Thursday, August 23, 2012

’दुसरीही बाजू’

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत पावसाळ्यांत,हे. कार्यालयीन कामाच्या वेळेंत संगणकाचा पत्ते खेळण्यासाठी उपयोग करणार्‍या महिला कर्मचार्‍याचे दृश्य आहे. ’दुसरीही बाजू’ आम्हि काय कुणाचे खातो रे । तो धनी आम्हाला देतो रे ॥ रंगला डाव पत्त्यांचा । ग्राहक जरि उभे बिचारे ॥ हा सुयोग्य जागी पडदा । ना दिसतो, कळतो त्यांना ॥ यत्किंचित संशय, शंका । ना भिडे भाबड्या मना ॥ समजतील ’अ’दृश्यांत । मी संगणकावर व्यस्त ॥ परि सदैव गुरफटलेली । निज सुखांसनि मी ’मस्त’ ॥ आम्हि ’निवडक’ नेहमी असतो । बेपर्वा, अन्‌ माजोरे ॥ जरि आम्हा कारणे होती । ’बदनाम’ इतरपरि सारे ॥ हे एक प्रातिनिधिक चित्र.. कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणाचं की ग्राहकांच्या, अशा गैरव्यवस्थेला सामोर जावून धीटपणे प्रष्ण विचारीत त्याचा निषेध करण्याची मानसिकता गमावल्याचं ? सेवा देणारे आणि घेणारे...दोनीही बाजूंची मन, संवेदना ’मेल्या’सारख्या झाल्या आहेत. बरं ग्राहकानं, शब्द, मूक देहबोली, हस्तमुद्रा, मुखावरची साधी नाराजी जरी अशा वर्तनाबाबत दाखवली तरी, डाफरून एकदम ’संघटित’ वगैरे होवून ’सहकारी-संरक्षणार्थ’ क्षणार्धांत. ’वयं पंचाधिकम्‌ शतम्’ असा पवित्रा घेत ’कर्म’(?)चारी तयार. पण या ’चित्रा’ची दुसरी सकारात्मक, खरीखुरी सेवाभावी, कृतिसमर्पित भावनेनं, मिळालेल्या सु(?)विधांबद्दल यत्किंचित नाराजी मनांत न बाळगणारी मानसिकता मी कांही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली आहे. ’बालचित्रवाणी’मधील माझ्या कार्यकालांत, पुणे जिल्हापरिषदेच्या, विविध विभागांतल्या शाळांना शासनानं दिलेले चित्रवाणीसंच, त्यांची नियमित देखभाल, त्यांची सुयोग्य उपयोगिता वगैरे बाबींची खातरजमा करणं हा माझ्या कामाचा भाग होता. अशाच एका भेटीच्यावेळी, खेड-शिवापुरमधल्या एका शाळेंत आम्ही जरा लवकरच, म्हणजे सव्वानऊवाजतांच पोहोचलो होतो. ऐन पावसाळ्याचे दिवस धोधो पाऊस पडत होता..वर्गखोल्या अजून बंदच होत्या. पण समोरची मोकळी अच्छादित जागा उघडलेली होती..दिसलेलं दृश्य फारचं आश्वासक होतं एक शिक्षिका वीसपंचवीस मुलांना त्या व्हरांड्यांत समोर बसवून शिकवीत होत्या.. मी सहज चौकशी केली.. तर मिळालेली माहिती अशी.. शिष्यवृत्ती-परीक्षेची तयारी करून घ्यायला, दैनंदिन वेळापत्रकांत उपल्ब्धी नसते..त्यामुळं या पोक्त शिक्षिका, आपली पुण्यांतल्या घरांतली गृहिणीची सगळी कर्तव्य पार पाडून, सकाळी सातला, छत्री-पिशवी सांभाळंत, राज्य परिवहनाची बस गाठायला घराबाहेर पडतांत.. एकदीड तासाचा प्रवास करून विद्यालयांत पोचतांत आणि तिथं ज्ञानार्जनाच्या शुद्ध हेतून, तीनतीन, चारचार मैल, अर्धवट भिजत, चालत आलेल्या विद्याथी-विद्यार्थिनींची, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतांत. शाळा सुरू व्हायच्या आधी... मी ऐकतांना गहिवरलो, मूक झालो आणि अंतर्मुख सुद्धा.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment