Friday, August 29, 2014

।। दास-बोध ।। आणि ।। भास-बोध ।। १३१ ते १५५

।। दास-वाणी ।। प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४६ प्रज्ञा म्हणजे वैचारिक प्रगल्भ बुद्धी. अनन्य म्हणजे एकनिष्ठ. साधक निष्ठावान आणि प्रज्ञावंत असेल तर ज्ञानप्राप्ती एका क्षणात होते. पण भक्तिभावाशिवाय फक्त प्रज्ञा त्या टप्प्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. सत् शिष्य कसा असावा ते समर्थ सांगताहेत. मेधा, प्रज्ञा, बुध्दीचे द्वार । सहजसाध्य करिते ज्ञानसागर । काठोकाठ अपरंपार । वोसंडुनि वाहावया ।। १३१ तरि अंतरी उत्कंठा, तृषा । तळमळ, शुध्द अभिलाषा । साधकाचे ठाई सहसा । व्हावी दृश्यमान ।। १३२ गुरु वात्सल्याचा झरा । गुरु, दीपस्तंभ एकमेव आधारा । गुरु, भेदतो तमाच्या परा । तेजोनिधी दाविण्या ।। १३३ ।। दास-वाणी ।। सूकर पूजिले विलेपने । म्हैसा मर्दिला चंदने । तैसा विषयी ब्रह्मज्ञाने । विवेके बोधला ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५८ डुकराची पूजा अंगभर सुवासिक द्रव्ये चोपडून केली तरी पुढच्या क्षणात ते उकिरडयावर लोळणार. रेडयाचे चंदन लावून शरीर रगडले तरी तो शेणातच बसणार. त्याचप्रमाणे छानछोकी ऐषारामाची आवड असलेल्या विषयासक्त शिष्याला ब्रह्मज्ञानाचा विवेक कितीही समजावला तरी मूळ चैनीची वृत्ती बदलेल काय ? शिष्य कसा नसावा हे शिष्यलक्षण समासात समर्थांनी सांगितलय. विकृतिला ना जातपात । पशु-पक्षी-मानव सर्वांत । लक्षणे दावी सतत । अतिरेकी ।। १३४ सुकर-म्हैस, यक्ष-राक्षस । कुणास चुकला मद-मोह-पाश। ऐशा जीवमात्रास । हेटाळावे कां कुणी ।। १३५ शिष्य, ब-या-वाइटासहित । स्वीकार करावा गुरुगृहांत । धरुन हात हातांत । गुरुने न्यावे सन्मार्गी ।। १३६ ।। दास-वाणी ।। धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी । मनने अर्थांतर काढी । या नाव साधक ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/०५ अध्यात्मिक ग्रंथांचे नियमित वाचन, श्रवण, कीर्तन आवडीने करतो. अद्वैत निरूपण जेथे सुरू असेल तेथे मनापासून रोज जातो. शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐकतो. स्वत: घरी गेल्यावर ऐकलेल्या सिद्धांतांवर मनन चितन करतो. त्या तत्त्वांचा गूढ अर्थ शोधून काढून जो साधनमार्गावर चालत राहातो तो खरा साधक ! गाज सागराची अव्याहत । खर्ज निसर्गाचा, श्रवण तृप्त । नारळी पोफळी करिती स्वागत । पावले भरून अंतर्बाह्य चक्षू ।। १३७ जळावरी जळ लोळे । आत्म जाणिवेंत अंतर कल्लोळे । जैसी भरती-ओहोटी चंद्रबळे । निसर्गचक्रांत ।। १३८ चित्तवृत्ती आनंद विभोर । सुखविण्या क्षणेक्षणि अपार । विविध सेवा, साधने तत्पर । हाच इथला 'वारसा' ।। १३९ छाये मागचे चित्र । वेगळेचि बहुधा सर्वत्र । थरारती अंतर्बाह्य गात्र । ठाके जेंव्हा सत्य उभे ।। १४० ।। दास-वाणी ।। ज्ञानियांचे जे शेरीर । ते मिथ्यत्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/१० सामान्य माणूस धर्मक्षेत्री मरण आले तर आत्म्याला उत्तम गति आहे असे मानतो. साधुपुरूष साधना करून ब्रह्मज्ञानप्राप्त असल्याने देह मिथ्या आहे या भावात जीवनभर राहतात. मिथ्या म्हणजे जे सत्य नाही तरी भासते ते. अशा निर्विकार साधूंना ज्या ठिकाणी मृत्यू येतो ती जागाच तीर्थक्षेत्र बनते. पुढील कित्येक काळ ती सामान्यजनांना प्रेरणादायक अन् साधकांना मोक्षदायक ठरते. 'आत्मा', 'गती', 'मोक्ष' । अतर्क्य अंधश्रध्दांचे लक्ष । अदृश्यासि ठवोनि साक्ष । भोंदू', 'भामटे' बरळती ।। १४१ ।। दास-वाणी ।। तळघरामधे उदंड द्रव्य । भिंतीमधे घातले द्रव्य । स्तंभी तुळवटी द्रव्य । आपण मधें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/२१ पूर्वजांनी घराच्या तळघरात, जाड भिंतींच्या पोकळीमधे, खांबामधे आणि तुळई मधे जागोजागी अमाप संपत्ती भावी पिढीसाठी जपुन ठेवलीय परंतु हे माहीतच नसल्याने हलाखीत दिवस काढतोय. त्याचप्रमाणे परब्रह्म आपल्या चारी दिशांना कोंदाटले असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. अज्ञानापोटी ओढवुन घेतलेले हे पारमार्थिक दारिद्र्यच नव्हे काय ? अवघा निसर्ग धनभारित । जीवमात्र सारा ऋणाइत । आपल्याचि कर्माचे फलित । कु-हाड घाली पायावरी ।। १४२ 'ये रे बाळा' म्हणे काळी आई । परंतु माजली 'इमलेशाही' । वपन करुनी वृक्षवल्ली, वनराई । कुठे फेडतिल ही पापे ? ।। १४३ समोरचे सुवर्णपात्र । अव्हेरित मनुष्यमात्र । कथिला देउनि मानपत्र । डोहाळे जाणा भिकेचे ।। १४४ ।। दास-वाणी ।। इकडे दृश्य तिकडे देव । मध्ये सुन्यत्वाचा ठाव । तयास मंदबुद्धीस्तव । प्राणी ब्रह्म म्हणे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/१०/६६ दृश्य म्हणजे जे इंद्रियांद्वारा समजते, उपभोगता येते ते. निर्गुणाच्या साधनेला लागल्यावर एक एक गोष्ट निरसन करता करता शून्यावस्था प्राप्त होते. यापलीकडे खरा आत्मदेव असतो. साधक अज्ञानाने शून्यावस्थेलाच ब्रह्म मानतो. हे मानणे सुद्धा जिथे संपते ती ब्रह्मस्थिती . इंद्रीया जाणवे तेचि खरे । अदृश्याचे वर्णन, अंदाज सारे । 'कालापव्ययी' व्यर्थ पसारे । निरुद्योगी मांडिती ।। १४५ शिशु, वृध्द, ऋग्ण, गर्भवती । कर्मकांडापासून यांना मुक्ती । कठोर धर्मंार्तंडही देती । हे ही नसे थोडके ।। १४६ हृदयस्थ माया-ममतेची निगराणी । सत्य-शिव-सुंदरदर्शने पांपणींत पाणी । 'माणुसकी' धर्माचरणी । हेचि पाळू व्रत ।। १४७ जपू झरा, धरा, तारा । भवतीचा संपन्न निसर्गपिसारा । हव्यास, आक्रोशापरता बरा । उपकारक सर्वदा ।। १४८ ।। दास-वाणी ।। कैचे घर कैचा संसार । कायसा करिसी जोजार । जन्मभर वाहोन भार । सेखीं सांडून जासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/१०/४८ काय माझे घर घर, माझा प्रपंच, माझी माणसे करत बसला आहेस. स्थावर जंगम मालमत्ता जन्मभर सांभाळण्याचा कुटाणा चालू आहे तुझा. ओझी वाहिलीस आयुष्यभर. शेवट काय होणार ? हे साठवलेले सगळे इथेच टाकून तू एकटा मृत्यपंथाने निघून जाशील, तुला कळणार देखील नाही. वैराग्य निरूपण समासात समर्थ व्यावहारिक गोष्टीची मर्यादा स्पष्ट करतात. मग जन्मास यावेचि कां बा ? । जर संसाराची साहेना आभा । अर्ध्यावर रडगाण्याची मुभा । पळपुट्याचे लक्षण ।। १४९ जन्म ? तमांतरि तेजोरेखा । जन्म ? नियतीस, खेळण्या सारखा । जन्म ? सर्वांगपरिपूर्णतेस पारखा । जाणा जीवमात्रांस ।। १५० ।। दास-वाणी ।। जयास जैसें भासले । तेणें तैसें कवित्व केलें । परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०५/२३ पिंड ब्रह्मांड रचनेविषयी ज्याला ज्या प्रकारे भासले, समजले त्या तशा शब्दात कवीने वर्णन केले आहेे. मुळात वेदानाही जे अवर्णनीय वाटते त्या निर्गुण ब्रह्माचे अनेकांनी केलेले आकलन हे स्वानुभवाच्या कसौटीवर निवडूनच घेतले पाहिजे. जाणिव म्हणजे खरे ज्ञान । सशब्द अथवा निरव कारण । जगरहाटीसाठी पैरण । चिलखती ।। १५१ जैसे भावेल तैसे ध्यावे । त्यंस मांडोनि भजा-पुजावे । आळवावे, गोडवे गावे । इष्टाराध्याचे ।। १५२ हा ऐसा शब्द-प्रवाहो । त्रिकाळ पसरुनी आपुले बाहो । कवळू पाहे 'अपात्र' कां हो । नवलचि, मजसारखे ।। १५३ ना तत्ववेत्ता, ना मी संत । भाव धारण करुनी मनांत । उर्जा फुंकू पाहातो शरीरांत । जगण्यासाठी अवसान ।। १५४ शिरावर कां बा मग हे ओझे । पाप, पुण्य ? कोणत्या काजे ? । कवळ केवळ जे माझे । नियती कां दइना ? ।। १५५

No comments:

Post a Comment