Thursday, September 18, 2014

भासबोध १८४ ते २१२

।। दास-वाणी ।। संकल्प विकल्प तें चि मन । जेणेकरिता अनुमान । पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०८/०६ अंत:करणातील एक कप्पा म्हणजे मन.ते संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प म्हणजे एक निश्चय. विकल्प म्हणजे त्याला पर्याय. मन निश्चित निर्णयाला कधी पोचत नाही. दोलायमान, अस्थिर, चंचलता ही मनाची वैशिष्टये. अनुमान म्हणजे तर्क. मनाचेच कार्य आहे ते. तो कुतर्कही असू शकतो. होय नाही, हे का ते , असे का तसे या गोधळातून मनाला बाहेर काढते ती बुद्धी. अंत:करणाचाच पुढचा कप्पा. ती निश्चयात्मक आणि निर्णायक असते. बुद्धीच्या ताब्यात मन असणे अत्यावश्यक. अंत:करण, मन, बुध्दी । त्रिस्तरीय विचारशुध्दी । अवलंबीतो तो बोधी । लौकिकार्थी, शहाणा ।। १८४ संकल्प, विकल्प मिशें । मन होई वेडेपिसे । बुध्दी, चातुर्याच्या पाशे । सोडवी गुंता ।। १८५ ।। दास-वाणी ।। शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला । लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०२/२३ शास्त्रग्रंथ म्हणजे धार्मिक रीतिरिवाज सांगणारी अधिकारी पुस्तके. अनेक पंथ संप्रदायांनी स्वत:च स्वतंत्र शास्त्रे निर्मिली. त्यांचा बाजार भरवला. सामान्य भक्तांना आकर्षित करण्यासाठी एकाच मुख्य देवाचे अनेक प्रकार निर्माण झाले. अमुक देवच नवसाला पावतो अशा हेतुपुरस्पर वावडया उठल्या. असहाय्य प्रापंचिक अडचणीनी पिचलेले लोक सकाम व्रतवैकल्ये हिरहिरीने करू लागले. धर्माचा मूळ शुद्ध निष्काम उपासनेचा विचार मागे पडला. पूजा, आरती, श्रध्दा असावी निरपेक्ष । जैसे मातेचे निगराणीकडे लक्ष । वृथा कर्मकांड टाळण्या दक्ष । असावे भक्तांनी ।। १८६ शास्त्रे केवळ मार्गदर्शी । प्रभाव जाणावा पूर्वलक्षी । अतिरेकी जपा-तपासी । दूर ठेवावे।। १८७ भूत, प्रेत, हडळ-संमंध सहवासांत । प्रतिष्ठापिले स्मशानी रघुरायास । ऐशा विरळा संतास । दंडवत माझे ।। १८८ दासें अभ्यासून चार्वाक । अलौकिक बुध्दि-विश्लेषक । कल्पना-विलास भ्रामक । लया नेण्या अवलंबिला ।। १८९ नीर-क्षीर विवेकचा मार्ग । चोखाळण्यांत विविध उपसर्ग । ध्यानी घेउन, ज्ञानाचा विसर्ग । दासे केला अखंड ।। १९० ।। दास-वाणी ।। आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०१/०१ ज्ञानेंद्रिये, कर्मेंन्द्रिये, पंचविषय, पंचप्राण यांच्या द्वारे पंचमहाभूतिक देहाचे चालणारे दैनंदिन व्यापार म्हणजे प्रपंच होय. यात खाणे पिणे, उद्योग व्यापार, देहाच्या सर्व क्रिया उपभोग हे सगळेच आले. दिवसाच्या किंवा आयुष्याच्या पूर्वार्धात यांचा आस्वाद घेतल्यावर निदान उत्तरार्धात तरी नेटाने सतत पारमार्थिक चिंतन करत राहावे. विवेकी जनहो इथे आळस करू नका . पडल्या विवाह बेडीला । जडल्या मग दृढ प्रीतीला । सर्वदा अतुट नात्याला । राखावे निष्ठेने ।। १९१ केलींत वाटते चोरी ?। कबुली मग द्यावी खरी । सुखवाया पोरे, अस्तुरी । झगडावे अखंडित ।। १९२ आधी झाल्या ना आणा भाका ?। आंता आरडा न करा फुका । मुकाट वल्हवा नौका । भवसागरी ।। १९३ आधी केलांत बैल पोळा । आंता सावरा गोंधळा !। समजावले अनंतवेळा । दुर्लक्षिलेत कां बरे ?।। १९४ पण गंमत असते संसारी । सुखदु:खाच्या विविध परी । आनंद,वेदनांनी घेरले तरी । सामोरे जा नेटाने ।। १९५ ।। दास-वाणी ।। आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळाले सर्वहि । आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०८/२७ उपाधी म्हणजे लावून घेतलेले काम. मुळातला जो शुद्ध 'मी' आहे तो ब्रह्मरूप असल्याने त्याला उपाधी नाहीच. मायेच्या प्रभावाने त्या जीवाला सर्व नातलग प्राप्त होतात. ही माणसे जीवनात येण्यासाठी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध कारणीभूत असतात.त्या सर्वांची उपाधी जीव या जन्मात लावून घेतो. त्यांच्या येण्याजाण्याने खंत आनंद दोन्ही वाटता कामा नये अशी साधकाची स्थिती असली पाहिजे. शिकवण निरूपण दशक , उपाधीलक्षण निरूपण समास. आप्त-स्वकीयांच्या अपेक्षा स्वाभाविक । शमवाया क्लृप्त्या अनेक । भले असा अनभिषिक्त साधक । नसे पर्याय शोधासी ।। १९६ उच्च-श्रेणी साधक । नाचि व्हावा नात्यांचा जनक । जैसा विश्वामित्र अव्हेर-नायक । भोगलोलुप ।। १९७ ऐशा नरें आरण्य । मानावा निवास धन्य । लौकिक जगणे समाज-मान्य । नाकारण् हितकर ।। १९८ एक गोष्ट मात्र खरी धरती राहिल आभारी न पडले जर संसारी नर-नारी समस्त ।। १९९ आध्यात्माची धरतिल कास भोगतील केवळ भक्तिभावास कामंधतेचे त्यजतिल पाश वाढवणार नाही प्रजा ।। २०० सद्यकाळाची गरज । मर्यादित राखणे निपज । जीवमात्रांचे अतिरिक्त बोज । साहेना पंचमहाभूता ।। २०१ म्हणून संकटे अनेकविध । जलधि-भूवर निसर्गक्रोध । सजिवांचा घेउन वेध । व्यक्त विश्वांत होतसे ।। २०२ आजकाल अपेक्षा अवास्तव । दक्षिणा शब्दचि असंभव । शिष्य-गुरू भेदभाव । मानणारे विरळाची ।। २०३ बीज रुजत नाही तो । फळाची प्रतीक्षा करितो । जुजबी 'ज्ञान' मिळता पळतो । शिष्य जाणा आजचा ।। २०४ 'मुद्रा' प्राप्ती प्रथम । मिळविणे मग 'प्रेम' । वळोनि पाहणे 'गुरुधाम' । ज़मावे कैसे शिष्यांना ?।। २०५ ।। दास-वाणी ।। कांही उपाधी करू नये । केली तरी धरू नये । धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०१/३० आपल्या हौसेखातर समाजसेवेचे ओढवून घेतलेले काम म्हणजे उपाधी. एक तर निभावण्याची ताकद नसेल तर ते कार्य सुरूच करू नये. सुरू केले तर त्या कार्याला चिकटुन बसू नये. मला संस्थेत पर्याय नाहीच हा भ्रम निर्माण होतो. संस्थेत अडकून न बसता योग्य वेळी समर्थ व्यक्तीकडे कार्यभार सोपवून आपण दुसरा प्रकल्प हाती घ्यावा हे उत्तम निस्पृहलक्षण होय ! अमरपट्टा घेवोनी येथे । कोण सांगा जगी जन्मते । 'वेळ' येतां सकळ जनांते । सामोरे जाणे क्रमप्राप्त ।। २०६ कार्य सुरूच राहाणे । हितकर ! जाणती संस्थापक 'शहाणे' । निरपेक्ष निष्ठांवंताचा धांडोळा घेणे । चतुरपणे करिति ते ।। २०७ नाहीतर 'गोपाऴकाला'। कार्याचा ! निश्चित ठरलेला । मग भवतिच्या कर्दमाला । धुणे होई दुरापास्त ।। २०८ नाहीतर शेवाळ माजते । साचल्याची दुर्गंधी येते । कार्यप्रवाहा खीळ बसते । लया जाती परिश्रम ।। २०९ ।। दास-वाणी ।। जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यात मिसळावा । राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०१/०४ महंताने प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा ठाव घ्यावा. त्याचा आणि आपला आत्मा एकच आहे हे समजून समाजामधे मिसळून जावे. दुसर्यांच्या अंत:करणाचा सतत शोध घेत एकरूप व्हावे तरच नियोजित साधना अन कार्य करवून घेता येते. आत्मवत परावे ते मानीत जावे । हे चातुर्यलक्षण समर्थ आत्मदशकात सांगताहेत. निसर्गांत नित्य रमावे । श्वासोच्छ्वास मोकळून टाकावे । वारा पाण्यासंगे खेळावे नाचावे । समर्पित व्हावे अग्नितत्वी ।। २१० निसर्ग अनुभवा पुरेपूर । कवडसे तरंगता जळावर । सप्तरंग प्रकटती लाटांवर । संधी एकाचि जन्मि, जाणा ।। २११ पुनर्जन्म थोतांड । चार्वाकाने केले बंड । अर्धज्ञानी कर्मठ धर्मंार्तंड । जरि आरडले संतापे ।। २१२

No comments:

Post a Comment