Wednesday, December 26, 2012

’जोहार मायबाप जोहार’

’जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार’ कां कुणास ठावकी पण नव्या वर्षाच्या नांदीचे चौघडे निनादायला लागायच्या सुमारास ह्या ओळींनी, अचानक माझ्या मनांत कां बरं काहूर माजवावं ? ’बालगंधर्व’ नारायणराव राजहंस, या संगीत रंगभूमी-सम्राटानं अजरामर करून ठेवलेलं पद..’कान्होपात्रा’ या नाटकांतलं (लेखक कै. नारायण विष्णू कुलकर्णी.. ज्यांचा महाजालांतल्या या नातकाच्या माहितीमध्ये कुठेही उल्लेख नाही पण विभानं ..देशपांडे.. माहिती पुरविली..). हे पद मी बर्‍याचवेळेला, नाट्यसंगीताच्या मैफलीच्या अखेरीस गातांना ऐकलय. आणि सुरावट सुद्धा करुण लागते कानाला. त्यामुळं ती भैरवी असावी किंवा कसे अशी शंका मनांत यायची. तसं सुद्धा कानाला सुखावून जाणारं गाणं, ’कुठल्या रागांतलं बॉ ?’ अशी पृच्छा चेहेर्‍यावर घेवून वावरणार्‍यांचा मला खॊप राग येतो. अरे लेको, आनंद घ्या की गाण्याचा.. कशाला त्या व्याकरणाच्या घनदाट जंगलांत घुसता ? पण आज मात्र या नव्या सदराचा प्रपंच मांडतांना, आपल्या किखाणांतून, जर कांही माहिती मिळणारचं असेल माझ्या, ’मायबाप’ वाचकांना तर ती श्यक्यतो अचूकच असायला हवी म्हणून मीही आज त्या ’जंगला’च्या परिघावरून आंत डॊकावून पाहायचं ठरवलं ! त्या साठी अर्थातच, कुणा अधिकारी व्यक्तीचं दार ठोठावणं आलच.. मग हक्काचं माणूस कोण ? डोळ्यापुढं एकच नांव आलं.. म्हणजे तशी बरीचं नावं असतील पण मी आपलं विचारलं, आनंदला.. आनंद भाटे...गळ्यांत जन्मजात गंधर्वस्वर घेवून आलेला.. ’आनंद गंधर्व’ ( याला आनंदगंधर्व म्हटल्या बरोब्बर, एका, निवासानं मुबैकर पण वृत्तीनं पुणेकर, प्रथितयश, पुरोगामीलक्षणधारीदेदीप्यमान साहित्यिकाच्या पोटांत काय दुखलं कुणास ठावे ? पुण्यातल्याच दुसर्‍या एका बालकलाकाराचं कौतुक करतांना त्यानं, ’पुण्यांत गल्लोगल्ली आतां गंधर्व दिसायला लागलेत..’ अशी कुजकट, दुगाणी झाडल्यागत, टिप्पणी, दिल्लींतल्या एका भाषणांत.. हे ध्वनिमुद्रण मी स्वत: ऐकलय हं.. केली, आणि स्वत:ची ’गल्ली’ संस्कृती चव्हाट्यावर मांडली... जे समोरून वार करू धजत नाहीत ते अशा दुगाण्या, मागच्या खुरांनी झाडतांत.. त्यांतून या गृहस्थांना अशा फुसकुल्या, नथींतले तीर वगैरे शस्त्रांचा उपयोग करून, हंशे ’वसूल’ करायची खोड होतीच... असो !) हो ! त्यानं दिलेल्या माहिती प्रमाणे,हा कलिंगडा+बिभास असा मिश्र राग आहे. मनांत परत एक विचार आला. म्हटलं, बापरे दोनदोन ’राग’ असूनसुद्धा, ज्याला जोहार घालायचा त्याचा, करभरणीच्या मोहोरा मोजायला विलंब लागल्यामुळं झालेला संताप, आलेला ’राग’ सुद्धा शमवील अशा शब्दांबरोबरच (रचना-संत चोखामेळा) अशी ही सुरावट देणार्‍या संगीतकारांचं (संगीत-मा.कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन) आणि त्या आर्जव भरल्या (भारल्या ?) गंधर्वकंठातून उमटलेल्या स्वरावलीचं सुद्धा कौतुक तुम्ही आम्ही बापडे काय करांवं ? गंमत म्हणजे संगणकीय महाजालावर..Internet.. या पदाच्या माहिती-आलेखामधे त्याची चाल ’लावणीची’ असल्याचं म्हटलं आहे. असेल असेल. कारण, तुम्ही पठ्ठे बापुरावांची मुंबईची लावणी, मूळ चालींत ऐका.. मी म्हणतो ते तुम्हाला पटतं की नाही ते पाहा ! मी स्वत: बालगंधर्वांना पाहिलय.. मुंबईला राम मारुती रोडवरच्या मालती बिल्डिंग.. मुकुंदनिवास मधे मी राहात असतांना.. त्यांना खुर्चीवरून उचलून आणलव‌त.. खाकी अर्धी चड्डी आणि खादीचा बंडीवजा अंगरखा.. डोकीचा तुळतुळींत गोटा.. गोंडस, निरागस, निर्व्याज, गोल गोबरा चेहेरा... डी. एल्‌. वैद्य रोड वरच्या ब्राह्मणसहायक संघाच्या.. आतां जिथं ’धन्वंतरी रुग्णालय आहे तिथं.. त्या दिवशी रामभाऊंच्या पंडित राम मराठ्यांच्या मुलांच्या मुंजी होत्या बहुतेक.. त्या सोहळ्याला उपस्थित राहाण्यासाठी आलेवव्‌ते ’ते’.. नुसतं पाहेलचं नाही तर गाणसुद्धा ऐकलं त्या दिवशी... त्या गलितगात्र अवस्थेंतकां होईना पण, कंठातला दैवदत्त, रियाजी स्वर थोडाच विरतो ? कंप पावला असेल कदाचित पण कंपन संख्या ? अं हं ती अबाधीतच राहिली होती ! तेंव्हा ते पद म्हटलं होतं त्यांनी, ’जोहार मायबाप जोहारं..’ तरी पण सुरुवातीलाचं, मायबाप वाचकांना जोहार घालतांना, या ओळी का दाटाव्यांतं माझ्या ओठांत ? कदाचित, माझा स्नेही आनंद.. आनंद अभ्यंकर आणि अभिनयाच्या क्षितिजावरचा उगवता तारा अक्षय.. यांना नियतीनं अकाली हे शब्द म्हणायला लावले म्हणून ? प्रत्येक खेपेस सुरुवातीला गुढ्या-तोरणंच उभारायला कशाला हवींत.. ज्यांनी आपल्याला अनंत सुखद क्षण बहाल करताकरता, मंचावरून Exit' घेतली.. त्यांच्या स्मृती अलवार जोजवत कां नाही करायची सुरुवात.. त्यांच्या आशीर्वादानं ?

No comments:

Post a Comment