Wednesday, August 24, 2011

’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !


’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !
परवा, समोर राहाणार्‍या, ज्येष्ठ लोक-कलाकार गुलाबबाई संगमनेरकर, माझ्या घराच्या,थोड्याथोडक्या नाही तर सदुसष्ठ पायर्‍या चढून, घरी आल्या. कशासाठी...तर त्यांच्याकडच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचं निमंत्रण देण्यासाठी ! परंपरेनं लाभलेली कलासमृद्धता स्वत:च्या मेहेनतीनं जोपासून, अनान्वित हाल-अपेष्टां सोसत, ’जगण्या’च्या सर्वच पातळ्यांवर अनुभवसमृद्ध झालेल्या या माउलीला हे सारं करायची काय गरज होती ?
बरं त्यांच्या मुलाकडे, रवीकडे माझा चलत्ध्वनिक्रमांक आहे. त्याचा माझ्याकडे आहे. दूरध्वनीवर किंवा ’संदेश’ देवून निमंत्रण देता आलं असतं ना . पण नाही. ह्या ज्येष्ठांना, सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणं केल्याशिवाय चैन पडत नाही. तिथं मग कुठलीही तडजोड त्यांना चालत नाही.
मुळांत सत्यनारायणाची पूजाबीजा हा आजकाल खूपच वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरला आहे असं माझं ठाम मत आहे. सगळ प्रामाणिकपणं निष्ठेनं, तळमळीनं करून सुद्धा अनेकांच्या पदरी अपयश येतं. आणि मग मंडळी ’पाहूया कांही होतो का चमत्कार, पूजाबीजा करून’ अंधश्राद्ध होतांत. त्यांत एखाद्याला ’कावळा बसायला...’ या म्हणीप्रमाणे, यश प्राप्ती होते नि मग ती बातमी कर्णोपकर्णी होवून, ’त्या’ दिशेने अविचारी धाव घेत सुटलेल्यांची संख्या वाढत जाते.
तुम्ही बारकाईन जर अपघातांच्या बातम्या वाचल्यांत, तर सहज लक्षांत येईल की देवदर्शनाला गाडीभर आप्तेष्ट, मित्रपरिवार वगैरे घेवून जातांना, किंवा परततांना हे अपघात विशेषत: चैत्रा महिन्यांत जत्रांच्या वेळी होतांत. कारण बेदरकार वागणूक, बेफाम वेग...सगळ, त्या मुळांत अस्तित्वातच नसलेल्या ’देव’ या भ्रामक संकल्पनेच्या भरवशानं करत असतांत ही मंडळी. ’देव तारी...’ ही म्हण बदलून ती आता ’ मणूसच मारी त्याला कोंण तारी ?’ अशी वापरली जायला हवी..
ज्ञानोब्बा, तुकोब्बा, गाडगेबाबा, बहिणाबाई पासून, मीरा कबीरा सूरदास अ‍ॅरिस्टॉटल्‌, सर्‌ बर्ट्रांड्‌ रसेल्‌पर्यंत सर्वांनी ’देव’ नावाच्या संकल्पनेच्या ’नसलेपणा’बद्दल किंवा असलाच तर तो आसपासच्या ’माणसां’तच ’हृदयस्थ असल्याची ग्वाही दिल्यानंतर सुद्धा, माणसं स्वत:च्या नाकर्तेपणाचं ’डस्ट्‌बिन्‌’ म्हणून ’देव’ किंवा ’दैव’ हे शब्द वापरत असतांत...
कोण देव ? काय देव ? नसलेपण एक नि अभाव
गंडेदोरेवाल्या बाबा बुवांची ’त्या’च्या नांवे कावकाव
जन्म-मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतरं
उत्पत्ती-स्थिती-विलय सारा शास्त्राचा प्रभावं...
काझ्या घरी माझा मुलगा सत्यनारायणाची पूजा करीत असतांना, मी आत संगणकावर, मनांतली ’खळबळ’ ठोकत’ बसलो होतो...
निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान..
              वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान...
’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते,
             शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते...
तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र,
             पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ?
पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं,
            लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं
इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज,
            सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज...
हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा,
           डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा...
बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं,
          ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं...
खुणावणारं निळं आभाळ, बाळ मुठीला काळी आई,
         कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई...
’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो,
        आप्त, सखा, सुहृद मित्र, फक्त गंमत पाहात असतो...
                           फक्त गंमत पाहात असतो...
अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment