Tuesday, December 11, 2012

’माहुत असतो मनांत’

सदर चित्रांत, एक, जवळ जवळ ’डांस’ सदृश युवक, संरक्षणदलांतल्या निवडप्रक्रिये दरम्यान, वैद्यकीय चांचणीला सामोरा जातोय... ’माहुत असतो मनांत’ छातीचा पिंजरा पुढं, कणा ’धनुष्मान’ कशासाठी एवढ बाबा उसन अवसान ? जमेल तसा जमेल तिय्हं अंग’कांठी’ वक्र चेहेरे पे पढो तो.. रोजी-रोटी की है फ़िक्र मिळल बाबा काम, जाउन चार घास खा खोटं फुगवुन उर, असं फशिवता येतं कां ? तशी तर जिगर, ताकद नसतांतच बाहूंत जिद्दीच्या हत्तीचा, मनांतच असतो माहूत काळजांत फुलतो अंगार..वार करायचा वेधून स्नायूंना मग आदेश जातो ’वरून’.. मगजा मधून वार्‍याच्या वेगानं फ़िरायला हवेंत हात, बोजड शरीर कस करेल शत्रूवर मात ? तूप-रोटी खाउन उद्या झालो लठ्ठमुठ्ठ आळस म्हणेल ’बेट्या, दाखव शत्रूला पाठ.. !’ आणि सगळ्या कसोट्या उत्तीर्ण झाल्यावर, निवडपत्र मिळून, सेनेंत दाखल झाल्यावर, शत्रु समोर आल्यावर, नायकान, हल्लाबोल’ चा आदेश दिल्यावर सुद्धा, मनांत कुठलीही दुविधा न आणता कार्यप्रवण होण्या आधी, हृदयस्थ हरी, ना म्हणतो, ’लढ जा !’ जोवरि अर्जून कोणता उचलिल ’गांडिव’ स्वकरी भगवंत म्हणे वसतो मनि प्रत्येकाच्या ’ते’ देइल आज्ञा खेचण्यास प्रत्यंच्या कुंभकर्ण, आणिक बकासूर हारले शक्तीपेक्षाही ’त्यां’ युक्तीने जिंकिले एक कथा आठवली... मध्ययुगीन कालखंडांतली. राजा भोज नावाच्या एका पराक्रमी सम्राटाचं नांव बहुतेक सर्वांना परिचित आहे. त्याचीच ही गोष्ट. आतां राजा झाला तरी निसर्गदत्त केशसंभार, डोकीवरचा, चेहेर्‍यावरचा वाढणारच की हो !.. तेंव्हा तो वाढवायचा नसल्यास, म्हणजे त्या काळांत ऋषी, मुनी, साधू संत वगैरे ..म्हणजे कदाचित तपश्चर्येंतून वेळ न मिळाल्या मुळे दाढ्या मिशा, जटा वगैरे वाढवायचे.. ..आणि राजे महाराजे छान, अगदी वळणदार भांग वगैरे पाडून, गुळगुळींत दाढ्या वगैरे करून दरबारांत बसायचे. अर्थातं हे केश-संगोपन संवर्धन कर्तनाचं काम शाही.. म्हणजे ’सरकारनं नेमलेल्या ’नापिता’ कडे म्हणजे केश कर्तनकाराकडे असायचं पिढ्यान्‌पिढ्या ! असचं एकदा राजा भोजाचं केश कर्तनाच काम त्याचा नापित करत असतांना, चुकून वस्तरा गालाला लागून चक्क रक्त आलं आणि वेदनेनं राजाच्या तोंडून, ’स्स..’ असा उद्गार बाहेर पडला. नकळत नापित.. काय अवदसाआठवली त्याला झालं.. ’फिस्स’ करून हसला. राजानं गर्रकन वळून पृच्छा केली, ’का रे बाबा ? एवढ हसूं का आलं तुला ?’ प्रष्ण ऐकतांत नापिताची गाळण उडाली, पांचावर धारण बसून तो चाचरायला लागला. राजानं दरडावून परत विचारलं, ’बर्‍या बोलानं सांगतोस की चढवू सुळावर लेका ?’ महाराज तुम्ही एवढे शूर वीर लढवय्ये.. रणांगणावर शत्रूला कंठस्नान घालतांना शरीरावर एवढे घाव झेलता.. मग साधा वस्तरा जरासा लागल्यावर का दुखलं बॉ ? म्हून वाइच फिसकारलो सरकार ! राजानं हसून त्याला चुचकारलं आणि म्हणाला, ’ठीक आहे ! उद्या भेटू तेंव्हा उत्तर देतो.. ’ नापित सटकला तत्क्षणी, आजचा ’सूळ’ तरी टळला या आनंदांत ! दुसर्‍या दिवशी, राज्याच्या गर्भगृहांत नापित दाखल झाला. राजा भोजानं आल्याआल्या त्याच्या हातांत एक तरवार दिली आणि आपला दंड पुढे करून म्हणाला, ’ हं ! घाल ती तरवार माझ्या दंडांतून आरपार !’ कालचीच ’गाळण-कथा’पुनर्दृग्गोचर व्हायला लागली.. राजा म्हणाला ’करतोस सांगितल्या प्रमाणे की आधी फटके मारून नंतर सुळावर चढवू ?’ नाइलाजानं नापितानं तरवार चालविली.. दंड रक्तलांछित झाला पण राजाच्या चेहेर्‍यावर तसूभरही वेदना उमटली नाही की मुखांतून ती चित्कारली नाही. नापित घाबरून पाहायला लागला. राजानं त्याला हसून सांगितलं, ’काल माझ्या मनाची तयारी नव्हती ती वेदना सहन करण्याची. पण आज मन तयार आहे, कनखर करून दगड केलाय त्याचा.. आता कोणताही वार शरीरावर कुठेही झेलून मी सहन करू शकेन.. समजलं ?’ तेंव्हा.. ! सुज्ञास अधिक सांगणे न लगे ! *****

No comments:

Post a Comment