Tuesday, January 15, 2013

’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’

’मनमोकळं’.. ( तुषार जी कृपया..) *** मोठ्या उत्साहानं योजलेल्या आणि पार पाडलेल्या एखाद्या कार्यक्रमाचा, अतर्क्य मानसिकतेचे प्रेक्षक असा फज्जा उडवितांत. म्हणजे आज ’Big boss आवडीनं पाहाणार्‍या आणि त्यांतला 'इमाम’ नांवांच्या सद्‌(?)गृहस्थांचा, अक्षरश: ’नंगानाच’ लाळा गाळत 'Enjoy' करणार्‍या प्रेक्षकांनासुद्धा मान’सिक’(Sick)तेची परंपरा आहे बरकां ! ज्या वृत्तपत्रानं, १९६३ मधे, मझ नांव, NDA, 31st Courseच्या Batch मधे, जे केवळ दोन उमेदवार ग्वाल्हेर एअरफोर्स्‌ सिलेक्शन्‌ सेंटर्‌ क्रमांक ३ मधून, Officer's Potentiality Test आणि Pilot's Aptitude Test यशस्वीपणे उत्तीर्ण होवून, वायुदलासाठी निवडले गेले त्यांतला एक म्हणून, माझं नांव गौरवानं छापलं, त्यांच वृत्तपत्रांत बरोबर वीस वर्षांनंतर, ’आरोही’संदर्भांत, अर्थाअर्थी माझा कांहीही प्रमाद नसतांना, भलंबुरं छापावं याचं खूप वाईट वाटल..! असो.. पण, प्रत्येक कार्यक्रमांतून, भेटलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वांच्या सहवासांतून, आम्हा सर्व तरुण, अननुभवी पण ऐकण्या-शिकण्याची जबर मनिषा बाळगून असणार्‍या निर्मात्यांची, ज्ञानवृद्धी होत होती.. नकळत ! ’आरोही’च्या दरम्यानं, असचं एकदा पंडित नरेन्द्र शर्मांनी सांगितलं, ’राम और रमा.. पति-पत्नी ! लेकिन भेद कैसा व्याकरणाधारि शब्दसूचित होता है, जानते हो ? राम मे ’र’ यह शक्तिरूप कठोर व्यंजनको आकार दिया गया है, क्यौंकी राम है पुरुष और रमा मे ’म’ जैसे ’मृदु’ व्यंजनको मिला है आकार स्त्रीत्व अधोरेखित करने हेतु. समझे ?’ मनांत म्हटलं आणि प्रत्यक्ष उच्चारलं सुद्धा, विनम्र होवून, ’त्रिवार-वंदन पंडितजी, त्रिवार वंदन.. !’ आतां थोड तंत्राविषयी.. चालेल ना ? १९८१ मधे, कलागारांत एकाच नेपथ्यावर, बहुछायक पद्धतीनं.. Multy-Camera.. पद्धतीनं चित्रितकेलेल्या, कविवर्य सुरेश भटांच्या, कृष्ण-धवल कार्यक्रमांतली दोन छायाचित्र सोबत देत आहे. एक वाइड्‌ अँगल्‌ लेन्स्‌नं घेतलेलं दृश्य ज्यांत, भटांबरोबर देवकी पंडित, श्रीकान्त पांरगांवकर आणि निमंत्रित प्रेक्षकांऐकी कांहीजण दिसताय्‌त, तर दुसरं कॅमेरा झूम्‌ इन्‌ होत फक्त भटांवर केंद्रित झाल्यावर, Fore-ground, soft-focus झालेलं दिसतय. हीच तर गंमत आहे झूम लेन्स्‌ची. अपेक्शित दृश्य समीप जावून दाखवितांना ती आपोआपच बाकीचा, पुढचा-मागचा सगळा फापटपसारा, अंधुक किंवा धूसर करून टाकते. या कार्य क्रमांतल्या सुरेश भटांच्या दोन रचना.. गझल नव्हेत..सुधीर मोघ्यांनी संगीतबद्ध केल्या होत्या. पहिली रंगुनी रंगांत सार्‍या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यांत सार्‍या पाय माझा मोकळा या रचनेंतली एक ओळ तर फारच, ’लाजवाब’ आहे. अगदी भटांच्या अंतरंगाच आणि, स्वत:ला ’भवसागरा’च्या खाईंत लोटतांना, संसाराच्या फाटल्या शिडाच्या फुटक्या होडींत, तुटक वल्ह मारीत, धडपडत, आक्राळ-विक्राळ लाटांमधे पडायला झांलंच तर गटांगळ्या खात, जिवाच्या करारानं ’पैल’ गाठण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्वसामान्य माणसांचं यथार्थ चित्र डोळ्यासमोर उभं करणारी, ’माणसांच्या मध्यरात्री हिडणारा सूर्य मी’ माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा’ तशीच आणखी एक पंक्ती त्यांच्याच एका धगधगत्या रचनेंतली, गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे.. सद्य परिस्थितीतच नाही तर, माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या हृदयांतला अंगार, जिथंजिथं म्हणून सत्तेकडून पिळवणूक होते तिथंतिथं शब्दरूप धारण करीत, कालांतीत झालेला, ... जगभर सर्वदूर.. आणि दुसरी दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले, थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले’ वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली . .मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन्‌ माझी हांक तुझ्या अंतरांत हुरहुरेल तर या गझल कां नव्हत ? सुरेश भटांनीच सागितल्याप्रमाणे, ’रदीफ-काफियाचं Format जमला म्हनजे ग्झल लिहिता आली असं नाही आणि ते तंत्र जरी वापरलं असलं तरी प्रत्येक शेरला वेगळ अस्तित्व, आशय नाही.. कारण, ’रंगुनी’ मधे ’स्व’ सगळ्या शेरमधे तर ’मग माझा’ मधे ’ती’ सर्व(शेर)व्यापी.. !’ मला त्यांची एक गझल स्वरबद्ध करायची होती एका प्रकल्पासाठी म्हणून मी त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलो असतांना त्यांनी हे सांगितलं.. अं हं ! ’बजावलं’ होतं मला..अणि गझल निवडून दिलाव्‌ता स्वत:च्या नव्या संग्रहांतून... लागले डोळे तुझे माझ्याकडे अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे कधी योग आलां तर ’इंद्रधनुष्य’ या त्यांच्या संग्रहांतली, ही खरीखरी ’गझल’ म्हणता येईल अशी रचना नजरेखालून जरूर घाला. मी ती स्वरांकित केली आणि गिरिश जोशीनं ती गायली आहे त्या प्रकल्पासाठी आणि हो ! बर्‍याच रसिकांना माहिती नसेल कदाचित म्हणून सांगतो की, ’मग माझा’च्या आधीचे चार चरण, हे सुधीरनं, सुरेश भटांच्याच संग्रहांतून शोधून सुरुवातीला जोडले होते.. ते इतके चपखल बसले की क्या केहेने ! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment