Tuesday, April 7, 2015

'पडद्याबाहेर': रविवार, दिनांक १२-०४-२०१५ साठी

'पडद्याबाहेर': रविवार, दिनांक १२-०४-२०१५ साठी माझी दाट शंका आहे की विविध 'भ्रम' वाहीन्यांचे पटकथा-संवाद लेखक, दिवसा आड़ किंवा किमान साप्ताहिक, बसत असणार... म्हणजे एकत्र चर्चेला हो ! कारण 'बसत' असणार म्हटल्याप्रमाणे लोक उगाचंच तर्कवितर्क करायला लागतांत, म्हणून केला खुलासा ! कारण पाहाना, इकडं 'कन्यानाच' मधे कीर्तनेंनी चाळकऱ्यांना नोटिस पाठवली, तिकडं, 'सखी' मधे, चाळ पुनर्विकासासाठी चाललेल्या चर्चा सभेंत एक सदस्य झीट येऊन आडवा झाला ! तिकडं 'मामाजा-माझीया माहेरी जा' मधे, मुलगा दुबईला चाल्लाय म्हटल्याप्रमाणे तीर्थरूपांना झीट आली । हे सगळं एकाच दिवशी दिसणं हा निव्वळ योगायोग असणं यावर तुमचा विश्वास बसूं शकतो ? हिंदी 'कलर्स'वर, गेलं कमीतकमी एक वर्ष चाललेल्या ' ससुराल सिमरनका' मधे कांही कारण नसतांना केवळ मालिका लांबविण्याच्या हेतूनं, काळी जादू, इच्छा नागिणीसारख्या, २१ व्या शतकाला न शोभणाऱ्या, विज्ञानवृत्तीला काळीमा फासणाऱ्या कथावस्तूंचं प्रदर्शन कां होतय ? शिवाय, आणखी कांही हिंदी वाहिन्यांवर 'महाकुंभ' ' कलश' सारख्या भाकडकथांचा सुळसुळांट दृश्यमान होवू लागला आहेत. मराठी ईटीव्ही आतां 'कलर्स'नं घेतलय ! तेंव्हा ते हिंदी विष, मराठी भाषेवर आक्रमण केल्यावर, आशयरूपानं जर आतां मराठीत आणाल तर याद राखा ! कोणं बजावणार हे ? कारण सगळ्यांचे सामाजकारणी, राजकारण्यांचे हांत या अंधश्रध्देच्या दगडाखाली अडकलेंत ना ! आणि महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळींत, विरोधी उमेदवार एकमेकांवर, चेटूक, काळी जादू, लिंबू-मिरच्या-टाचण्यांच्या शापांकित शस्त्रास्त्रांचा मारा प्रत्यक्ष वास्तवांत करताहेंत, हे बातम्यांमधे पाहिल्यावर तर कपाळावर तळवे आटपून घेण्याशिवाय गत्यंतरच उरलेलं नाही ! जेजुरीच्या श्रध्येयाची, बानू, म्हाळसा आणि खंडोबा यांची कथा म्हणजे पुराण मिश्रित इतिहास आहे. तिथंसुध्दा चमत्कारांची अतिशयोक्ती नाही. देवाच्या नावांनं जादूटोणा वगैरे अजूनपर्यंततरी दिसला नाही मामतुझा..तुझ्यावर संशय ? तुझा संशय ऐवजी ? काय वैद्य ? कुठं शिकवतांत असं मराठी ? 'मामतुझा' च्या शीर्षकगीतांत, 'तू'झे झाले ? अरे त्या चारही शब्दांना मिळून कांही अंगभूत ताल आहे.. कविवर्य सुधीर मोघ्यांच्या प्रसिध्द कवितेंतली ती पहिली पंक्ती आहे. ते श्रेय तर त्यांना दिलंच नाही पण ती सांगतांना जरा काव्याच्या बाजाचं भान राखायला सांगाकी निर्माते महोदय ! तुम्हाला सर्जनशीलता प्रशिक्षणापेक्षा अधिक महत्वाची वाटते असं तुमचं विधान माझ्या पक्क स्मरणांत आहे बरं कां ! जेंव्हा तुम्ही एका प्रसिध्द वाहिनीच्या मुख्याधिकारी होतांत, तेंव्हा मलाच ऐकवलवतंत तुम्ही ! बातम्यांच्या वाहिन्यां कधीकधी उद्विग्न करतांत. त्यातला आशय-विषय राहून, ऐकून मन विषण्ण होतं. समाजाचं वैज्ञानिक उद्बोधन कधी होणार ?.. सात जण नदीपात्रांत 'सेल्फी' काढतांना बळी ? अरे, बागेंत खेळायला-फिरायला जाणाऱ्या बालकांना सुध्दा, 'सी-साॅ' च्या तत्वाची जाण असते. इथं तर 'जाणकार'(?) युवक होते. पाण्यासारख्या अस्थिर माध्यमांतल्या नांवेवर, एकांच बाजूला सर्व भार टाकलां तर तिच्या गुरुत्वमध्याचं काय होईल हे त्यापैकी कुणालांच माहीत नव्हतं हे मानणं तसं धार्ष्ट्याचं ठरलं असतं एरवी ! पण परिणाम पाहतां, ते खरं ठरलं दुर्दैवानं ! नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतांना, किती अतिरेकी वागावं याचं भान राखायला या नव्या पिढीला कोण नि कसं सांगणार ? नुसता नवीन तंत्रज्ञानाचांच नाही तर, 'दुनियादारी' मालिकेंत स्पर्श मुला मुलींचा यावर्षीचे चर्चा खरंच उद्बोधक होती.. मुलींना तो कां केला की झाला हे कळण्याचं निसर्गदत्त वरदान असतं.. 'पाठीला डोळे असतांत त्यांच्या' म्हणतांत ना ? तसंच कांहीसं !.. तुला तसा वाटलां कां ?... 'गच्चीवर.. लहानपणी भावंड एकत्र गप्पा, टवाळक्या करींत झोपत होतांत ना ?.. आतां मोठे आहोंत आपण, तरीसुध्दा या मुलांबरोबर खूप सुरक्षित वाटतं, खूप विश्वास वाटते मला !' सगळांच भाग छान लीहिलावता पटकथा-संवाद लेखकानं आणि तितक्याच समजूतदारपणं अभिनित केलावता सगळ्या.. तशा नवोदित.. मुला-मुलींनी ! 'सखी' मधे. देवापुढं शुभंकरोति कल्याणम् वगैरे बघतांना, उगाचंच मालिकेच्या चांगुलपणाची'पाल, चुकचुकून' गेली मनांत ! 'माझा होशिल कां ?' मालिकेंत. भागवत क्लासेसच्या, समीरची बहीण अनुष्का ! रात्री चार मुलींपैकी एक.. अनुष्का.. चक्क, स्वयंपाकघरांत झाकपाक करीत जाग्या असलेल्या,शारदाआईची नजर चुकवून, बाहेर पळून जाते ?.. झोपतांना तिनं इतका तंग झगा घातलेला असतो कीं कांही विचारू नका.. सगळंच इतकं अतर्क्य अतिशयोक्त विनोदी किंवा मूढबुध्दी मंडळींनी योजलेल्या पटकथेसारखं वाटत होतं.. कांही माणसांनी तोंड उघडलं की दुर्गंध येतो पहा.. ती एक प्रकारची व्याधी असते. अशा माणसांना मित्रमंडळी, आप्तसुध्दा टाळू बघतांत.. तसं कांहींसं जाणवलं या मालिकेचा पहिल्यांच सप्ताहांतला एक भाग बघतांना... 'माहोका' मालिकेंत हृदयविकाराचा झटका आल्यावर, डॉक्टर(?), 'शुगर रिपोर्ट् साठी दोन दिवस लागतील' ! असं सांगतो ? आणि 'नस'वर की नसेवर डाॅक्टर ? कुठल्या वैद्यकीय महानिद्यालयांत शिकले हे याची चौकशी करून तिथल्या शिक्षकांना 'भारतभग्न' पुरस्कारच द्यायला हवा खरं तर ... ********** अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment