Monday, April 9, 2012

’शब्दांच्या अलि-पलीकडे...’

’शब्दांच्या अलि-पलीकडे...’ बोलतांना लिहितांना शब्दांच्या अलि-पलीकडे बरेच अर्थ त्या शब्दाला खुणावत असतांत, जसं एखाद विधान तुम्ही किती ’अल्वार’ किंवा कठोरपणे करतां यावर त्याचा अपेक्षित परिणाम अवलंबून असतो...उदाहरणार्थ... माझी सासुरवाडी तिकडची उत्तरप्रदेशांतली..म्हणजे पत्नीचा जन्म बनारसचा शिक्षण लखनौ, दिल्ली वगैरे..आमचं लग्न ठरल्यावर सुरू झालेल्या पत्रव्यवहारांत, तिनं लिहिलं होतं, ’आप वाकई मुझे लाएंगे ना ?’.. बाप रे ! मी मनांत म्हटलं ’ही बाई लग्ना आधीचं ’वाकी’ ची मागणी करतेय्‌, नंतर माझ्या खिशांत कांही ’बाकी’ उरणार की नाही?’ असो.. विनोदाचा भाग सोडा पण समौच्चारी पण दोन भिन्न भाषांत भिन्न अर्थ असलेले शब्द असा ’अनर्थ’ घडवू शकतांत हे मला नजरेस आणून द्यायचं आहे इथं.. तुम्हाला माहीत आहे, ’राम’ या शब्दाचा हिब्रू भाषेंतला अर्थ आहे Thunder म्हणजे मराठींत, मेघांच्या हालचालींतून प्रचंड घर्षणामुळं निर्माण झालेली अवकाशस्थ वीज, किंवा विजेचा लोळ, किंवा संस्कृत मधे ’सौदामिनी’. आणि ’आबा’ या शब्दाचा हिब्रू भाषॆंतला अर्थ काय आहे माहिती आहे ? ’Aba' चा हिब्रूतला अर्थ आहे 'Father or Grand father'..आतां बोला. आपण मराठींत सुद्धा वडिलांना किंवा आजोबांना आबाच म्हणतोना ? इथं समौच्चारी शब्द आहेंत आणि अर्थ सुद्धा. तसाच आणखी एक शब्द ’वडील’...उर्दू मधे त्यांचे ’वालिद’ होतांत.. म्हणजे रोमन लिपींत लिहून बघितलत तर फक्त 'l' आणि 'd' च्या जागांची अदलाबदल केली की तोच जन्मदाता मिळतो आपल्याला. मी कांही भाषा तज्ञ किंवा संशोधक, व्युत्पत्तीशास्त्र-तज्ञ वगैरे नाहीये ! पण मला असे शब्द नेहमीच खुणावत असतांत मैत्री करण्यासाठी ! ’इरा’ म्हेणजे पाणी.. डॉ. द.भि. कुलकर्णींनी एका गप्पांदरम्यान सांगितलेली माहिती. त्यावरून ’इराक’ म्हणजे पाण्याची कमतरता असलेला आणि ’इराण’ म्हणजे मुबलक पाणी असलेला असे दोन देश. कोल्हापुरकडं, मंडळी बहिर्दशेला जातांना, ’वाइच ’इरेला’ जावून येतुया’ ’ म्हणतांत म्हणे.. माझ्या नवजात नातीचं जन्माक्षर आलं ’यी’. आतां यी वरून कुठलं नांव शोधायचं.. पण माझ्या कन्यकेनं महाजालावरून एक नांव शोधलं...भले जपानी कां असेना...’यीरा’ म्हणजे मराठी अर्थ समृद्धी.. आतां पाणी आणि समृद्धी यांचा किती जवळचा संबंध आहे हे ’शेतीप्रधान’ संस्कृतींत वाढलेल्या आपल्या देशांतल्या प्रत्येक नागरिकाला पटवून द्यायला नको.... तसंच पाण्यासाठी रशियन शब्द ’वोदा’... आणि तोच संस्कृतमधे ’उद’.. म्हणतांत ना ’पृथ्वी गोल आहे’ किंवा इंग्रजींत ’This world is so small' महाजालावरच्या उपलब्ध माहितीनं आणखी आणखी जवळ येत चाललेलं ’अलि’चा ऊर्दू मधे अर्थ प्रॉफेट्‌ महंमदाच्या कुटुंबाचा एक सदस्य, एक मुस्लिम राजा, धर्मांतरित पहिला मुस्लिम असा महाजालावर आढळतो तर संस्कृत मधे ’अलि’ म्हणजे भुंगा,( कै. शंकरराव शास्त्री रचित ’मर्म बंधातली ठेव ही...’ या नाट्यपदामधली ’हृदयांबुजी लीन लोभी अली हा, मकरंद ठेवा लुटण्यासि आला..’ ही पंक्ती आठवा ), कली म्हणजे एका युगाचे जसे सत्य, द्वापार, त्रैता तसे एक नांव किंवा मनांत अंकुरणारं ’पाप’ किंवा ’विकृती’ या अर्थीसुद्धा हा शब्द साहित्यिकांनी वापरलेला आढळतो, तर कळी किंवा कलिका म्हणजे उमलायच्या आधीची फुलाची अवस्था.. मातृ, पितृ, भातृ आणि मदर्‌, फादर्‌, ब्रदर्‌ हे सगळे शब्द आपण रोमन लिपीमधे लिहायला गेलो तर अक्षरांमधलं साधर्म्य अगदी सहज जाणवतं. हे सगळ जे मी मांडलं ते कांही माझं स्वत:चं ’ज्ञान’ वगैरे पाजळण्यासाठी नव्हे तर, वार्षिकपरीक्षरोत्तर, आतांच चाहुल लागलेल्या उन्हाळ्याच्या सुटींत, भाषाप्रेमी विशेषत: मराठी-प्रेमी पालकांनी आपल्या पाल्यांना हे ’शोध-कार्य’, संगणक उपलब्ध असेल तर महाजालावरून, किंवा नसेल तर मराठी ’शब्दकोश’ किंवा ’विश्वकोशा’चे उपलब्ध खंड (एव्हांना बहुतेक सगळे प्रकाशित झाले आहेत बहुधा..) चाळतांचाळतां, करण्यास उद्युक्त करावं. महाजाल त्यांना उपलब्ध करून देतांना मात्र, ते नेमकं काय शोधताहेत याकडे ’कडी नजर’ ठेवायला हवी... कारण महाजाला वर संस्काररक्षम जसं बरंच आहे तसंच विकृतिसंवर्धक मोहजालही आहे.. *****

No comments:

Post a Comment