Monday, August 22, 2011

॥ॐ॥....अक्षर गणेश


॥ॐ॥....अक्षर गणेश
’ॐ नमोजि आद्या..’ अशी सुरुवात करून  ’भावार्थदीपिका’ या ग्रंथाच्या  पहिल्या ओवींत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ’माउलीं’नी, ’जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’ला पहील नमन जरी  केलं असलं तरी त्यांना पहिल ’अक्षर’ उच्चाराव लागलं ते म्हणजे ’महाप्राण’ असं ज्याचं वर्णन करतांत तो ’ॐ’.
’ॐ’..’गणपती’..’गजानन’..जो ईश सर्वा गुणांचा’..त्याचंच .अ-क्षर’ म्हणजे ज्याला ’क्षर’ किंवा विलय नाही असं रूप..अबालवृद्धांच्या उत्साहाचा, आनंदाचा स्रोत,  न्हाऊन-माखून, चेहेर्‍यावर अवखळ वार्‍यानं येणार्‍या बटा मागं सारणार्‍या परकर्‍या बालिकेपासून, एकपेडी वेणी मोठ्या डौलानं, मानेच्या झटक्यानं मागे फेकत चालणारी युवती, किंवा सुस्नात भाळावर,पिंजर घेवून तिची चंद्रकोर रेखणारी प्रौढा आणि अगदी ’कृतांतकटकामलध्वजजरा’ म्हणजे अनुभवसमृद्धीनं श्वेतवर्ण झालेल्या केसांचा छोटासा आंबाडा घालणार्‍या आज्जीबाईंपर्यंत सगळ्यांना लगबगीनं स्वागताच्या तयारीला उद्युक्त करणारी ’चैतन्यमूर्ती’...’ॐ गं गणपतये नम:’ अशी प्रार्थना सहजस्फूर्त, ओठांवर आणणारी देवता...
’पंचपंच उष:काली’ अंगणात सडासंमर्जन करतांना, नंतर त्यावर सुबक नाजुक, ठिपक्यांची रांगोळी चितारून तींत रंग भरतांना, साग्रसंगीत पूजेची तयारी करतांना, सजावट आणि आरास करण्यासाठी फुलांच्या माळा ओवतांना, एकीकडे प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची योजना करण्यांत गर्क , घरांतल्या स्त्रिया, तर केळी-कर्दळीचे खुंटे आणणे, ’पत्री’, आंब्याचा डहाळा, विड्याची पानं वगैरे आणण्यासाठी दुचाकीवर टांग मारत निघालेला पुरुषवर्ग...सगळ्यांच्याच मनांत हे ’वक्रतुंड महाकाय’ पण गोजिरवाणं रूपड, उर्जास्रोत होवून ’पायीच्या घागर्‍या’ रुणुझुणु वाजवीत नाचत असत.
’अ’कार चरण युगुल । ’उ’कार उदर विशाल । ’म’कार महामंडल । मस्तकाकारे ॥
मला या ’अक्षर’ गणेशांत नेहमीच जाणवत आलय की ’अ’कार म्हणजे स्थिती, ! भूमीवर, आपले दोनीही आंकडे नांगरा सारखे घट्ट रोवून ठोकलेली मांड. कुठल्याही कार्याला आवश्यक मजबूत पाया...’उ’कार, उदर, म्हणजे ऊर्जा स्रोत, सर्व ’गुणावगुणी’ घटकांना समर्थपणे पचवून, त्यांतल्या पोषक द्रव्यांना, रसांना कार्यसफलतेसाठी आवश्यक ’उर्जारूप’ देण्याच कार्य करंणारी यंत्रणा..आणि..’म’कार मस्तक म्हणजे, कार्यपूर्तीनंतरच्या निर्मितीला ’मंगल’दीप दाखवून ’सत्कारण’मार्ग दाखविण्यासाठी शरीरांतल्या उच्चतम स्तरावर निसर्गानं रचलेला ’नियंत्रक’, सुबुद्धीबीजावरण ! ’अ’कार किंवा ’उ’कार जेवढे मोकळे तेवढाच ’म’कार बंदिस्त...’अक्षरं’ नजरेसमोर आणा म्हणजे सहज ध्यानांत येईल...
गणनायक, सुखदायक, दुखवारक, बलसाधक
मूषकावरी मूर्ती, शुभंकर तु विश्वकीर्ति
तू दुर्वांकुरधारक,  क्लेश,वेदनाहारक
गणनायक....
सत्कर्माधार नित्य, दमन करी कृष्णकृत्य
शक्ति-बुद्धि-गुणवर्धक, सांबसुता प्रतिपालक
गणनायक...
श्रद्धेला ’दृष्टी’ दे, ’कार्यप्रवण वृत्ती दे
हो बापा, हो नायक, संकटांत पथदर्शक...
गणनायक...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com  

2 comments:

  1. नमस्कार मी श्रीराज... तुमचा नवीन follower. खूपच माहितीपूर्ण ब्लॉग आहे तुमचा. पुढच्या पोस्टची वाट बघतोय :)

    ReplyDelete
  2. wah...masta ahe...khup sundar varnan....especially baykanche...arthaat ata ashya bayka kitpat distat ha ajun ek prashna....pun bhavana teech...

    ReplyDelete