Monday, March 5, 2012

’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’


’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले’
आशाताईंच्या भावविभोर स्वरांत भिजलेल्या या ओळी कुठून तरी, दूरवरून कानावर पडतांत आणि वरवर पाहाता ’आत्ममग्न’ वाटणारा, डोळे मिटून स्वत:शीच मंदस्मित करीत हलकेच मान डोलणारा कविवर्य सुरेश भटांचा चेहेरा आठवतो, त्यांची ’शब्दोत्सवा’पेक्षा ’भावोत्सव’ साजरा करणारी प्रत्येक मैफल आठवते...
’माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी’ म्हणणार्‍या एका तेजस्वी भाव-भास्कराला अस्तास जाऊन, पाहाता पाहाता नऊ वर्ष सरली ...! त्यांच्या प्रसिद्ध ’रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ या कवितेंतली...गझलमधली नव्हे...ही पंक्ती, त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वास, आत्मभानाची साक्ष देते. ’रंगुनी रंगात...’ ही रचना गझल नाही, हे स्वत: भटांनीच मला सांगितलं, जेंव्हा मी त्यांच्याकडे, ती ’गझल’ म्हणून एका कार्यक्रमांत वापरायची अनुमती घ्यायला गेलो होतो तेंव्हा. ’गझल चा प्रत्येक ’शेर’ वेगवेगळा आशय साकारतो, ते ’अंतरे’ किंवा ’कडवी’ नसतांत, त्यांना एक-सूत्रबद्धता नसते... केवळ रदीफ आणि काफियाचं तंत्र जमवलं म्हणजे ’गझल’ साकारली असं होत नाही’, भट सांगत होते. मग त्यांनी स्वत: मला त्यांच्या त्यावेळी नुकत्याचं प्रकाशित झालेल्या, ’सप्तरंग’ या नवीन काव्य संग्रहांतली ’वृतानं’ आणि ’वृत्तीन’सुद्धा परिपूर्ण अशी ’गझल’ निवडून दिली... शब्द आहेत..
’लागले डोळे तुझे माझ्याकडे,
अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे’
भटांच्या लेखणींतून उतरलेली,
’आज गोकुळांत रंग खेळतो हरी..
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’
ही होरी कुठे, किंवा
’दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले
थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले
वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली,
अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली,’
ही विरहिणी कुठे आणि
’उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून या उशीवरी टिपूर चांदणे पडे’
ही मिलनोत्सुक प्रेमपात्राची लाडिक मागणी, किंवा
’उष:काल होताहोता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’, किंवा,
’गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे,
मधल्या, मानसिक षंढत्वग्रस्त, निष्क्रीय समाजाची अवस्था बघून केलेल्या या उद्वेगजन्य मागण्या कुठे..
केवढी विविधता, आढळते सुरेशजींच्या रचनांमधे ! भट आपल्या कविता स्वत: स्वरांकित करून गात असत आणि त्या ऐकतांना त्यांतला रांगडा प्रामाणिकपणा, हृदयांतून उसळणारी चीड, संताप, तर कधी आल्‌वार भावोत्कटता यांचा विलक्षण प्रत्यय यायचा...त्यामुळं भटांची कविता ही वाचण्यापेक्षा ती ऐकण आणि विशेषत: ती त्यांच्याच कडून ’गाइली’गेलेली ऐकणं, हा एक अवर्णनीय अनुभव असायचा.
’साय मी खातो मराठीच्या दुधाची,
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला’’
या त्यांच्या रचनेंतला दुसरा चरण, सुरेशजी उच्च रवांत, ज्या पोटतिडकीनं म्हणत, ती पोटतिडीक, अनेक उत्तमोत्तम गीत स्वरांकित केलेल्या, त्या प्रथितयश संगीतकाराच्या जाणकार हृदयांत जागली-पोचली-जोपासली होती किंवा कसे मला ठावूक नाही. पण
’लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’
या ’माय-मराठी अभिमान गीताला’ स्वरांत गुंफतांना, भटांना अभिप्रेत असलेली ’पोटतिडीक’ कुठेतरी कमी प्डली असं आपलं माझं मत आहे. शब्दांमधल्या ’अध्याहृता’ पेक्षा सुरावटीच्या प्रेमांत अडकले बहुधा महोदय..असो..
म्हणून, द्विरुक्तीचा आक्षेप स्वीकारून परत परत म्हणतो की भटसाहेबांच्या रचना जर त्यांच्याच कडून ’ऐकायला’ मिळत नसतील तर त्या ’वाचाव्या’ किंवा, हृदयनाथांसारख्या, त्या आशयांत आकंठ बुडलेल्या संगीतकारानं स्वरबद्ध केलेल्या आणि श्यक्यतो त्यांनी स्वत: सादर करतांना ऐकायला हव्यांत...
*****

No comments:

Post a Comment