Thursday, March 22, 2012

’फुलां’चा दिवस...

’फुलां’चा दिवस... आज एक एप्रिल...इंग्रजाळलेल्या आपल्या मराठी बांधवांसाठी April Fools' Day वगैरे.. या सर्वसाधारण दिवसाला ’तसं’ कां म्हणतांत या विषयी अनेक संदर्भ संगणकावरील ’महाजाला’वर पाहायला मिळतांत पण आज विचार करतांना मला वाटलं, आपला भारतीयांचं नवं संवत्सर...शालिवाहन शक...सुरू होणारा ’पाडवा’...चैत्र शुद्ध प्रतिपदा...या एक एप्रिलच्याच आसपास असतो...गुढ्या उभारल्या जातांत.. ऊर्जास्रोत दर्शक, पिवळ्या रंगाच्या विविध छटा घेवून झेंडूची टवटवींत ताजी ’फुलं’ ढिगार्‍यांनी, प्रवेशद्वारांवर तोरणरूपानं, गुढीवर मालारूपानं आरूढ होण्यासाठी तरारत आतुर झालेली असतांत...मग या दिवसाला ’Fools' Day ..मूर्खांचा दिवस असं अशुभ, अभद्र नांव कां द्यायचं बॉ ? आपण एक एप्रिलला मराठींत, महाराष्ट्रांत...खरंतर संपूर्ण भारतांतच ’फ़ुलां’चा दिवस म्हणून संबोधून, साजरा ’गोजिरा’ कां करू नये ? काय गंमत आहे पाहा.. दोन भाषांतले साधारणत: समौच्चारी शब्द, उकाराचा ’दीर्घ’ र्‍हस्व’ झाल्याबरोबर कसे एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहातांत चैत्र म्हणजे नवोन्मेषाचा, वसंत ऋतूचा, नवी कवळीक ल्यालेल्या वृक्ष-वल्लरींच्या पुष्पोत्सवाचा महिना...निसर्गानं रानावनांत जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आपल्या करामतीनं, विविधरंगांची उधळण करीत आरंभलेल्या ’चित्रोत्सवा’ची सुरुवात.. हिवाळ्यांतल्या धुक्याची चादर आणि पानगळीमुळं झाकला गेलेला जलाशयांचा पृष्ठभाग, हलकेच वाहू लागणार्‍या उबदार झुळुकांनी दूर होतांत आणि जळीं प्रतिबिंबतांत, स्वच्छ निळीशार आभाळं ! वृक्षांच्या पर्णहीनं शुष्क शाखा, नव्या पालवीच्या तजेलदार हिर्वाईच्या कांकणांनी सजायला लागतांत... दूरवर कुठेतरी आकाशांत एखादा कृष्ण-भुरा मेघ, स्व्त:च्या हृदय’द्रावक’तेची चाहूल देत रेंगाळायला लागतो..उत्तरायणात मग्न, तप्त भास्कराच्या तडाख्यानं एखादा ’पाषाण’ तडकून त्यांत एखादं वार्‍यावर स्वार झालेल बीज रुजतं, अंकुरतं आणि कांही दिवसांनी रानफुलाच्या रूपानं हलाडुलायला लागतं... आणि मग सुरू होते प्रतीक्षा...मोगरा, जाई-जुई...वहाव्याच्या हलक्यापिवळ्या रंगांच्या घोसांची...पळस फुलांची...निळ्या, जांभळ्या, लालभडक गुलमोहोराची...वृक्षांच्या सालीआडुन वाहात येवून शुष्क होताहोता अतीव विभोरक्षम उग्र सुगंधाची... १९३७ मधे प्रदर्शित झालेला चित्रपट ’कुंकू’ त्यातलं कै शांतारामजी आठवल्यांचं, ’भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सकस रूप आगळे वसंत वनांत, जनांत हासे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे गातांत संगीत सृष्टीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट’ हे, चैत्रापासून श्रावणमासाच्या अखेरीपर्यंत, सृष्टींतल्या समग्र बदलांचा परामर्श घेणारं गीत आठवा.. शक्य झाल्यास पाहा...यू ट्यूब्‌वर आहे संगणकाच्या ’महाजाला’वर या एप्रिल ’फुलां’ची इतकी विस्तृत आणि सविस्तर माहिती मिळते की हे सगळं ज्ञान संकलित करून गरजूंच्या झॊळींत विनामूल्य , निरपेक्ष भावानं अर्पण करणार्‍यांच कौतुक कराव तेवढं थोडच होईल.. पण एक बाब खटकली... म्हणजे जरा रागच आला...कुठलाही प्रांतवाद, भाषावाद बाजूला ठेवून सुद्धा प्रकर्षानं जाणवलं की या सर्व इंग्रजी माहितींत विविध पुष्पवृक्षांची, पुष्पांची शास्त्रीये आणि त्यांच बरोबर, लौकिकार्थानं रूढ नावं देतांना, गुजराथी, बंगाली, मल्याळी, तेलुगू, कानडी, हिंदी अगदी ऊर्दूतलीसुद्धा रूढं नावं नमूद करतांना मराठीचा मात्र विसर, ही सूची सादर करणार्‍यांना कां बरं पडावा ? हा त्यांचा मराठीद्वेष की आपला अतिसहिष्णूपणा, निष्काळजीपणा आणि आपलं भाषा संवर्धन, संरक्षणाकडे एकूणंच दुर्लक्ष ? मुद्दछोटा नाहीये.. याबाबत विचारणा व्हायला हवी...नाहीतर.. गोविंदाग्रजांच्या ’महाराष्ट्र गीतातल्या, ’नाजुक देशा, कोमल देशा,फुलांच्याहि देशा’च्या आधीची ’राकट देशा. कणखर देशा, दगडांच्या देशा’ची आठवण ’महाजाला’वरच्या सूचीकर्त्यांना आणि ’मराठी..मराठी’ म्हणत ’असेल हरी तर देइल खाटल्यावरी’ प्रवृत्तीच्या, निद्रिस्त मानसिकतेच्या, दरवर्षी संमेलनांत उर बडवत गळा काढणार्‍यांना करून द्यायला लागेल.. ***** अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment