Wednesday, August 20, 2014

।। दास-बोध ।। आणि ।। भास-बोध ।। १२२ ते १३०

वृध्दाप्रती मार्दव । बालांप्रती लाघव । प्रणयाराधनी आर्जव । संवादांत बाणवावे ।। १२२ स्पर्धेमधे प्रभुत्व । कार्यामधे ममत्व । धनसंचयोत्तरी दातृत्व । रुजवू, फुलवू अखंड ।। १२३ ।। दास-वाणी ।। श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अति तत्पर गुरूभजनी । सिद्ध साधु आणी संतजनी । गुरूदास्य केलें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०१/ ४२ रामाने वसिष्ठ ऋषी अन् श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींची शिष्य भावाने भक्ती आणि दास्य भावाने सेवा केली, मगच त्यांना ब्रह्मचर्याश्रमात सर्व विद्या प्राप्त झाल्या. अनेक सिद्धपुरूष, साधुसंताना सुद्धा ज्ञानप्राप्ती गुरूचरणांच्या सेवेनेच झालीय. देवांच्या अवतारांना सुद्धा गुरूशिवाय तरणोपाय नाहीच. गुरूनिश्चय समासात श्रीगुरूची महती समर्थ सांगताहेत. गुरु हवाच मार्ग दावण्या । गुरु हवाच संकटांत सावरण्या । सैरभैर मन होते गुरुकृपेविणा । भवसागरी बुडताना ।। १२४ गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा । गुरु वारी शिष्याच्या आपदा । गुरु वेदांच्या वेदा । निरूपतसे ।। १२५ नका मला म्हणू 'स्वामी' । सुख-दु:ख, जीवनानुभवी । नाही भरीत वृथा चरवी । उपदेशाच्या क्षीराने ।। १२६ मी साधा सरळ सामान्य । पोटार्थी कारसेवक मनी धन्य । तारावयास नाही अन्य । येत सहसा नसे कुणी ।। १२७ ।। दास-वाणी ।। शिष्य विकल्पें रान घेतो । गुरू मागें मागें धावतो । विचार पाहों जाता तो । विकल्पचि अवघा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०७/०७ अनधिकारी मूर्ख शिष्य अध्ययन साधना न करता शंकांचा भडिमार करतो आणि गुरू मठाला मिळत असलेल्या भल्या मोठया देणगीच्या लोभापायी बाबापुता करत शिष्याच्या मागे मागे धावतो. विचार केला तर गुरू कोण आणि शिष्य कोण असा संभ्रम निर्माण होतो. अशा दांभिक गुरूंमुळे सामान्यजनामधे परमार्थाविषयीच संशय निर्माण होतो. श्रद्धा घटते. दांभिक, ढोंग्यांचे माजले रानं । अपप्रवृत्तीने होती बेभानं । गुरु कोणं कळेना शिष्य कोण । माळेचे मणि एका ।। १२८ धावले पाहिजे शिष्याने । गुरुमागे असोशीने । ग्रथगुह्य, संस्कार ज्ञानाने । पूर्णत्वप्राप्ती साधावया ।। १२९ साधना साधकाचे ध्येय । गुरुमुखांतुन उलगडते प्रेय । धना साठी इतर पर्याय । तद्नंतर अनेक ।। १३० Uu

No comments:

Post a Comment