Thursday, January 10, 2013

काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!

प्रेक्षकांची मानसिकता अभ्यासण्यासाठी, कार्यक्रम संकल्पनेच्या उंबरठ्यावर असतांनाच, त्याबाबतचा अभ्यास अर्थातच, Formative Research आवश्यक असतो हे खरं आहे, पण तो केल्यानंतर सुद्धा अंदाज कोलमडतांत, होरा चुकतो, हमखास यशस्वितेच्या आत्मविश्वासाची, आत्मप्रौढीची दांडी गुल होते, धुंदीचे इमले कोसळतांत पत्त्यांच्या बंगल्यांसारखे.. परवां परवाच्या, भारत-पाकिस्तान क्रिकेट्‌ सामन्यांच्या शृंखलेप्रमाणे... असच, माझ्या एका कर्यक्रमाबद्दल घडलं १९८३ मधे. ’आरोही’ या कार्यक्रमाच्या निर्मितीची सूत्र त्या वर्षी माझ्याकडे सोपविण्यांत आली होती. १९८०-८१ पासून पाठपुरावा करीत, चिकाटी न सोडता, ’प्रभुकुंज’शी आदरयुक्त स्नेहबंध जोडले होते.. फक्त ’मॉं सरस्वती’ ची आराधना हा एकच हेतू मनांत बाळगून. त्यांतून मग ८२ ला बाळासाहेब..हृदयनाथ मंगेशकरांचा.. ’शब्दांच्या पलीकडले’ साकारला होता. तो खूपच गाजला होता. माझीही भीड चेपत चालली होती. माझ्या २३, मुकुंद निवास या मुंबईतींल डबल्‌रूम्‌ मधे येवून, मंगेशकर, पेटी ओढून तासभर, मूडांत येवून गप्पांच्या ओघांत छान गाऊन जाणे इतपत मोकळेपणा उभयतांमधे रुजलाव्‌ता.. त्याच नात्यांतून मी प्रस्ताव मांडला, ’बाळासाहेब, ’आरोही’सुरू करायचाय.. पहिला कार्यक्रम दिदींचा असावा अशी मनोमन इच्छा आहे. शब्द टाकाल कां ?’ छान कल्पना आहे. सांगतो दिदीला. पन अडचण म्हणजे दिदी लंडनला आहे हो. पंधरा दिवसांनी येईल. चालेल ?’ मनांतल्या आनंदाच्या उकळ्यादाबत म्हटलं, ’चालेल ? पळेल, पळेल..’” मग लागा तयारीला’ चला ! बालेकिल्ला तर सर झालाव्‌ता. कार्यालयांत मानस आंणि मिळालेला ’होकार’ कळतांच सगळेच सुखावले.. हुरूप आला’गाणी कुठली ? नेहमीच्या घिसीपिटी चित्रपट गीत ? अं हं त्यापेक्षा ’आरोही’ला नवी ओळख देणारी, स्वराच्या पावित्र्यानं श्रोते-प्रेक्षकांची मनं उजळून टाकणारी, कबीर-मीरादि संत कवींची तीन, आणि पंडित नरेंद्र शर्माजी रचित दोन, अशी योजना केली बाळासाहेबांनी. संगीत अर्थातच बाळासहेबांचं.. ध्वनिमुद्रन ’बॉम्बे लॅब्‌’ च्या ध्वनिकलागारांत करायचं ठरलं. बहुतेक १५,१६,१७ जुलै ८३. दिदी जवळ जवळ १५/१६ वर्षांच्या ’गॅप्‌’ नंतर अवतरणार होत्या तिथं. तिथंही मंडळी आनंदविभोर होती. बी.एन्‌. शर्माजी.. मुख्य मुद्रक.. तर जवळ जवळ सद्‌गतींत झाले होते. मधून मधून बाळासहेब मला सांगायचे, ’ दिदीचा फोन आलाव्‌ता.. म्हणाली काकतकरांना सांगा मी नक्की येतेय्‌.. कालजी करू नका..’ हे म्हणजे, सुदाम्याच्या झोळींत, हिरेजडित-सुवर्णपात्रांसह पंच पक्वान्नांच भोजन-दान पडल्यासारखचं होत बॉ मला तरी..! मुद्रनाच्या पहिल्या दिवशी सगळे उच्चश्रेणी वादक, वाद्यमेळ संयोजक अनील मोहिलेसह वेळेंत हजर झाले. दिदी आल्या. शर्माजी..बी.एन्‌.. नी पुष्पगुच्छ देवून स्वगत वगैरे केलं. व्हॉइस्‌-रूम्‌ मधे जातांना उंबरठ्याला अडखळून ठेच लागली त्यांच्या पावलाला. ’नोच आगई घुटनेमे, और मेरी घुटन बढने लगी.. धावपळ.. मला घाम सुटला.. Cold sweat..आणि हातपाय गार पडायला लागले..’ बर्फ आणा, बर्फ आणा..’ ! बर्फ आला... मग मी सेवेची आणखी एक संधी घेतली...’बालासाहेबांकडे बघितलं.. बाळासाहेबांनी नजरेनं होकार भरला आणि मी मग हळुवार हातांनी दिदींच्या घोट्यावर बर्फ फिरवला.. एक मंद स्मितरेषा उमटली त्यांच्या चेहेर्‍यावर आणि आजूबाजूच्या तीसचाळीस लोकांनी, ’हुश्श !’ केलं. नंतर तीनही दिवस सुविहीत मुद्रण झालं. बरोब्बर आठवड्यानं..२४ जुलैला चित्रीकरण निश्चित झालं होतं चासकरांनी खास सुशोभित मंच उभारला. प्रकाशयोजमा झाली.. सकाळपासून पाऊस रिपरिपत होतांच दुपारी १२ पर्यंत त्यानं रौद्र स्वरूप धारण केलं, त्यांतच भरतीची वेळ..वरळी भरली पाण्यानं... कशा येणार दिदी पेडर्‌ रोड्‌ वरून... परत काळजी.. संधी हुकते की काय.. पण कशी कुणास ठावूक.. ’सरस्वती’ अवतरली कलागारांत.. परत एकदा सगळ्यांच ’हुश्श !’प्रेक्षकांत होते खुद्द पं.नरेन्द्र शर्मा, शशिकला, सध्याच्या दोन प्रसिद्ध गायिका, देवकी आणि पद्मजा, पुण्याची गायिका अनुराधा मराठे, ठाण्याला रेल्वे ’ठप्प’ झाल्यावर माझी पत्नी तिला घेवून मुलुंडला आली आणि मग ’टॅक्सी’.. काय करणार ? छान ’एन्ट्री’ वगैरे घेतली दिदींची मंचावर आणि पांचही गाणी रेकॉर्ड्‌ झाली... सूत्रसंचालिका होती स्मिता..स्मिता पाटील.. तिच निवेदन नंतर तिच्या सोईनं रेकॉर्ड्‌ केल आणि संकलनोत्तर कार्यक्रम प्रक्षेपित झाला... दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून.. खूप खूष होतो स्वत:वर मी... पण दुसर्‍यादिवशी, मुंबईच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं, मोठ्ठा मथळा देवून फोटोसकट ’धिंड’ काढली माझ्या कार्यक्रमाची.. ’लताचा आरोही आणि चित्रपट गीतं नाहीत ? काकतकरांनी केली घोर निराशा रसिकांची.. !!’

No comments:

Post a Comment