Tuesday, December 9, 2014

।।भासबोध।। १२६ ते १३७

कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रुजा घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' ?। सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७

No comments:

Post a Comment