Monday, January 26, 2015

।।भासबोध।। ३०४ ते ३१७

आपदा, विपदांचा होता उद्भव । आरडतांना 'देवा धाव' ?। छकुले रडते मातेस्तव । कां मग रागेजता ।। ३०४ नजरेआड झाली माय । तर तान्हे मोकलते धाय । उभे ठाकते कसले भय ?। कुशींत घेईल कोण ?।। ३०५ प्रारंभी कल्पना, मग हुंकार । हुंकारोत्तर अक्षर, उद्गार । पाठोपाठ शब्दमोहर । आशयपरिमळ दरवळे ।। ३०६ बीजांकुराचा उद्गम । प्रवाहस्रोताचे धाम । तर्क-बुध्दि-चातुर्याचा आगम । शुंडाधारी सुंदर ।। ३०७ थेंब आधी, संततधार नंतर । पागोळी ठिबके तळ्यावर । होड्या। सोडित, जणू जळचर । भासती बालके ।। ३०८ तानसेनाची आर्त तान । जर करील शेष श्रवण । डोलू लागेल हरपून भान । हा हा:कार अवनीवरी ।। ३०९ निसर्ग मग जाणीवपूर्वक । झाला परित्राण योजक । शेषास श्रवणेंद्रिय धारक । सद्हेतूने नाहि केले ।। ३१० प्रलयांतुन प्रसवण्या प्रसन्नता । चिंतामुक्ती देऊन चिंताक्रांता । भवसागरी तारक 'नेता' । सर्वदा होतो लंबोदर ।। ३११ पसरिता पसे दोन । जो देतो भरभरून । नाही पाहात मागे वळून । तोचि गुरु खरा शिष्याचा ।। ३१२ आधीच अवघडल्या शरीरी । कष्टविते गर्भधारी नारी । सांकडे घालण्या द्वारी । प्रस्तराच्या ।। ३१३ राम ना, ना दास, ना मी समर्थ । जाणिला, आकळला जेवढा अर्थ । ओवी, उपदेश सद्यकालांत सार्थ । असे-नसे जोखिले ! इतुकेची ।। ३१४ मी मतिमंद, मूढ लेकरू । भ्रांत भुकेची ! काय करू ?। कष्टसाध्य भाकरिचा आधारू । कोण देइल जगण्याला ।। ३१५ जपजाप्य, नामस्मरण खूप केले । परि कांहींच ना साधिले । क्षणोक्षणी दिवस वाया गेले । फुकाची व्यथा ।। ३१६ गति वाढली, झाला कपाळ'मोक्ष' । माळेत ओवुनी, विविध मुखी रुद्राक्ष । पोथ्यां-ग्रंथ घेउनी हेरणारे भक्ष । 'अध्यात्मिक' कल्लोळ आसमंती ।। ३१७

No comments:

Post a Comment