Monday, April 23, 2012

’भान देणारं ’मन’

’भान देणारं ’मन’ ****** रस्मे उल्फ्त को निभाएं तो निभाएं कैसे हर तरफ आग है दामन को बचाएं कैसे मधला एक शेर बोझ होता जो गमों का तो उठा भी लेते जिदगी बोझ बनी हो, तो उठाएं कैसे ’दिल की राहें’ या १९७३ म्ध्ये वितरित झालेला हा बी.आर. इशारा दिग्दर्शित चित्रपट, Box Officeला कितपत चालला माहीत नाही. पण मदन मोहननं संगीतबद्ध करून ’लता’नं अजरामर करून ठेवलेल्या अनेक गझलांपैकी शायर ’नक्ष्‌’ लैलापुरी यांनी शब्दबद्ध केलेली ही एक गझल अनेक जागतिक सत्य अगदी सहजपणे सांगून जाते. यातल्या, ’जिदगी बोझ बनी हो, तो उठाएं कैसे’ ह्या काफियाची मला विशेषत्वानं जाणीव झाली...कांही निमित्तानं. मंगेश तेंडुलकरांनी ’दामोदरपंत’ नावाचं एक व्यक्तिचित्र लिहिलेलं परवां वाचण्यांत आलं. ही व्यक्ती म्हणजे वर उधृत केलेल्या काफियाचं, त्यांत शायरानं उपस्थित केलेल्या प्रष्णाचं, एका सर्वसामान्यानं दिलेलं चोख उत्तर वाटलं मला. ’दामोदरपंत’ वाचतांना आणखी एक जाणीव झाली ती म्हणजे असं कांही वाचण्यांत आलं की आपल्या मनाला इतकं स्पर्शून जातं की आपल्याला या ’रोजमरा की जिंदगी’मध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. कारण मन हेचं जित्या-जागतेपणी ’जगणार्‍या’ माणसाच्या अस्तित्वाच लक्षण आहे. ’मन’विरहित जगण म्हणजे यंत्रवत जगणं. ’मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा’ या कविवर्य सुधीर मोघ्यांच्या कवितेंत त्यांनी, मनाला ’मन रानभूल , मन चकवा’ असं जरी म्हटलं असलं तरी पुढे मनाला ’धनि अस्तित्वाचा’ असं संबोधून, त्याला मालकी हक्क प्रदान करून टाकला आहे. मन असतं पण दिसतं कुठे ? ते वपुंच्या कथेशेवटाला असणार्‍या कारुण्याची अल्वार झुळुक अंगावर घेतांना स्वत:ची होणारी घालमेल, किंवा प्रभाकर पेंढारकरांच्या ’अरे संसार संसार’ या सर्वसामान्य मुंबैकराचं जगण (?), संसारांतली ससेहोलपट ’किरण’ या स्त्री-पात्राकरवी रेखाटलेली वाचतांना, किंवा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या, ’कणा’ या कवितेतल्या मास्तरांचे, ’मोडून पडलं घर पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त "लढ" म्हणा’ असे उद्गार वाचतां-ऐकतांना, किंवा स्टाइनबेक्‌च्या, ’Grapes of Wrath' मधल्या शेवटच्या प्रकरणांतल्या शेवटच्या प्रसंगांत, आपल्या नवजात , रडणार्‍या अर्भकाला थोडावेळ तसच भुकेलं ठेवून, भुकेपोटी मरणासन्न झालेल्या म्हातारीला, स्वत:चा पान्हा देवून जगवू पाहाणार्‍या Native निग्रो महिलेचं वर्णन वाचतांना, ’मन’ उन्मळून येतं, आणि गहिवरून येतांना पांपणीकाठच्या दहिवरांत ते ’दिसतं’ ! हो ! या आणि अशाच जागा असतांत ’मन’ दिसण्याच्या.’मना’चं दिसणं म्हणजे नवरसांचा आविष्कार, अगदी क्रोध, शृंगारा पासून शांत रसापर्यंत, असं ढोबळ मानानं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. ’मनां’त कर्माचं...सत्कर्माचं किंवा कुकर्माचं.. बीज, रुजतं, अंकुरतं, आणि त्याचं ’कृतिरूप’ झालं की ते ’दिसतं’ ’मनां’त आल्याशिवाय, आणि ’मना’नं कृति करण्यासाठी हिरवा कंदिल दाखविल्याशिवाय, (बि)घडणार्‍या कृतीला ’अविचारी’ असं म्हणतांत. ’मन सुद्ध तुझं, गोस्ट हाये प्रिथिवि मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कुनाची’’ हे चित्रपटगीत आठवा किंवा ’मनी नाही भाव आणि (म्हणे) देवा मला पाव’ ही म्हण. सगळंच वरकेलेल्या प्रत्येक विधानाला पुष्टी देणारीच आहेत. कारण ’मनि असे ते स्वप्नी दिसे’ इतकं Haunted होवू शकतं ;मन’ तसंच ’मन चिती ते वैरीही न चिंती’ इतकं क्रूर-कठोरही होवू शकतं मन’ मनाचिये गुंथी गुंफियेला शेला । बापरखमादेवीवरे विठ्ठली अर्पीला ॥ इथं सुद्धाद्धा ज्ञानदेव, मनांतल्या वैचारिक ’गोंधळ’रूपी गुंत्यांतून, मधुराभक्तीची हळुवार फुंकर घालत, एक एक धागा मोकळा करीत त्याची ’वाकळ’ नाही तर ’शेला’ करून विठूमाउलीला अर्पण करतांत. परत हे ’मनां’चं दिसणं व्यक्त होतं ते आधी ’विरचित’ ’ध्वनिरूपां’तून आणि मग लेखी ’शब्दरूपां’तून. ’पसायदानां्तल्या सगळ्या मागण्या ’मनां’त ठेवून भागलं असंतं का ? ते भाबड्या भक्तांसमोर आणण्यासाठी त्याला ओवी ’रूप’ द्यावच लागलं ज्ञानदेवांना अखेरीस. अशीही ’मनोगाथा’ वर्णन करणार्‍या ’समर्थ रामा’चे ’दास’विरचित ’मनाचे श्लोक’ बाबतींत पुढे कधीतरी... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment