Tuesday, April 24, 2012

’बोला’क्षरे...

’बोला’क्षरे...’ ’विहीरमें घागर पड्या तो हमने वाक वाकके देख्या..तू ने देखा क्या बे ?’ किंवा, ’काऽऽय मर्दा ? बावंतं काय बुचकळून राह्यला गड्या... चल ! रंकाळ्याला जाऊ कि रे..’ किंवा ’कुटं गेला काय की. आत्ता हुता बगा हितं...’ किंवा ’काय ग ! येणीगिणी घालून शाळेगिळेला जायचय की न्हाई ?’ अशी मराठी भाषेची वेगवेगळी मोहक रूपं तुम्ही-आम्ही प्रवासांत, किंवा मुंबई-पुण्यासारख्या बहुसंस्कृतिधारक शहरांत ’चाळ’ किंवा ’फ्लॅट्‌’ पद्धतींच्या राहाणींत अगदी ’सख्ख्या शेजारी’ सुद्धा, क्षणोक्षणी अनुभवत असतो. ’दर दहा कोसावर भाषा बदलते म्हणतांत...भाषा बदलतांत म्हणण्या ऐवजी ’बोली’ बदलते असं म्हणायला हवं खरंतर. ’बोली’मधे शब्दांची उच्चाररूपं बदलतांत तसाच प्रत्येक ’बोली’ला तिचा असा एक विशिष्ट ’हेल’ किंवा Acsent आणि त्या हेलांतचं खरंतर त्या ’बोली’च मोहकपण दडलेलं असंतं. भाषाबदलामधे, ती लेखनरूपांत येतांना, लिपी बदलणं अभिप्रेत किंवा अपेक्षित असतं. जसं मालवणची कोंकणी ही मराठीची ’बोली’ त्यामुळं लिपी देवनागरी, याच समीकरणांनं, ’मराठी’ ही खरंतर, ’संस्कृत’ची बोली भाषा म्हणतां येईल कां ? कारण अनेक शब्दांच उच्चार साधर्म्य आणि ’देवनागरी’ लिपीचा लिखाणासाठी वापर..या न्यायानं ? पण गोव्याची कोंकणी ’जरी’ आपण ’बोली’ म्हणत असलो तरी, जुने गोवेंकर अजून ती लिहितांना रोमन लिपीचाच वापर करतांत. त्यामुळं म्हापसा लिहितांना त्याचा Mapuca, पणजीचं Panjim, वाघदराचं Wagadora अशी रूपं होतांत जसं ब्रिटिशांनी खडकीचं Kirkee केलं तसच कांहीसं. महाजालावर या विषयांत धांडोळा घेतांना एक छान, Interactive किंवा परस्परसंवादक, Site पाहाण्यांत आली. फार गमतीशीर आणि रंजक Site आहे ही. विशेषत:, अनेक वर्षे परदेशांत स्थाईक असलेल्या मराठीभाषिकांना तर या Siteचं Surfing खूपच आग्ळा वेगळा अनुभव देवून जाईल.तुम्ही मुळचे कोल्हापुर, नागपुर, नाशिक, रत्नांग्री, बेळगांवचे असाल तर तुमच्या बोलींतला एखादा अस्सल नमुनासुद्धा या Siteवर Upload करू शकतां आणि त्यावर प्रतिक्रिया मागवू शकतां... याच ’मायबोली’ नावाच्या Siteवरचे, विविध बोलीभाषांतले कांही उतारे तुमच्या अवलोकन/अभ्यासार्थ देत आहे. तुमचं काम ? ते वाचून, ती, महाराष्ट्रांतल्या कुठल्या भगांत वापरली जाणरी बोली आहे ते ओळखायचं... ** १.. "सल्लूभाय. सलाम वालेकूम" "वालेकूम अस्सलाम. सैफू, तू हिकडे खय?" "हिकडे माझ्या बायकोचा घर हय" "आयला, हे मला कसा नाय म्हायती. किती दिसानी मिल्लोस. बोल काय बोलतस." "काय सांगू? मुंबयलाच हव मी. आनखीन जाईन खय? " "येवडो कंटालून नुको बोलू. चल, च्या पीत पीत बाते करु ** २..हटं कटं ? कवर्‍याला घेतरी गं केरी तू ? ** ३..नवरा मुलगा मारुतीच्या दर्शनाला गेला आहे. त्यावेळचा हा वधुपक्षाकडचा २-३ मिनिटाचा संवाद नवर्‍या मुलीचे काका (यांचं नाव देवराव): नवरदेव अर्ध्या तासात वापस येइन अन आपल्याकडचे पोट्टे तं इडल्याच खाऊन राहिले अजून. एकजन कामाचा न धामाचा. सकाड पासनं पाहून र्‍हायलो, कोनी केसं सरडच करते तं कोनी जेल्-फ्येल लाऊन चिपकऊन टाकते. नुसते झामल झुमल करुन र्‍हायले.. काय बे ए जितेंदर, हारं आनले का फूलवाल्याकडून? जितेंदर: आनले नं पप्पा. तुमी आत्तापासुन कशाला किटकिट करुन रायले? भाऊजीकडचे पोट्टेसोट्टे घंटाभर तरी बारातीत नाचतीन मंगच येतीन मांडवात. तिकडे पंडितजी पूजा मांडून रायले, तिकडे पहा नं सगडं ठीक आहे का ते.. देवराव: आता हे कालचे पोट्टे मला आरडरी देऊन रायले पहा. आवं जितेंदरची मम्मी, तिकडे मांडवात पूजा-गिजा मांडून झाली का पाहून या. नवर्‍या मुलीची आजी: कोन भांडून रायलं मांडवात? जितेंदरची मम्मी: कोनी तं नाई वो. न.मु.आजी: नाई तो जितेंदर अन देवराव काय तरी म्हने पूजा आन कोनीतरी भांडून रायली मनून जि.मम्मी: आवं भांडून न्हाई मांडून म्हने ते. न्.मु.आजी: काय बोलते वं तोंडातल्या तोंडात? ही वाली सूनबाई मुद्दामच हडू बोलते मले कडू नाई म्हनुन..देवराव, कोनी भांडून रायलं का मांडवात? देवराव: आँ? मले तर न्हाई माईत. जाऊनच बघतो एकेकाला. जितेंदर: सोनुभैया, ते बुडी नुसती मधात मधात सवाल करत रायते तिला जरा भाएर घेऊन जाशील यार. तिच्यासमोर बोलनं म्हनजे आ बैल मुझे मार. भौत्तीच परेशानी है यार! .** तर ..! लागा कामाला. ओळखा ’बोली’चा प्रभाग आणि कळवा...

No comments:

Post a Comment