Friday, March 30, 2012

’पेटी’ ! साधक ? बाधक ?

’पेटी’ ! साधक ? बाधक ? महाराष्ट्रांतल्या बहुतेक शाळांच्या वार्षिक परीक्षा आज संपतील आणि पुढचा जवळजवळ दीड महिना, मुलं हुंदडायला मोकळी होतील. बरं निकालाचा ’ताण’ वगैरे, आपल्यालासुद्धा आपल्या लहानपणी कधी जाणवला नाही, कारण ’ती’ जबाबदारी मुलांनी सोइस्कररित्या पालकांवर सोपवायची असते. त्यांतून आठवीपर्यंत ’वर ढकला’ या शासनाच्या ’अजब’ धोरणा मुळं, वयवर्ष चौदा पर्यंतची ’निष्पाप’ वगैरे बालक आणखी ’बिनधास्त’. या सुटीच्या काळांत, मुलं खुल्या मैदानांत खेळायला बाहेर पडणार की घरांत, ’पेटी’ समोर...मग ती ’चित्रवाणी’ची असो वा ’संगणकाची’ असो...तासनतास बसणार ? पूर्वी, ’ती’ नव्हती तेंव्हा काय परिस्थिती असायची ? विचार करतां, सुचलेलं हे मुक्त चितन...पण मुक्तछंदात नाही तर ’छंदोबद्ध’ अवतरली भवती हिरवाई सळसळती किलबिलती द्विजगण, पिंपळ-आम्रावरती जित्रांप हंबरे दावणीस गोठ्यांत मोहरते तुळशी शिपणिच्या थेंबांत पिंगळा-वासुदेवाची नित वर्दळ अर्थपूर्ण शब्द अन्‌ स्वरमय आर्त सकाळ जात्याची घरघर रेशिमगाठी ओव्या येतांच जाग, मनकलिका खुलवुन जाव्या करतलास पहिले नमन, इतर मग कामे धनवृद्धीसाठी प्रज्ञा घडवि सुकर्मे मोकळा श्वास, स्वच्छंद स्वच्छ आभाळी गुलमोहर हसतो अबाल-वृद्ध कपोली विटिदांडू, सुरपारंब्या, बहुविध खेळ करमणूक आणिक व्यायामाचा मेळ नेतृत्व, चपलता, गनीम तंत्रे सारी साम, दाम, दंड भेदाहुन असती भारी घेवून अंकलिपि पंतोजी शाळेंत अज्ञानावर करिती भाषा, गणीत मात बारा बलुत्यांचा खाउ क्षुधाशांतीला ना जात-पातिचा अडसर कधिही आला वसुबारस, पोळा, नारळि-पुनव, वटाची नागाची पंचिम, लग्ने अन्‌ तुळशीची कणग्या साळीच्या शिगोशीग माहेरी उंबर्‍यांत लवंडे माप वधू सासरी त्याकाळी होते पतंग भवरे कंचे कल्पनाजगत फुलविण्यास निवडक वेचे प्रहसने, पहेल्या इतिहासांतिल कथा शास्त्रीय सुगम संगीत पुराणे गाथा फडताळे खुंट्या, चंची छपरि पलंग घंगाळे, न्हाणित वज्रटिकेचा संग पागोटे शेला पैठणि आणिक लुगडी ठाशीव नारि अन्‌ उमदे बाप्ये गडी ना निशिद्ध असते तिथि कुठलिही तशी अवसेच्या रात्री लक्ष दीप आकाशी सरितेच्या काळ्या साडीवर खडि जणू तम, तेज..कुणाची मात कुणावर म्हणू राउळी कीर्तने, गोधळ, भारुड भजने मैदानि दणकती शाहीरांची कवने गण गवळणि करिती प्रौढांना बेजार लावणी नऊवारींत खुले शृंगार ओसरी परस ओटा सोपा नी कोठी दीडींतुन अखंड ये-जा.. वर्दळ मोठी तिन्हिसांजा उजळे सांजवात देव्हारा परवचा, श्लोक, आर्यांचा शब्दपिसारा आजीच्या स्मृति-बासनांतील ही रत्ने समृद्ध करुन जगण्या.. संस्कारिति मने निद्रेस पाळणा झोपाळा वा झोळी तुम्हि-आम्ही खेळलो खांबखांब खांबोळी याहुन असते कां संस्कृती हो वेगळी ? भवताल स्थळी, काष्ठी पाषाणी जळी हे चित्र नसे हो तसे फारचे दूर असतील उलटली तपे फारतर चार ही स्थिती आतांशा बघतां... ना राहिली थोरांच्या ठाई चित्रवाणि ठाकली हे सर्व आज त्या पेटीमध्ये असते कळ दाबतांच पाहिजे तेच अवतरते हा बदल खरोखर तारक अथवा मारक ? प्रज्ञेच्या निकषांवर स्तर, साधक-बाधक बहुरंगि जगाचे आपुल्या हाती द्वार पाहण्या वापरू विवेक सारासार ना समजा सर्व नवे असते टाकाऊ मंथन बदलांचे ! वृथा कशाला बाऊ ? वाहिन्या, मालिका बहुविध अंगी सकस माहिती, ज्ञान रंजनास गवाक्ष खास लैंगिकता, हिंसा कधी कुणा ना टळली फाडा बुरखे, डोकवा आंत ! वखवखली माणूस अखेरी हिंस्रांतुन उत्क्रांत श्वापदे मनाच्या तमगर्भांतच स्थित बालक तर करते थोरांचे अनुकरण ’साजिरे’ तयांना दावू या, आचरण अन्यथा नसे परिणामी गर्ता दूर ’चावण्या कान’ मातेचा शिशु तत्पर तमघोर सागरी क्षणैक तेजोरेखा ’जगणे’ म्हणजे मरणांतिल निमिष अनोखा ठेवून स्मृतींचे स्वर्ण, सहस्रक सरले ’विश्वातिल क्षुद्र कणास’ नाहि जाणवले माध्यमे ओढती विश्वाला जणु आंत तरि त्वचा, नासिका, जिव्हा कां अतृप्त ? कुणि जाणावे ? हे उद्यांच होइल साध्य प्रत्येक यत्न लक्षाचा भेदे मध्य सार्‍यांचे या प्रतिबिंब दिसे ’पेटीं’त ’पेटी’ ना समजा अडसर प्रगत पथांत ज्ञानाच्या कक्षा नका सिमित करु आतां ध्वनि, चित्र माध्यमे संगणकाची सत्ता पाहूद्या. शिकुद्या जाणिव होइल तीक्ष्ण ऐकुद्या, हसूद्या.. तवान होतिल मनं मज आशा एकच कुणि न विचारिल प्रष्ण ’संस्कृती लया गेली ?’... व्यर्थ विधान

No comments:

Post a Comment