळ-पुष्पे सगळी । बांग, शंखध्वनि वा टाळी । नश्वराची गोतावळी । बांडगुळे आगंतुक ।। १२० ऐशा नश्वरांची मांदियाळी माजली सकळ धरातळी । मागे जनता भाबडी, भोळी । धापा टाकित धावताहे ।। १२१

No comments:

Post a Comment