Wednesday, May 9, 2012

’रंगधून’...एक इंद्रधनुषी अनुभव

’रंगधून’...एक इंद्रधनुषी अनुभव साहित्यिक, रंगकर्मी, गायक, नर्तक, वादक, मूर्तिकार आदि कलाकारांना व्यक्त होण्यासाठी निसर्गानं प्रतिभेची देणगी दिलेली असते. म्हणजे चक्षूंकरवी साठविलेली दृश्ये, श्रवणेंद्रियांकरवी साठविलेले नाद, रसनेकरवी साठविलेल्या चवी, घ्राणेंद्रियाकरवी अनुभवलेले गंध त्वचेकरवी अनुभवलेले स्पर्श, या सगळ्यासगळ्यांना आपल्या जन्मजात प्रतिभेच्या साहाय्यानं मोहक, लक्षवेधी, असामान्य शब्द-रंग-नादरूप देवून ते रसिकाभिमुख करण्याची यशस्वी किमया त्यांना साधलेली असते. ’काठोकाठ’ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या’ या काव्यपंक्तीप्रमाणे त्यांच्या प्रतिभेच्या ’मोहाच्या’पेयाला एकाच कलामाध्यमाच्या पेल्यांत बंदिस्त राहिलेलं रुचत नाही आणि मग ते ’फेस’रूप वायू होवून मुक्तपणे उसळायला लागतं. मूलत: आवीष्कारप्रवण बुद्धिधारक असल्यामुळे, व्यक्त होण्याची माध्यमं अपुरी पडायला लागली की. ते, व्यक्त्यार्थ अन्य माध्यमांचा धांडोळा घ्यायला सुरुवात करतांत. आमचे ज्येष्ठ मित्रवर्य कविवर्य-संगीतकार-गायक-पटकथालेखक-अभिनेते-दिग्दर्शक आणि शेवटी, अत्यंत महत्वाच म्हणजे एक उत्तम संवेदनशील, सहृदय माणूस आतां त्यांना जे म्हणायचं आहे ते रंगांत मांडू पाहाताहेत. गेली दोन-अडीच वर्ष ते या ’रंगधून’ मधे विभोर आहेत. आणि शब्दभावा पासून ते रंगभावा पर्यंतचा हा गेल्या जवळजवळ पांच तपांचा प्रवास, प्रत्येक न्यासावर पक्केपणानं, स्वत:ची खास नाममुद्रा आणि वेगळेपण कोरत झालेला आहे. त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या कलाकृती पाहून या विधानाची सत्यासत्यता सहज पडताळता येते. सुधीरच्या शब्ददूनचा जन्म माझ्या मुंबईतल्या घरीच झालेला याची देही-डोळा-कानी मी अनुभवलाय. एखाद्या पुष्करणींतल्या निर्मळ, नितळ, अनंत-अगम्य आभाळाला प्रतिबिंबरूपांत स्वत:च्या अंकावर सामावून घेणार्‍या जळांतून बुडबुडे उर्ध्वगामी होत, फुटावेत आणि त्यांतून जाई-जुई-मोगर्‍याच्या मंद सुगंधाबरोबरच, कवठीचाफा-सुरंगी-केवड्या सारखा कांहींसा ईग्र-उन्मादक सुगंध ’उमटावा, तशी ही ’धून’ प्रवाहित होतांना मी पाहिली आहे. कविवर्य ’बाकीबाबां’च्या शबदांत थोडा बदल करून म्हंणावसं वाटलं त्यावेळी ’कवी घरी आल्याचे शब्दांना कळले आहे, त्यांचे अवगुंठन आतां ढळले आहे’ ’पंडित’, ’अभिनेता’ ह्या किंवा तत्सम उपाधी, स्वत:हूनच आपल्या नांवाआधी लावण्याचा खटाटोप, चढाओढ, आजकाल कुठलही पांडित्य नसणार्‍या ’न’कलाकारांमधे लागलेली आपण पाहात आहोत. अशा ’कलि’युगांत सुधीर सारखा सर्जक-चैतन्य, उमेद, उत्साह, सकारात्मक स्रोतांनी सळसळणारा ऋजु व्यक्तिमत्वाचा ’तरुण’ बघीतला की वाटतं प्रत्यक कलाक्षेत्रांतलं त्याचं पदार्पण हे कवळ्या लुसलुशींत नवजात अर्भकाइतक, किंवा हिरव्यागार पिंपळपानांवर पडलेल्या, पावसाच्या पहिल्या थेंबाइतकं निरागस निर्मळ प्रामाणिक असतं. हा सगळा माणूस घडलाय...घडवलाय म्हणूया...प्रचंड वाचनानं व्युत्पन्न झालेले, उत्तम कीर्तरतनकार पिताश्री आणि संगीत आणि पारंपरिक रचनांची आयुष्यभराची संस्कार शिदोरी त्याला देणारी मातोश्री या उभयतांनी. हे करतांना त्यांना कदाचित कल्पना नसेल की भावगंधित शब्द-सुरांवर प्रेम करणार्या आणि रंगांच्या मैफलींत हरवून जाणार्‍या असंख्य रसिकांवर त्यांनी केवढे अनंत उपकार करून ठेवले आहेत. शिवाय अनेक कलागुणांनी युक्त,वडील बंधू श्रीकांत मोघे, या सगळ्या वाटचालींत पाठीवर हात ठेवून प्रोत्साहानासाठी आजही उभे आहेत. तुम्हाला कदाचित ठावके नसेल पण अहो ! हा माणूस जेवढी वेदना जास्त तेवढयाच आक्रमकपणे हसत असतो...वेदनेला वाकुल्या दावीत तिची खिल्ली उडविण्या हेतू ? .वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही’...इथं या गृहस्थांना स्वत:लाच खंत नसते आणि इतर कुणाला ते करू देत नाहीत.अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या होणार्‍या ’हस्तीं’च्या गदारोळांत सुधीरनं आपल्या कलाक्षेत्रांतलं आपलं स्थान, वैचारिक परिपक्वता आणि खोली यांच्या बळावर अढळ राखलय...कुठलीही आढ्यता, खोटी प्रतिष्ठा यांचा आधार न घेतां. कांही चित्रांतले गूढरम्य लाल, काळे, भगवे रंग आणि त्यांची अनोखी वीण मला पसिद्ध लेखक ’जीएं’ कुलकर्णींच्या अनेक साहित्य कृतींतल्या, बारीकसारिक निरीक्षणांतून फुलत गेलेल्या, कांहीश्या हुरहुर लावणार्‍या वातावरणाची आठवण करून देतांत, अगदी रंगांच्याअनवट खेळासकट... तशीच माणदेशी वास्तवाशी जवळीक साधणारी चारकोल किंवा कृष्ण-धवल पेन्सिल्‌नं रेखाटलेली अचुक त्रिमिती-परिपूर्ण चित्रं...क्या बात है सुधीर...जिओ याऽऽऽर !! मी ना कलाकार, ना समीक्षक, विश्लेषक, वा टीकाकार किंवा लौकिकार्थानं, समझदार रसिक आस्वादक वगैरे.. वगैरे. पण एक ज्येष्ठ कलाकार मित्र ( तो मला मित्र मानतो म्हणून अन्यथा मला तसंसंबोधण्याचा अधिकार नाही).. जे कांही करतोय त्या सगळ्याकडे आवाक्‌ होवून पाःआणरा आणि त्याच्या आवाक्याचा अचंबा मनांत ओळख झाल्यापासून साठविणारा, त्याचा एक चाहता. केवळ याच भूमिकेंतून, अशा अनेकांचा प्रतिनिधीम्हणुन हा ’कौतुक प्रपंच’ इथं मांडतो आहे... सुधीरच्या रंगाकृतींच प्रदर्शन, प्ण्यांतील सेनापती बापट रस्त्यावरील, कलाछाया संस्थेच्या नव्या वास्तूंत आयोजोत केलं गेल आहे आज पासून...आणि ते दिनांक १३ मे पर्यंत चालूराहाणार आहे. आपल्या या लाडक्या कलाकाराचा कलावीष्कार अनुभवायला प्रदर्शनाला अवश्य भेट द्यायलाच हवी तुम्ही सर्वांनी... ***** अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment