Saturday, January 3, 2015

।।भासबोध।। २०१ ते २२१

न केले अपेयपान । वा कधि अभक्ष भक्षण । पूजिली अवघी श्रद्धास्थानं । अकाल काळाघात टळेना ।। २०१ आनंदे जगला स्वच्छंदी । रंगला भिजला सुस्वरनादी । 'तृप्त मी ! घेउदे समाधी' । विनवणी परि ऐकेना ।। २०२ सूर्यकिरणां उगमस्थळि विघटिते । जळबिंदूतुन सत्व शोषिते । व्यघिविनाशक सहजचि होते । शुध्दस्वरूपी प्राशिता ।। २०३ (सूर्यपादोदकम् तीर्थम् जठरे धारम्यांमहं ।।) विरघळता हितकर क्षार, वायू । जळांत ! निरामय होण्या आयु । प्राशिता, कृत्रिम औषधी, उपायू । अनावश्यक ।। २०४ रुजल्यावर सहजचि वृध्दी । स्थैर्याची सखि समृध्दी । अस्तवेळि विकार, व्याधी । स्नभाविक जीवनक्रम ।। २०५ लिहिणे केवळ हव्यास । नका म्हणू, 'हा व्यास' । कक्षेचा विस्तारणे व्यास । जगण्याच्या ! हा हेतू ।। २०६ म्हणून अनुभवत जगतो । डोळसपणे जागर करितो । खंतावतो, उचंबळतो, रागेजतो । कल्लोळ अंतरी माजता ।। २०७ कुणि अवकाश वैज्ञानिक । कुणि सावकाश अज्ञान मानक । दोघेही निवडले पुरस्कारार्थ । साहित्यतीर्थे ? अचंबा !! ।। २०८ कुणि शतकी शतक खेळे । कुणि डबक्यांत वळवळे । दोघे एका मंचावर ? आगळे । दृश्य याहून कैचे ।। २१० कुणि स्वरांची मांडी दुकाने । वाहिन्यांच्या वाऱ्या करित नेमाने । थोरांच्या बाह्या धरुन राहाणे । धर्म निष्ठेने आचरती ।। २११ आग्रह असतो पुण्यनगरींत । 'भूषण' म्हणावे त्यां, ऐसी रीत । नामचीन साहित्यिक अडगळींत । कुरवाळित स्वाभिमान ।। २१२ 'सरले' म्हणता कां सरिते । प्रवाहित राहावेच लागते सरितें । भविष्याची आव्हाने पसरिते । कर्म-कर्तव्य पूर्ततेची ।। २१३ तोचि सूर्य, तीच आभा । निळाईही आश्वासक तीच नभा । मनि धरोनि लाभ, लोभा । पळत सुटूं नित्यासारखे ।। २१४ तेच तेच सारे सारे । ठाई ठाई चराचरे । कर्म-कर्तव्याच्या उभारे । म्हणू, 'उत्तिष्ठत, जाग्रत' ।। २१५ परत परत सा रे सा रे । म ग ध नी प्रेमभरे । अवनीवरी तेजोभरे । तैसाचि पसा उजळेल ।। २१६ आकडे पुढे चालले । उदयास्त रोज पाहिले । अर्थहीन पळ जगलेले । भेडसावति आतांशा ।। २१७ हा मोजायाचा खेळ । चालेल असा किति काळ ?। त्यांतच चिरनिद्रा भूल ?। मिळो आंता !।। २१८ मावळती-गुलाल सलीलां । यमुना तीरी रासलीला । मधुराभक्तिच्या विविध लीला । रंगती गोकुळी ।। २१९ म्हणे अध्यात्माने आत्मोंन्नती । अर्थार्थ कर्मापासोनि मुक्ती । ज्यची नियत करंटी । तोचि जाणे घेऊ ।। २२० आत्मोन्नत मुक्ती फसवी । डोहाळे भिकेचे पुरवी । दारिद्र्याचे अस्मान दावी । आप्त-स्वकीयां ।। २२१

No comments:

Post a Comment