Monday, August 13, 2012

भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एक आठ दहा वर्षांचा बालक, थेट गाईच्या आचळांना जाऊन भिडला आहे...लुचायला भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ कसे तुवा बापा । सोडिले छकुल्याला । भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ माउलीने त्यास । की रागे भरियेले ? धास्तावून भिडले । कपिलाईस ॥ भुकेजला बाळ । जरी नसे तान्हा । तरी शोधे पान्हा । वात्सल्याचा ॥ जणू देवकीनंदन । यशोदेचा कान्हा । गाउलीच्याही भाना । हरतसे ॥ गाउलीच्या डोळा । ममतेचे आंसू । माउलीसही हासूं । आवरेना ॥ तुम्हाला माहीत आहे, हे चित्र पाहिल्यावर मला काय काय दिसलं ? चित्रांत नसलेला, माजावर येवून उधळलेला ’(अ)राजकी’य बैल, अपप्रवृत्तींचा, विकृती-विकारांचा, पापवासनांचा भारवाही रेडा, ’नेते’पणाच्या टोपीखालचे आणि विविधरंगी ’टिळ्यां’मागचे, जनतेला क्षणोक्षणी कुठल्या ना कुठला कारणाने वेठीस धरून ’गर्तेप्रत’ ’नेते’ झालेले, अभागी जनतेमधलेच कांही महाभागी सर्प सदृश गुंड-मवाली आणि... ’ज्ञानदेव’ नावाच्या पायापासून ’तुकाराम’ नावाच्या कलशधारी मानवता-मंदिरांतल्या, मीरा-सूर-कबीरापासून, सावतामाळी, गोराकुंभात, कान्होपात्रा, जनाई, ’पंढरिनाथ’रूपानं, मुगल दरबारी मोहरा घेवून गेलेला महार, अशा सर्व जाती-चर्म-पंथांच्या संताच्या मांदियाळीपासून ते बाबा आमटे, सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसा आदि, जवळ आलेल्या प्रत्येकाची व्यथा, वेदना, खंत, भीती, गंड जाणून घेत त्यांना धीर देत आश्वासक हात त्यांच्या पाठीवर ठेवत त्यांना ’जीवनमार्ग-प्रदीप’ ठरणारी ही वात्सल्यरूपं ! तस पाहिलं तर भूक कुणाला चुकली आहे ? जे जे अंकुरलय, वाढलंय, उमललंय फुलतय त्या प्रत्येक सजीवाला..इथं वनस्पतीही अभिप्रेत आहेत अर्थातच..भूक, तहान आणि निवारा हे जगण्याला जोडलेले अविभाज्य घटक आहेत. ते मिळवण्यासाठी, उपभोगण्यासाठी, ’उद्या मिळाले नाहीत तर ?’ या भीतीने आजच्या घासांतला भाग बाजूला काढून तो राखण्यासाठी रोज ’अहर्निश’ धडपेड चालते या अवनीवर त्यांची ! कुठे हे चित्र आणि कुठे सततच्या यादवी युद्धांत निर्घृण अत्याचार, छळ करीत, हलाल पद्धतीनं मृत्यूचं थैमान मांडीत, खदखदा हांसत ’तोडलेली’ मानवी मुंडकी शीतगृहांत ठेवून त्यावर रोजची भूक भागविणारा इदी अमीन नावांचा, ’नावालाच’माणूस असलेला कॅनिबल्‌, नराधम. तस बघायला गेलं तर ’इदी अमी” हे कोणा एका व्यक्तीचं नाव नसून, ’संस्कृती’ला जबरीनं आणि जरबेनं ’निवृत्ती’प्रत नेणार्‍या एका प्रवृत्तीचं एक नांव आहे. या प्रवृत्तीला छेद देणारी एक चित्रफीत महाजालावर एका माझ्या मित्रानं पाठविलेली मला पहायला मिळाली आणि मी, ’माणुसकी अजून जिवंत आहे’ या भावनेनं आश्वस्त झालो. ’अरे मानसा मानसा कधी व्हशील म्हानूस ?’ असा आक्रोश करणार्‍या बहिणाबाईनं ही चित्रफीत किंवा त्यांतलं दृश्य पाहिलं असतंतर त्यांतल्या व्यथेची धार थोडी कमी झाली असती असं मला उगाचच आपलं वाटून गेलं ! दक्षीण अमेरिकेंतल्या एका समुद्रकिनार्‍यावर एका हौशी ’व्हिडिओग्राफरनंचित्रित केलेली ही घटना..निळ्याशार सागरलाटांचं दृश्य तो साठवत होता..आणि.. अचानक त्या दृश्यांत लाटांवर ’गटागळ्या’ खात, बहुधा ’वाट’ चुकलेले वीस पंचवीस शार्क्‌सदृश मासे किनार्‍याकडे येवू लागले आणि वाळूंत तडफडायला लागले. हे अतर्क्य, अवचित दृश्य नजरेस पदताच सुरुवातीस अचंबित झालेले, समुद्र-पर्यटनासाठी आलेले तरुण-तरुणी, ललना-बाप्ये, अबाल वृद्ध कांही पळांतच भानावर आले. सुरुवातीस एकानं त्यांतल्या एका माशाला, शेपटीधरून ओढत खोल समुद्रांत नेलं आणि त्याला परत ’जलचर’ केलं. ते पाहून अनेकांची भीती, भीड चेपली आणि मंडळी चक्क, ”संकटनिवारन आणि पुनर्वसन कार्या’ला प्रवृत्त झाली. पाहातांपाहातं सर्व च्या सर्व मासे खोल पाण्यांत जावून आपली ’रोजमराकी जिंदगी’ व्यतींत करायला लागले आणिमग किनार्‍याचर्च्या सर्व विघ्नहारी, संकटविमोचकांनी एकचं जल्लोश केला...स्वत:च्या ’जागल्या’च्या भुमिकेवर पशिसित होत, कुणालातरी ’जगवल्याच्या आनंदांत..हर्षविभोर होत.... तेंव्हा आतां, कान्होपात्रेच्या, ’नको देवराया । अंत पाहु आतां ।’ या टाहोमधले ’हरिणीचे पाडसं । व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले । तैसे देवा ॥’ हे चार चरण, संदर्भाधीन चित्र पाहाता.. ’गाउलीची कांस । तान्हे धरियेली । देखता दहिवरली । देवसभा ॥ इवल्याल्या ओठी । प्रपातला पान्हा । जणू शुष्क राना । हिरवा बहरं ॥ मरणाला आतां । करूनी निवृत्त । बासनी बंदिस्त । ठेवू आम्ही ॥’ असे बदलून घ्यावे की काय असा मोह होतो... खरंच असं होईल ?

No comments:

Post a Comment