Monday, December 17, 2012

’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ”

सदर छायाचित्रांत एक आधुनिक वेशांतला ’साधू’ व्यथित मुद्रेनं उभा आहे.. ’जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज ***** जरि असला भगवा ’भेस’ । जटारूप बांधले केस । हिमालय हजारो कोस । दूर ! आम्हा ठावके ॥ जेंव्हा असू ज्या ज्या देशी । इमान राखू तिथल्या रीतिशी । प्रतिज्ञा मनोमनी ऐशी । केली असे ॥ इमारती मोठमोठ्या । लक्षवेधि मोहक पाट्या । चारचाकि नि दुचाकी छोट्या । जागोजागी भवताली ॥ कृतांतकटकामल ध्वजजरा । जडे जेंव्हा कोण्या नरा । त्यजण्यासि घरा दारा सहसा नसे धजावत ॥ शबनम एका बाहुवर । दुसरा घेइ छडीचा आधार । कालदर्शिका मनगटावर । भान देइ बदलाचे ॥ दाढी-मिशा स्वच्छ नि शुभ्र । तिच्या आड रुद्राक्ष शंभर । कांचामागे सचिंत नजर । संचित जणु वेदनेचे ? चित्त्याची झेप छातीवरी । जणू सांगते व्यथा भारी । तृष्णा, क्षुधा कोण वारी ? समस्त नर-नारी स्वमग्न ॥ निसर्गाचे लहरी चक्र । रक्षिण्या जराजर्जर गात्र । ’भात्यांत’ विराजमान ’छत्र’ । सज्ज असे सदैव ॥ जरी बावळा भाव दिसे । अंतरि कल्लोळ माजलासे । पालथि याने गांवकुसे । घातलि ’शांती’ शोधार्थ ॥ तपाची बदलली रूपे । नशा, व्यसन साधन सोपे । ’संधि’साधु, जनांमजि ’छुपे’ । माजले हो चहुकडे ॥ वास्तव्य असे कधिकाळी । त्यांचे दूर: एकांत स्थळी । जेथे न भेटे ’मांदियाळी । सामान्यांची ॥ प्रस्थान ठेविती हिमालया । कष्टविण्या पार्थीव काया । अध्यात्म-तत्वज्ञानाचा पाया । तपाचरणे शोधिती ॥ आज जागोजागी दिसती । सर्वदूर त्यांची वस्ती । हे कसले वत्स, वाल्मिकी, अगस्ती । फसवे ढोंगी लबाड ॥ जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज । पण समजे समाज । पक्षिराज त्यांना ॥ आजकाल आपल्या नांवां मागे साईं ,सन्यासी साधू ,बाबा,स्वामी,आचार्य,बापू,माँ,आनंद मूर्ती असल्या उपाधि लावून अध्यात्मांतले, तत्वज्ञानांतले आपण ’माहिर’ असल्याचे भासवून, कधी हातचलाखी तर कधी नजरबंदीच्या सहाय्यानं, भोळ्याभाबड्या अंधश्रद्ध भाविकांना हातोहात फसवून, त्यांच्या संसारांतील अडचणींवर मात करण्यांतली हताशा जोखून, मोठमोठ्या नगद रकमांसह पोबारा करण्याचे अनंत प्रकार चालू आहेत. अशा कित्येक (संधि)साधूंविरोधांत न्यायालयांत दावे दाखल होवून ’फसलेल्यां’ना न्याय मिळवून द्यायचे प्रयत्न सुद्धा ’जारी’ आहेत. आतां ते खटले किती दिवस चालणार, निकाल, भाविकांच्या बाजूनं लागले तरी अशांच्या (बरबटल्या) चरणी वाहिलेल्या रकमांपैकी किती परत मिळणार.. मिळणार की नाही, अशा असंख्य प्रष्णांची साखळी समोर आहेच ! अगदी मोठेमोठे राजकारणी, उद्योगपती, कलावंत, बुद्धिजीवीसुद्धा या ’माया-मोहजालां’त अलगद गुंतले, गुरफटले जातांत. कोळियाच्या व्यूहांत । अलगद किडे फसतांत । ’शोषित’ होवुनी परततांत । केविलवाणे, बिचारे ॥ कारण भीती ! सत्ता जाईल की काय, प्रतिस्पर्धी पुढे जाईल की काय, मी वादविवादांत हरेन की काय, माझं गाण, वाजवण, सर्वोच्च ठरलं नाहीतर ? सारखी भीती.. कविवर्य ’ग्रेस्‌’ तथा माणिअक गोडघाट्यांनी आपल्या एका कवितेंत.. जिला सिद्धहस्त संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी अत्यंत समर्पक स्वरावली बहाल केली आहे... आणि दिदींनी म्हणजे लताजींनी तिला आपला अद्वितीय स्वर देउन अजरामर केली आहे... ती कविता हे वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जाते, ’भय इथले संपत नाही..’ माणूस आहे तोवर महत्वाकांक्षा, हांव, गर्व, मत्सर, सूड भावना हे भीतीच्या पोटांतले विकार, विखार बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत, जसजसं वय वाढेल तसे ’पनपणार’च. आणि मग त्यांच्यावर उपाय सांगायच्या बहाण्याने त्यांना खतपाणी घालून, स्वत:चे गल्ले, झोळ्या भरणार्‍या ’साधु’ म्हणविणार्‍यांची रानं माजणारच... नाही कां ?

No comments:

Post a Comment