Sunday, September 2, 2012

शेळी जाते जिवानिशी...

शेळी जाते जिवानिशी... (सदर चित्रांत एका ढासळल्या पडिक घरासमोर मोडींत काढलेल्या मोटर्‌-बाइक्‌वर चढून एक शेळी रिअर्‌व्ह्यू मिरर्‌ मधे पाहाते आहे.) पाऊस कसला, भुरभुर नुस्ती, न्हाई पानी-दाना, मोडित काडुन आमाला बी, धनी फिरवत्यांत माना दलदल माजली, चारा न्हाई, पुडं भुकेची खाई दशा, हिची बी, अशीच दिस्तिया,’ ’बिच्चारी’ बाइक‌ बाई मैत्र जीविचे शोधू जाता, समोर आला नेत्र झडली, पिचली, खिळखिळलेली अन्‌ झिजलेली गात्र जाणू गेले दु:ख तिच, पाठीवर तिच्याच बसून विझूविझू पाहांत होती, ’आ’ अखेरचा वासून कोंबडी, कुत्री, मांजरी बकरी, का नसतो ’बाई’कला जीव ? अरं ’देवाच्या’ त्या काठीला ल्येका, जरा तरी भीव... मोडीत निघत्यांत मानसं थितं आमाला कुठला चारा ? कोनो भी देस, प्यारे ! इस हालात का नही चारा धावत्या जगाबरोबर राहाण्यासाठी स्वाभाविक इच्छेंतून आधी घोडा हत्ती, उंट अगदी ’गरीबरथ’’ गाढवाचा सुद्धा माणसानं स्वत:च्या दीड-दुप्पट वेगानं चालण्या/धावणार्‍या पाळीव जनावरांचा वाहन म्हणून उपयोग करायला सुरुवात केली. अगदी सर्वप्रिय गणेशाला सुद्धा आपली तुंदिल तनु सावरत, स्वत:च्या एक शतांश आकाराच्या मूषकाचा वाहन म्हणून स्वीकार करणं क्रमप्राप्त झालं, महादेवाचा नंदी तर, भगवान विषूचा गरुड, अन्‌ यमाचा रेडा.. वगैरे वगैरे ! दोनचाकांवर तोल सांभाळता यायला लागल्यावर मग पायक्कीमारत दुचाकी, तदनंतर स्वयंचलित दुचाकी आणि चार चाकी अशा अनेक प्रकारच्या ’भू-जल-खे चर’ वाहनांचा शोधकर्ता आणि उपभोक्ता पण माणूस झाला. आतां काय तं म्हणे स्वत:च्या मनाला संगणकांतल्या टिक्की...चिप्‌.. वर ठेवून मुक्त व्हायचा ध्यास घेतलाय‌ त्यानं ! पण.. म्हणून काय तो स्वतंच्या शारीर अस्तित्वाला पायानं चालत इकडून तिकडं न्यायचं विसरलाय ? अंहं ! तेंव्हा बकरीनं स्वत:च्या अस्तित्वाच्या शक्यतेबद्दल शंका घेत ’बाइक’बाईच्या नेत्रां’त...आरशांत, उपर्युक्त सर्व बाबींचा विचार करतां, डोकावणं अगदी स्वाभाविक आहे. पण माकडाची शेपटी झडून दोन पायांवर चालणारा माणूस उत्क्रांत व्हायला जशी अब्जावधी वर्ष सरावी लागली तसंच हे स्तित्यंतर..झालच तर... व्हायला साध्या-सोप्या त्रैराशिकानं सुद्धा अनंत काळ जाणार आहे... अर्थांत, पाठीमागून खंजीर खुपसून, बाई गं... हा माणूस कधी तुला भक्ष करेल, ते मात्र सांगता येणार नाही हं

No comments:

Post a Comment