Monday, April 16, 2012

’दादर’

’दादर’ असं दादर, दादर..माझं ’प्रेमाचं माहेर... फुटे स्मृतींना मोहोर...सय येता... असं दादर, दादर..धरे मायेची पांखर... यश-कर्तृत्व ’बखर’...कित्येकांची... दादर... म्हणजे जिना...म्हणजे सोपान...मुंबई २८...मुंबई १४...कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ’मराठी. व्यक्तिविशेषांच्या यशाचा सोपान...कर्मभूमी... मराठी मनाच्या स्वाभिमानाचा केंद्रबिदू...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ’बाबूजी’ सुधीर फडके, पं.सुरेश हळदणकर, पंडित जगन्नथबुवा पुरोहित, पंडित शरश्चंद्र आरोळकर, गानगुरू वसंतराव कुलकर्णी, पंडित जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर पणशीकर, यशवंत-करुणा देव, माणिक वर्मा, शोभाताई गुर्टू. प्रभाकर जोग, श्रीधर पार्सेकर, जयवंत कुलकर्णी, सतीश पुळेकर, मोहन वाघ, विद्याधरजी गोखले, दिलिप प्रभावळकर, नाना पाटेकर, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, अरविद-सुलभा देशपांडे, सुकन्या कुलकर्णी, सुचेता भिडे, देवकी पंडित, विजय मांजरेकर, स्मिता तळवलकर, बालमोहनचे दादासाहेब रेगे, छबिलदासचे अक्षीकर गुरुजी, किंग्‌जॉर्ज्‌चे नाबर गुरुजी, मनोहरपंत, सुधीरभाई जोशी, बबन-नीलम प्रभु, कविवर्य राजाभाऊ बढे, गदिमा... माझ्ं २३ मुकुंद निवास, जिथं विजयाबाई मेहता, विजय तेंडुलकर, बाबूजी, जितेंद्र अभिषेकी आदींची वर्दळ असायची, एखाद्या संध्याकाळी, ज्येष्ठ मित्रवर्य, दस्तुरखुद्द हृदयनाथ-बाळासाहेब-मंगेशकरचे माझी पेटी (तेंव्हा तिला संवादिनी वगैरे म्हनत नसत) ओढून अर्धा पाऊन तास खणखणींत गाऊन जात असत, त्याचं २३ मुकुंद निवासचे ’दादर’ चढत उतरत मोठे झालेले, कविवर्य सुधीर मोघे, ’देबू’ देवधर, शिवानंद पाटील, चंद्रशेखर गाडगीळ, आनंद मोडक, माझ्या शाळेंतले...Indian Education Societyच्या पिंटोव्हीला मधले...जगदीश पुळेकर, विनय धुमाळे... पलीकडे TTला मनहर बर्वे, हेमू अधिकारी यांचं दादर...संस्कारभूमी दादर कीर्ती, रुपारेल, रुईया महाविद्यालय, केटरिंग्‌ कॉलेज, VJTI, UDCT,...च दादर... मराठी माणसाच्या अस्मितारक्षणासाठी, आपल्याचं घरांत...मुंबईत...बेघर होण्याची वेळ आलेली असतांना, ’हक्कां’साठी, प्राण पणाला लावून, वेळप्रसंगी रक्तही सांडून लढलेले, कांही कामासही आलेल्या, सर्वसामान्य ’अनामिक’ हुतात्म्यांचं, कार्यकर्त्यांचं दादर... ’सचिन’च्या शाळेचं...’शारदाश्रम’चं दादर अमरहिंद मंडळ, शिवाजी मंदीर चं, रवीन्द्र नाट्य मंदीर...जिथं मी ’रंगायन’च तारू फुटल्यानंतर, नयानं उदयास आलेल्या, अरविंद देशपांडे, सुलभाताईंच्या ’आवीष्कार’च्या पहिल्या नाटकाची, ’तुघलक’ची Zero hour rehearsal, अरविंदच्या करारी रंगसूचनांबरहुकूम, अरुण सरनाईक , माधव वाटवे आदींची ’तालीम...बघीतली...विजया-भक्तीचम ’बाई खुळाबाई’ बघीतलं... अनेक चळवळींच्या शुभारंभांचं...विजयसोहळ्यांचं साक्षीदार, जिथं ’सचिन’नं आचरेकर मास्तरांच्या देखरेखीखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले अनेक अष्टपैलू व्यासंगी वक्त्यांची ओघवती, रक्त सळसवणारी, भावनेला हात घालणारी भाषणं,थंडी-ऊन-पावसांत, ऐन दुपारी वा अगदी मध्यरात्रीपर्यंत ऐकण्यासाठी जनसामान्यांना स्वत:च्या ’अंकावर’ स्थान दिलेलं ’शिवतीर्थं’ शिवाजीपार्क्‌ मैदान, कित्ते भांडारी हॉल्‌, जिथं मी माणिकताईंच्या अनेक मैफिली ऐकल्यांत आणि त्यांचं केवळ आवाजांतून, लटका रुसवा, आदाकारी काळजांत उतरविणारं, ’नाही मी बोलत नाथा’ ऐकलय ! ’नाटकघर’...अरुण काकड्यांच्या प्रायोगिक रंगभूमीची प्रयोगशाळा, ’दुर्गा झाली गौरी’ सारख्या नृत्य-नाट्याची...ज्यानं मराठी रंगभूमीला उत्तमोत्तम ’अभिनेत्री’ मिळवून दिल्या ती ’चंद्रसूर्य’ रंगभूमी, ...छबिलदास(मुलांच्या) शाळेचं सभागृह, जिथं मी तेंडुलकरांच ’पाहिजे जातीचे’(नाना-सुषमा), ’चांगुणा’(बा आणि सासू-रोहोणी हट्टंगडी आणि सतीश पुळेकर), गो.पु. देशपांड्यांच ’उध्वस्त धर्मशाळा’ (डॉ. श्रीराम लागू), ज्यो अनुईंचं ’अ‍ॅंटिगनी’(लागू, दीपा, विनय आपटे, अनंत भावे, रामनाथ थरवळ), अशी ’नाटकां’ची त्रिमिती अनुभूती घेतली, पृथ्वी थिएटर्‌ची मुहूर्तमेढ जिथं रोवली गेली तो वनमाळी हॉल्‌, HMV...म्हणजे हरी महादेव वैद्य हॉल्‌, जिथं मी किशोरीताईंच्या सकाळच्या रागांच्या मैफिलीसह अनेक दिग्गजांच्या मैफिली, मनांत साठवून घेतल्यांत, ६८-६९ साली ! CKP हॉल्‌, सिद्धीविनायक, अक्कलकोट स्वामींचा मठ...जिथं मी, निजामपुरकरबुवांसारख्या अनेक ख्यातकीर्त कीर्तनकारांची रसाळ कीर्तनं ऐकली रिचवली, पचवली आणि ज्ञान-भाषा-वाणी शुद्धतेचे धडे घेतले, सध्याचं धन्वंतरी रुग्णालय म्हणजे पूर्वीचा ब्राह्मण सहायक संघ, जिथं मी, रामभाऊ मराठ्यांच्या मुलांच्या मुंजीत, याचिदेही याचीडोळा, साक्षांत नारायणराव राजहंस’बालगंधर्वां’च दर्शन घेतलं आणि गाणही ऐकलं...’जोहार मायबाप जोहार..तुमच्या महाराचा मी महार’...एका अत्यंत विश्वासू, इमानदार अस्सल ’मर्‍हाठी’, १९६२च्या चीनबरोबरच्या युद्धांत विशेष पराक्रम गाजविणार्‍या, लढ्वय्या, चिवट, निधड्या छातीच्या, शूरवीर महार ज्ञातीला ’परमेश्वर’ विठ्ठलपदापर्यंत पोचविणारं नाट्यपद...ज्या ओळींमधे ’फुकाचा’ राजकीय, मतपेटीवर लक्षठेवून, बळेबळे आणलेला बेगडी कळवळा नव्हता, ’आरण्यरूदन’ नव्हतं... खांडके बिल्डिंग्‌, भिकोबा निवास, टायकल वाडी बोरकरवाडी असे आमच्या त्या शाळकरी वयांत जरा, घबराटीपोटी आदरयुक्त दहशत निर्माण करणारी ’राडेबाज’ नांवं... १९४२ मधे माझ्या पिताजींनी डी. एल्‌. वैद्य रोडवर गोरेगांवकर चाळींत एक ’डबल्‌ रूम्‌’ भाड्यानं घेतली त्या घटनेला यावर्षी ८० वर्ष पूर्ण होताहेत ! शेजारच्या कुसुरकरवाडींत तीन खोल्यांचा ’फ्लॅट्‌’ त्याच भाड्यांत उपलब्ध होता तेंव्हा...पण ’आपल्या छोट्या कुटुंबाला एवढी मोठी जागा काय करायची ?’ या टिपिकल्‌’ मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेंतून ती संधी त्यांनी घालवली... असो... डॉ बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे अशा समाज धुरंधर, पत्रकार, वक्ते-नेत्यांच्या पार्थिवांना आपल्या पोटांत मायेच्या ममतेनं सामावून घेणार्‍या या दादरच्या भूमींत आतां, चैत्यभूमी शेजारच्या इंदु कापड-गिरणीच्या आवारांत, भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरस्थाई स्मारकाला जागा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं, समस्त दादरकरांबरोबरच, समस्त देशवासियांकडून स्वागत न झालं तरच नवल ? *****

No comments:

Post a Comment