Saturday, August 18, 2012

Locked Footwear...

दैनिक नवशक्ती मुंबईच्या रविवार पुरवणींतील ’ऐसी अक्षरे’ या सदरांत, मी ’चित्रिका’ हा नवा स्तंभ लिहायला सुरुवात केली आहे. एका विशिष्ट छायाचित्रावरची माझी प्रतिक्रिया यामधे असते. या छायाचित्रांत एका रबरी चप्पल-जोडाला, चोरीला जाऊ नये म्हणून, मोठे कुलूप लावले आहे.. ”चप्पल’, ’वहाण’ हे स्त्रीलिंगी शब्द पण ’जोडा’ खणखणींत पुल्लिंगी ! इंग्रजीत Weaker gender किंवा मराठींत अबला असं वर्णन असून सुद्धा ह्या वहाणेला कां बरं स्थानबद्ध केलय ? ’बिचरी स्त्री आधीच परंपरांच्या ओझ्याखाली ’स्थानबद्ध ! ती कुठं जाणार पळून ? पन पुरुषवर्ग भयभीत आहे अनादि काळा पासून.. कारण स्त्रीत्वाच्या शृंखला तोडून, पुरुषांपेक्षा आक्रमक होत, प्रसंगी मानसिक कणखरपणाचा आदर्श घालून देणार्या स्त्रिया अगदी वेदकालापासून आजतागायत सर्वदूर परिचित आहेत. पहिली ऋचा लिहिणारी अपाला. पहिली ओवी-रचिता महदंबा, पतीच्या रथाचं चांक निखळत असतांना, त्याच्या आरीला स्वत:च्या हाताचा आधार, ऐन युद्धभूमींत देणारी कैकयी, झांशीची राणी, अहल्याबाई होळकर, कित्तुर चेन्नम्मा, इंदिराजी गांधी, कल्पना चावला, अगदी परवांपरवां ऑलिंपिक् पदक जिंकून आणणारी मेरी कोम, अशी विविध क्षेत्रांत देदीप्यमान, आणि प्रसंगी तथाकथित ’पुरुषां’नासुद्धा पराक्रमंच्या शतसूर्यांच दीपदान करणारी ही कांही अत्यल्प उदाहरण ! स्त्री-मुक्ती चळवळीची या स्त्रियांना कधीच गरज भासली नाही. ’स्वातंत्र्य मागायचं नसतं तर ते स्वत:च्या कर्तृत्वानं मिळवत, कमावत उपभोगायचं असतं...विरोधकांच परित्राण करीत आणि समविचारी सहकार्यांच्या स्वातंत्र्यावर गदा ना आणता..’ हे सूत्र या सर्व ’भामिनी रणचंडिकांनी कायम उराशी बाळगलं होतं. याच स्त्रीमुक्ती चळवळीच्या सुरुवातीच्या काळांत किंवा आजकाल स्त्रीभ्रूण ह्याविरोधी चळवळीच्या काळांतसुद्धा, एक अतिशय बोलक्या....केवळ दहा सेकंदांच्याच...मूक-चित्रफितीचा उल्लेख केल्यावाचून मला राहावत नाही.. एक नवजात बालिका...निद्रिस्त अवस्थेंतली तिचे कवळेकवळे हातपाय दोरीनं बांधलेले...गोबर्यागोबर्या गालांमधल्या लालचुटुक ओठांवर एक पांढरी चिकटपट्टी लावलेली...असं हृदय दयार्द्रतेनं हेलावून टाकंणार चित्र दृश्यमान होतं सुरुवातीला ! त्या दृश्यांत एक हात प्रवेश करतो आणि हाता-पाया-मुखावरची बंधनं अल्वारपणे दूर करींत, त्या तान्ह्या जिवाला...बालिकेला मुकत करतो... क्या बात है... कशाला हवेंत शब्द हवेंत विरून जाणारे ? वर्षानुवर्ष हा ’दृश्यसंदेश’ माझ्या कालजांत घर करून बसलाय ! मुक्तीची उक्ती । नका करू मूक । स्वातंत्र्याची भूक । क्रांतिची जन्मदा ॥ *****

No comments:

Post a Comment