Monday, January 26, 2015

।।भासबोध।। २३४ ते ३०३

व्याघ्रादिकांचि वृत्ति श्वापदी । कवळ कवळून करिति जायबंदी । नरडे फोडोनि होती आनंदी । शोणित-प्राशने ।। २३४ तैसेची तथाकथित 'समाजकारणी' । लटक्या प्रेमभरे कुरवाळुनी । करिती काळेंना अत्याचारी करणी । जैसा फुकरे मूषक ।। २३५ सगेसोयरे, आप्तेष्ट। नित्यनेमाने वास्तपुस्त । करत राहावे कर्म रास्त । सर्वांस जे हितकर ।। २३६ कर्म-कर्तव्य प्रामाणिकपणे । गृहस्थाश्रमी करीत राहाणे । बाळ-गोपाळ, अस्तुरी सुखविणे । हीच आमुची जीवनकला ।। २३७ ।। दास-वाणी ।। भिक्षेने वोळखी होती । भिक्षेने भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०२/१३ गावोगावी, घरोघरी भिक्षा मागितल्यामुळे महंताचा जनसंपर्क वाढतो. लोकांच्या मनातील धर्माविषयीचे भ्रम महंत दूर करू शकतो. अत्यंत कमी मोजकीच भिक्षा महंत घेत असल्याने गरीबाला सुद्धा आर्थिक बोजा न पडता पुण्यप्राप्ती होते. (आताच्या काळात महंत म्हणजे कार्यकर्ते, भिक्षा म्हणजे सभासदत्व व देणगी घेणे) उदरनिर्वाहासि मागण्याने भिक्षा । दास म्हणति रुंदावते संपर्ककक्षा । परगृही शिजले ते 'मोक्षा' । कष्ट टाळोनि मिळवीलं?।। २३७ सद्यकाली नाकारला 'चंदा' । तर तोडफोडती उदिम, धंदा । गुन्हे करोनि परागंदा । होती कार्यकर्ते महंत ।। २३८ हेरोनि तोरणे,माळा, उत्सव । त्रस्त करिता अबालवृध्द बांधव । 'राजा'श्रयासि ही एकच ठेव । गांवगुंड 'महंतां'कडे ।। २३९ हा असला 'उपदेश' । कर्मयोगी साधकास । देशोधडीला हमखास । लावेल ना ? सांगा बरें !।। २४० ।। दास-वाणी ।। मरणाचे स्मरण असावे । हरिभक्तीस सादर व्हावें । मरोन कीर्तीस उरवावे । येणें प्रकारें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/१०/१३ कधीतरी आपण नक्की मरणार आहोत.आपल्या चांगल्या वाईट कृत्याची वर कुठेतरी पक्की नोंद होतीय ही जाणीव म्हणजे मरणाचे स्मरण. व्यावहारिक, प्रापंचिक, सुखविलासापेक्षा जो हरिभजनात प्राधान्याने दंग असतो अशा उत्तमपुरूषाची कीर्ती तो मृत्यू पावल्यावरही खूप काळ टिकते, वाढतच जाते. मरण कसले ?, म्हणाना 'मोक्ष' । 'आत्मा' शोधितो नवा 'कक्ष' । अध्यात्माला कोरे 'भक्ष' । आपोआप ।। २४१ कशास हवी, कुणास कीर्ती ? सय येतां पांपण्या पांणवती । हृदये आप्तस्वकीयांनी हेलांवती । पुरेसे असते जनसामान्या ।। २४२ स्मरण कोणाचे ? किती ? कृत्ये विविधांगी करिती । प्रमाणांत त्यांच्या, व्यक्ती । राहती आठवांत ।।२४३ गद्गद होवुनी कुणी वंदे । आठवुनि जखमा कुणि क्रोधे । उच्चारण्या अपशब्द, ओठामधे । कर्माजोगी प्रतिक्रिया ।। २४४ नको कीर्ती नको पुतळे । टाळक्यावर बसतिल कावळे । 'कावकाव'त मिळुनि सगळे । मुद्रा भरतिल विष्ठेने ।। २४५ जगण्याची कला कां 'शिकविता'?। सहज श्वासना सारिखी असतां । 'रवि'तेजातळि रोज घडतां । 'शंकर' काय करील ? ।। २४६ शिबिरे की नृत्यांगणे ? । कालापव्यय विनाकारणे । द्विजास अवकाशी झेप घेणे । शिकवणारा एक मूर्ख ।। २४७ फोडिता शब्दांची अंतरे । त्यांतूनि प्रसवतील धनधान्यांची कोठारे ?। सुखावतील अस्तुरि आणि पोरे ?। क्षुधाशमनोपरान्त ?।। २४८ संधी गरजूंना काबाडकष्टांची । त्यांतूनि चरितारार्थ अर्थार्जनाची । भवसागर तरून जाण्याची !। व्हा प्रदीप त्यस्तव संतहो !।। २४९ म्हणे 'अध्यात्मिक अनाथ' । आणि सद्गुरू तारिल धर्माचरणांत । पण जगण्यासाठी घास ओठांत । देइल ऐसा गुरू ?।। २५० उपदेश हवेंत विरेल । जर श्रोता पुढती नसेल । भरल्या पोटीच सहसा पचेल । व्यर्थ बोध वा भक्तिधारा ।। २५१ आधी भागवा शारीर गरजा । विशेषत: चालना देण्या मगजा । सजग करण्या चेतना,संवेदना, समजा । तवान हवे ना तन-मन?।। २५२ होईल साध्य, की राहील स्वप्न ?। ज़रि अर्पिले तन-मन-धन । जैसे ज्याचे कर्मावगुंठित प्राक्तन ।च तेचि पदरी पडेल ना ?।। २५३ भव्य आकार जरि बहिर्रूप । हृदयांत वात्सल्य, माया अमाप । विघ्नहर, आपदांचा सकोप । संहारकर्ता ।। २५४ चंद्रगुप्तासि चाणक्य जैसा । शिवरायांसि समर्थ तैसा । सत्तेसाठि नाहि पसरायचा पसा । मिळवायची लढोनि, हा केला उपदेश ।। २५५ शुंडेंत एकवटली शक्ती । कर्ण विस्तीर्ण उत्सुक ऐकण्या स्तुत्योक्ति । नेत्र किलकिले तरि तीक्ष्ण दृष्टी । पांखर सदैव भक्तांवरी ।। २५६ लंबोदरांत सहज रिचवे । सेवा जे करिती मनोभावे । ऐशांचा अपराध संभवे । जरि अनवधानें ।। २५७ ऐसी ठेवावी गुरुने धारणा । ज्ञानतृषार्था शिष्य म्हणा । जळनिधी जगति कधि कोणा । अव्हेरतो कां ?।। २५८ योग्यता जोखावी गुरुंची । तेथे 'आवड-निवड' त्यांची । तीक्ष्णबुध्दी शिष्योत्तमांची । क्षीणबुध्दी बालकांवर अन्याय ।। २५९ भेगाळल्या भुईवर बीज रुजवी । निगराणी करुनि फुलवी, फळवी । झेलण्या वादळ-वारे मार्ग दावी । तोचि कसबी कृषिवलां ।। २६० धरुन हाती हिरा मुळांतला । घासुनि-पुसुनी चमकविला । 'वल्गना' करितो, 'मीच घडविला' । तो कसला गुरू ?।। २६१ मोकळिली सर्वत्र शारदा । विविध विद्याशाखांची संपदा । ज्ञान-विज्ञान, कर्मयोग, व्यवसायीसि सर्वदा । वरदायिनी ।। २६२ कळाकुसर, तंत-स्वर-ताल । ज्ञान भारले भवताल । अनंत अवकाशाचा तोल । शारदा सहजी सांभाळी ।। २६३ शाश्वती, रक्षण, दायित्व । वात्सल्य, प्रिती, ममत्व । कर्तृत्व, दातृत्वादि तत्वं । अंतरंगी उपजवी ।। २६४ असो राजा वा रंक । अनाकारण कुणा डंख । करू पाहेल ! तर हकनाक । सर्वनाश अटळ ।। २६५ जगा, जगूद्या हे सूत्र । मानवतेचा आधारमंत्र । अत्याचारासि दया मात्र । दुरापास्त ।। २६६ राम होता ना देव ?। मग चंद्रप्राप्ती कां झाली असंभव ?। झाली प्रतिबिंबित कल्पनेची धाव । कौसल्या मायेची ।। २६७ म्हणे होता बालहट्ट । वसतो जो 'बिंदू पासुनि सिंधूंत । बाल, युवा वा जर्जराशक्त । 'देव' कसा असेल हो ?।। २६८ विरंगुळा कथेचा रयतें । करमणूक आयती होते । परस्पर 'कार्य' सिध्दीस जाते । भाकड भाटांचे ।। २६९ संकटे झेलीत राज्ञी सीता । परपाशांतुन सोडवुनि आणिता । झाला राम आज्ञा करिता । अग्निदिव्याची ।। २७० रापाच्या मिशें वणवे । लाविती कृषिवव अननुभवी नवे । भडकतां अवघे रान पेटवे । विक्राळ पावक ।। २७१ अमर्यादित त्याची व्याप्ती । मरुतादी भूते साहाय्य करिती । शमविण्यासि जळनिधी अपुरे ठरती । प्रसंग बांका ठाकतो ।। २७२ कर्मोत्तरीच अनुभव । तोचि जाणा योग्य 'देव' । त्याचाच जर असला अभाव । तर 'शोधेनि गवसेना' अशी स्थिती ।। २७३ केवळ म्हणे पदस्पर्शाने । शीळेंतुन अहल्येस मुक्त केले । मग स्वपत्नीस कां म्हणे । धाडिले वनांत ? ।। २७४ प्रष्णांची उत्तररामचरितांतं । उत्तरे सारी मिळतांत । आणि सिध्द करतांत । 'मनुष्य'पण रामाचे ।। २७५ म्हणोनि जरि दिसला नाही । कल्पनाचक्षूंनि न्याहाळी पाही । शब्दरूप 'त्या' ला दई । रसिकांसाठी ।। २७६ मात्र जाणा त्यांतील सत्य । ते कल्पनेचेचि क्रीडाकृत्य । 'दिसला, पाहिला', गर्जोनि नृत्य । आनंदविभोरें करू नका ।। २७७ काव्य, गीतांत बहुतेक । फसव्या प्रतिमा अनंत । सत्य प्रतिबिंबाचीचं भ्रात । तेथ नेमकी असते ।। २७८ उपमा, उत्प्रेक्षा, दृष्टांतादी । अनुप्रास, रूपक अलंकारांची यादी । लेखक, कवि, बुध्दिवादी । वसते याच्या संग्रही ।। २७९ विणोनि कल्पनाविश्वाचे जाल । हे सुखाशांचे दलाल । भाबड्या रसिकांसाठी कलाल । सहजी होती ।। २८० चढवुनि होता पुरेपूर नशा । 'गल्ला' जमता गुंडाळिती गाशा । वाचकास सोडोनि प्रदेशा । अतर्क्य, अनाकलनीय अनुभवण्या ।। २८१ जय जय भास्कराचार्या । अपाला वदली प्रथम आर्या । वेदरचनेच्या महत्कार्या । आरंभिले जिने ।। २८१ जयतु सुश्रुत शल्यचिकित्सक । अश्विनिकुमार, औषधोपचार संशोधक । कृषि, अवकाश वैज्ञानिक । जगणे सुखविण्या जे झटले ।। २८२ कोणास आत्मा मुळांत । दिसला, जाणवला भवतालांत ?। परमात्म्याचे कां मग 'भूत' । व्यथितांच्या गळी उतरविता ।। २८३ जगतों, चालतो, बोलतो । हसतो, खंतावतो, वेदना रिचवितो । संसारावर पांखर धरितो । तो धैर्यशील ।। २८४ 'संत' पण काय वेगळे ?। अतर्क्य बडबड, अगम्य जाळे । त्यांत भाबड्यांना ओढण्याचे चाळे । करिती ते संत ।। २८५ संकटांत अविचल । सुकाळांत सुखे भोगीत । आकंठ बुडला संसारांत । तो खरा 'संत' ।। २८६ वाटते कां कमीपण ?। अभ्यासण्या त्यांची शिकवण । अनुभव, वागण्या-बोलण्यांतुन । कां दुर्लक्षिवा कथित 'संतांनी ।। २८७ वक्ता वक्ताचि नव्हे श्रोतेविणं । समोरचा ज्ञानतृषार्त जनगण । तृप्त श्रवणाने मन । समाधान पाहिजे पावले ।। २८८ प्रारंभी रीझवावी अंत:करणे । मग आकर्षूनि आशयाप्रत नेणे । उपसंहारे प्रोत्साहित करणे । असा क्रम सामान्यतः ।। २८९ कुणा कमी न लेखतो । स्मितभाष्यें सर्वांस सुखवितो । नेत्रांतली उत्कठा जाणितो । वक्तादशसहस्रेषु ।। २९० त्यां हृदयीचे स्वहृदयी रुजविती । रसिकत्वा परस्पर येइ भरती । देउ-घेवोनि समृध्द होती । वक्ते, श्रोते ।। २९१ जो संसारी आप्तांसाठी झटला । त्याने नाही कां परमार्थ साधिला ?। जपजाप्य, उपासनेसि नाही बसला !। बिघडले कोठे ?।। २९२ चिंतन चिंतांचे केले । वारण्यास उपाय शोधिले । भवसागर करून गेले । ते कर्मयोगी परमार्थी ।। २९३ जो ज्या जागी स्थित । करीत राहतो कार्य विहित । तोचि रोजच्या जगण्यांत । परमोच्चपदी ।। २९४ कोणी पाहिले जन्म अनेक ?। काय असते त्याचे प्रमाणक ?। कशाल मग स्मरता चार्वाक ?। म्हणे 'तत्वज्ञानी आम्ही' ।।२९५ शब्दरत्नाच्या भांडारा माजी । सद्यकाली वसती माझी । आपोआप वीण त्यांची । उपजवी आशया ।। २९६ स्वर-शब्द उठविती तरंग । उचंबळविती अंतरंग । अमूर्त आनंदाचे भाग । पिसे जडवित उधळिती ।। २९७ स्वरभारित आसमंत । रसिकत्व होई उत्क्रांत । ज्ञानेंद्रिये कांठोकांठ तृप्त । पांपणीकांठी दहिवर ।। २९८ हे तो होय सत्कीर्तल । हरेक पावला पुनर्तवान । विस्मरण्या शरीरे नि मन । आपदा विपदांना ।।२९९ थकले वाटे हृदय, मगज । क्षणिक विश्रामाची गरज । सप्तशतकी लहरींची गाज । भारतसे अंतर्मन ।। ३०० पुन:पुन्हा पुनर्जन्म । कशास सारखे स्मरण । एकदाचि असते मरण । कां पांडिता भ्रमांत ?।। ३०१ अक्षरे वाचू लिहू लागली । भाबडी शिक्षणाने सरसावली । आंता अंधश्रध्दांची काळी बाहुली । नको वाटे त्यांना ।। ३०२ आतां आवरा भाकडे । ना तर म्हणतिल 'खोटारडे' !। भिऊनि पाउल वाकडे । ना टाकेल कोणी ।। ३०३

No comments:

Post a Comment