Friday, September 26, 2014

।।भासबोध।। २१३ ते २५५

।। दास-वाणी ।। हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होता साधनाचा । ठाव नाहीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध :२०/१०/२७ मायेच्या प्रभावाखाली जे जे दृष्य दिसते त्याचा कारणासकट उलगडा झालाय.पंचमहाभूतासह ज्या असंख्य तत्वांचे शरीर बनलय त्यांचे निराकरण झाले. ही सर्व तत्वे आणि दृष्य म्हणजे माझे खरे स्वरूप नाही. अखंड केलेल्या साधनेमुळे मी ब्रह्मस्वरूप आहे हे विमळज्ञान मला उमगलय. तेच मला साधायचे होते. साध्य सिद्ध झाल्यावर ज्या साधनेमुळे हे प्राप्त झाले ती साधना सुद्धा आपोआप संपुष्टात आली. समर्थ सिद्धपुरूषाची स्थिती वर्णन करताहेत जे साधकासाठी उद्दिष्ट असले पाहिजे. विज्ञानावर कुरघोडी । करू पाहाती 'संत' बेगडी । 'लागों अदृश्य ब्रह्माची गोडी !' । आग्रहती परोपरी ।। २१३ गतीसही आळा बसतो । विरोध जैसा बळावते । अशावेळी कास धरितो । विज्ञानाची, मानव ।। २१४ हेच जाणा उत्क्रांत रूप । बुरसटल्या विचारांचे आक्षेप । बुध्दीकसाने उजळुनी दीप । 'सत्य' दावे 'मानव' ।। २१५ ।। दास-वाणी ।। नट नाटय कळा कुसरी । नाना छंदे नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०२/२१ हे गणेशा तू एक कुशल नट आहेस. मोठया कौशल्याने तू अभिनयकला प्रगट करतोस. नृत्यकौशल्यातही असंख्य तालांवर तू सहजतेने थिरकत असतोस. टाळ, मृदुगांसारखी अनेक वाद्ये तुझ्या सभोवती आपोआप ताल धरतात कारण ताल ही तुझीच निर्मिती आहे. नृत्य करता करता त्या तालावर तूच हुंकार भरतोस जे नृत्याचे उपांग मानले जाते. गणेश स्तवन समासात नृत्यगणेशाचे समर्थांनी केलेले साक्षात वर्णन ! अहा विविध कलांच्या कळा । पहा आनंद भिडे आभाळा । मुद्रा,पदन्यास,अभिनय बळा । महिरप देती बहुुविधरूपे ।। २१६ विरळा असतो आनंद । सुखदायि पळांचा कंद । 'समाधान' पुष्पांतरि मकरंद । हितकर निरामय सर्वकाळ ।। २१७ बाप तोलतो चंद्र-भागिरथी-त्रिशुळा । माय वितरे परित्राण बळा । परशु-पाश-मोदक तुंदिला । सावरण्यांत पुत्र व्यग्र ।। २१८ सहज रिचविति हलाहल । विकृतींसाठी होती कळिकाळ । क्रूर-कृतघ्न्यां तम-डोहाचा तळ । पंचमहाभूते दाविती ।। २१९ तेचि जाणा तांडव । नृत्याचाचि क्रुध्द-भाव । आवर्षण, जळोद्रेक संभव । रूपे संहारक मूलतत्वांची ।। २२० नमस्कार, असे वरवरचा। अंतर्ध्वनि फुत्कराचा । जीव घुसनमटे सद्भावाचा । बहुधा मागे ।। २२१ नमस्कार, दर्शनी कळा । अंत:स्राव विखारी भळाळा । उसळती द्वेषाच्या ज्वाळा । असूयेपोटी ।। २२२ कशासाठी गूहा वा घळ ?। कफ़नों, छाटी वा जपमाळ । दाढ्यीमिशांचे जंजाळ । साधते काय ?!। २२३ वेदना हुंदक्यांची जननी । व्यक्तण्या अर्थपूर्ण ध्वनि । पड़ता जाणिवेच्या कानी । अवतरे ओवी ।। २२४ परिक्रमा, तीर्थाटन । कशास जप तप होमहवन । वास्तव विस्तवापासून । अखेरीस पळति कां ?।। २२५ खवळता क्षुधेचा हुताशन । खळगींत ग्रासाचे हवन । क्रमप्राप्त ! पहिला चरण । आकळेना अध्यात्मी ।। २२६ जनहो घालितो तुम्हा साकडे । निवडून बाजूस सारा खड़े । भोंदू, ढोंगियांचे वावडे । असो द्यावे अंतरी ।। २२७ करो नये अति कधी कांहीही । कल्पना सजग जरि झाल्या प्रवाही । सोडावी लागतेच कधीतरी बाही । निवतांना ज्योत मंद ।। सुचत जाते तैसे लिहितो । सांगा काय म्यां पाप करितो । ना अढी कशाची मनी धरितो । जुळवितांना अक्षरे ।। २२८ करुनी पहा ना संसार । सौख्यदायी ! जरि कष्ट फार । शुष्क शाखांवरी जैसा मोहोर । बहरतो पुनःपुन्हा ।। २२९ ।। दास-वाणी ।। नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदे वेदांत श्रृती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०१/१५ हा ग्रंथ लिहिण्याआधी मी अनेक ग्रंथांची संमती म्हणजे अभ्यास केला आहे. चारही वेद, वेदांत म्हणजे उपनिषदे, श्रृतिग्रंथासहित सहाही शास्त्रे तर अभ्यासली आहेतच. याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे अध्ययनातून स्वत:ला आलेली प्रचीती किंवा आत्मानुभवाचा वाटा दासबोधाच्या रचनेमधे फार मोठा आहे धडपडणे, पडणे, ठेचाळणे । परत उभारी धरोनि पळत राहाणे । हीच ग्रंथाची जिवंत पाने । आम्हांसाठी ।। २३० आत्मभान, प्रचिती क्षणोक्षणी । सुख, समाधान, दुखणीबाणी । जगण्याच्या वेदोपनिषिदांचे वैयाकरणी । अनुभवसिध्द आम्ही ।। २३१ श्रुती, दोन स्वरांमधे जैशा स्थित । रीती, संस्कारी तैशाचि असतांत । जिणे सरेतो संसारी, माय-तांत । गांती ! तकरारी विना ।। २३२ ।। दास-वाणी ।। माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/०९ फक्त स्वत:चे आई वडिल, बायको मुलगा, सुन मुलगी यांची जबाबदारी मानतो. त्यांच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट करतो. माझ्याशिवाय यांचे कसे चालेल अशी धारणा मनात ठेवतो तो रजोगुण. सामाजिक जाणीवेचा अभाव अाणि स्वार्थप्रवण वृत्ती ही रजोगुणाची वैशिष्टये ! नाती जी जोडली स्वये । संगोपन कृतनिश्चये । करणे मन-वाचा-काये । सेवाभाव कां नसे ? ।।२३३ आधी भाकरी घरच्या ?। शक्ति-समयानुसार मग इतरांच्या । जागवाव्या जाणिवा सेवेच्या । याचि उपाये ।। २३४ घरी पोरे उपाशी । झोळी पसरे इतरांपाशी । समाजसेवेची बक्षिशी । कैसी द्यावी ऐशा नरा ?।। २३४ कुटुंबांत वाकडी तोंडे । इतरांसाठी चूल मांडे । कर्तव्याची बूज मोडे । सेवाभाव हा कैसा ? ।। २३५ धनिकांसी परोपकार । शोभून दिसतो अपार । ज्यांचे पोट हातावर । अशांस ते अशक्यप्राय ।। २३६ गरीबचि जाणतो व्यथा । भोगतो रोजचि वेदनांच्या कथा । अर्धा घास भुकेल्या भूता । सदय हृदये घालितो ।। २३७ आम्हा वर्जचि सत्वगुण। रक्ताच्या नात्यांची जाण । राखत अंतरी त्यांचे भान । जगतो अविरत नेटाने ।। २३८ टॅंह्यॅं टॅंह्यॅं रडे बालक । त्राही त्राही आरडे पालक । नाही कांही, परिचालक । म्हणे उपाय मजपाशी ।। २३९ म्हणोनि आंता 'उत्तष्ठित' । खडबडून 'जाग्रत' । सुवर्णमध्य साधत । सावरा स्वतःच संसारी ।। २४० अवकाशाला गवसणी । कल्पिली होती कधी कोणी ?। परंतु अथक प्रयत्नांनी । गवसली माझ्या हिंदुराष्ट्राला ।। २४१ गोपुरे, लोलकाकृती परिचयखुणा । परग्रहांच्या अवतरणोत्सुक अवकाशयाना । अचुकतेसाठी केली योजना । विज्ञाननिष्ठ तापसांनी ।। २४२ आर्य संस्कृती पावली उदया । पश्चिम क्षितिजी प्रस्थापित 'माया' । प्रचिनातिप्राचीन समया । तेवल्या ज्योती एकसमयावच्छेदी ।। २४३ कौतुकाने मंगळाच्या । प्रसन्न, भारली चित्ते नि वाचा । वैज्ञानिकांची वैश्विक झाली चर्चा । अभिनंदन करतांना ।। २४४ अशक्यप् वाटाव्या नजरांना । अशा वैशिष्टयपूर्ण प्रस्तररचना । शक्ति-बुध्दि अबलंबितांना । साधल्या तत्कालीन तंत्रज्ञांनी ।। २४५ तळाशी घुमट वर्तुळाकृती । मध्यांतुन ऊर्ध्वगामी निमुळती । प्रार्थना स्थळांच्या आकृती । विश्वभर ऐशा कां ?।। २४६ ऐशा रचनेस, म्हणते विज्ञान । घर्षणविरोध होतो किमान । जलचर, खे-चर, वसु-धन । मुखाशी पाहा निरखुनी ।। २४७ कुणी पारखे जवाहिर । कुणी अडगळितिल भंडार । क्षुधासमय नि आहार । काय वेगळा असे ।। २४८ जे मी लिहितो आहे आज । उद्या ठरेल व्यर्थ काज । कदाचित कसोट्या रोज । लागतील वेगवेगळ्या ।। २४९ जग बदलते क्षणोक्षणी । चर्चांतरी, अदान-प्रदानी । विचारवंत, विद्वान, ज्ञानी । टाकाऊ वा टिकाऊ, वदतील ।। २५० सूर्य जरी रोजचा तोच । वेगवेगळी असते आंच । प्रभात-माध्यान्ह-तिन्हीसांज । जैशा हुरहुर-सुख-वेदनाकारी ।। २५१ निंदतील वा वाखाणतील । रुचीनुसारे चघळ-निगळतील । कुरुवाळतील, ताडतील । सर्व मजला स्वीकार्य ।। २५२ ।। दास-वाणी ।। प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पाहिजे पंचीकर्ण । महावाक्याचे विवरण । करितां सुटे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०३/२९ देह आहे म्हणून प्रपंच आहे. प्रपंच आहे म्हणून व्यवहार आहे. व्यवहार आहे म्हणून सोने नाणे, पैसा अडका, जमीन जुमला यांना किंमत आहे. ते आवश्यकही आहे. देहात जो जीवात्मा राहातो त्याला मात्र पंचमहाभूते, अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि, सर्वं खलु इदम् ब्रह्म इत्यादी महावाक्यांच्या सखोल अभ्यासातून चिंतनातूनच मुक्ती मिळते. तेव्हा देह सांभाळण्यासाठी सोनेनाणे आणि आत्मिक उन्नती साठी अध्यात्म, दोन्ही आवश्यकच ! देहाचा सांभाळ । सदासर्वकाळ । करतांना उरतो कां वेळ । आध्यात्मासाठी ? ।। २५३ मागण्या विविध अनंत । स्वकीय-आप्तांच्या पुरविण्यांत । कष्टती जे अविरत । ते उन्नत पारमार्थिक ।। २५४ कर्तव्यच्युत पूर्ण होवून । फोलपणा मागे धावून । आणि अध्यात्मा कवटाळून । साधती काय ? २५५

No comments:

Post a Comment