Sunday, August 26, 2012

पैलतीर गाठण्या

चित्राधारित मजकूर या छायाचित्रांत, पावसाळ्यांत, सांडव्यावरून ओढ घेत वाहणार्‍या पाण्यांतून दुचाकीवर बसून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य कष्टकर्‍याचे दृश्य आहे. ***** पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन प्रसंगी भेदुन प्रवाहा, पैलतीरा भिडेन पाऊस सुखवी प्रेमीकांना , म्हणति ऐसे जरि जन ... लेउनी मग विरहसयि नक्राश्रु ढाळे तन-मन मांडतो जरि प्रपंचाचा डाव मोहाच्या क्षणी मोडुपाहे कधि कणा मग झुंजतां रात्रंदिनी संकटांना घेउनी पाठीवरी मी धावतो पापण्या ओलावल्या तरि हसूं ओठी धारितो अंदाज नाही पलिकडे मज, काय वाढुन ठेविले भाळरेखा रेखितांना निर्मिकाने योजिले अडथळ्यांच्या अभावी पण काय जगण्याची मजा ? निष्क्रीय, आळशि लोळणे ही धनिकपुत्रांची ’सजा’ रोजचीही जरि व्यथा, तरि वृथा कां आक्रोश मग ? वाट आपुली शोधतांना धडपडे सारे जग धडपडे सारे जग... तेंव्हा या नमनाला धडाभर तेल झालेल्या पंक्तींचा मथितार्थ इतकाच की कष्ट आणि कमाई यांच गणित विणतांना किंवा सोडवितांना, नियती ’पंक्तिभेद’ करतेच ! आणि म्हणूनच मग सर्वसामान्य पोटार्थी माणूस अडथळे ओलांडत किंवा त्यांना सोइस्कररित्या ’वलसे’ घालत, "टाळत’, पडतझडत, ठेचकाळत, अपमान पचवीत पुढेपुढे धावत असतो, नियतीकडे, कुंडलींतल्या गेहांकडे, तळहातावरच्या, निसर्गदत्त रेषांकडे सर्वथ: दुर्लक्ष करीत ! There is no shortcut to success..या इंग्रजी वाक्प्रचाराला पुढे .for the poor. & down-trodden. अशी जोड द्यायला हवी. विविध उत्पादनांच्या जाहिरातींचा पाया हा, अशाच ’यशा्ची शोधयात्रा’ या सूत्रावर आधारित असतो...म्हणजे ’तुम्हाला ते मिळवायचय ना ? मग तुम्ही आमचं हे उत्पादन वापरा...’ ! या विधानांतल्या ’ते’ आणि ’हे’ च्या जागी ’फायदा’ आणि ’उत्पादनाचं’ नांव फक्त भरत जायचं.. उदाहरणार्थ तुम्ही ती बास्केट्‌ बॉल्‌ खेळणार्‍या मुलीची किंवा अ‍ॅथेलेटिक्स्‌ उडीचा(Bench lift jump ?) सराव करणार्या मुलाची जाहिरात पाहिली आहे ? आधी अपयश आणि कांहीतरी ’शक्तिवर्धक’ दुधांतून धेतल्यावर एकदम यशोदीपांचा पंचपंच उष:काल...बालकाच्या आणि मातेच्या प्रफुल्लित मुखावर ! म्हंजी, ’पी हळद आन्‌ हो गोरी’.... है का नाय ? *****

No comments:

Post a Comment