Wednesday, December 24, 2014

।।भासबोध।। १७६ ते १९२

ऐन दुपारचे तळपते ऊन । सर्व जीव सावली धरून । तरुवराचे हे योगदान । लक्षण सुकृताचे ।। १७६ वस्तींत माजतो दंगाधोपा । कसले सूड प्रसवती पापा । आधार माणुसकीचा खोपा । सदन निधर्मी सुकृताचे ।। १७७ लयापूर्वी जैसी स्थिती । तयापूर्वी होण्या उत्पत्ती । निसर्गाकडे कोणती ऊर्जा, शक्ती । जाणिले कोणी ।। १७८ मग कोणते द्ष्कृत्य । वा मानावे सुकृत । होईल लयाशिवाय स्थितं । उत्पत्ती जगती ?।। १७९ आपण सगळे क्षुद्र जीव । शोधीत बसतो कार्यकारणभाव । आकळेना त्यांसि देत सुटतो नांव । सुकीर्त वा दुष्कीर्त ।। १८० तळहाती प्रारंभी फोड । कष्टकरी करती तडजोड । घट्टे होता त्याचे, बिमोड । होतो वेदनेचा ।। १८१ सवयीने सारे सुसह्य, सोपे । प्रारंभी मन थरकापे । मंथर नंतर आपोआपे । लागतो निवळू ।। १८२ ।। दास-वाणी ।। ज्ञान विवेकें मिथ्या जाले । परंतु अवघेचि नाही टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०७/१८ साधना करता करता साधक ब्रह्मस्थितीला पोहोचला सत्य असत्याचा विवेक प्राप्त होऊन संपूर्ण दृष्य जग हे मिथ्या आहे असे ज्ञान त्याला झाले. म्हणून काय त्याने खाणे पिणे, उठणे बसणे आणि शरीराची नित्यकर्मे सोडून दिली काय ? तसे जर नसेल आता मला ज्ञान झालय, भजनाची मला गरज उरली नाही असे तू म्हणू शकतोस का रे बाबा ? ज्ञानोत्तर भक्तीचे महत्व समर्थ सगुणभजन समासात सांगतात. शब्द असावे सार्थ सुगंधी । संगीत अन् मोदाची नांदी । हृदयस्थ शांतीस योग्य संधी । भजनांत ।। १८३ भजन करावे स्वान्त:सुखाय । सुखांत रुजते ज्ञान निरामय । क्षणात आनंदाचा ठाय । सहजचि नकळता ।। १८४ ज्ञानांकुर रुजवुनी अंतरी । कोंभांच्या वाढल्या तरुवरी । मधुर फळे लगडणारी । चाखावी येथेचि जाणा ।। १८५ पिंडास कावळा शिवे । टोच मारण्या चोंच शिवशिवे । आनंदविभोर, कृतज्ञ भावे । नाचती आप्तजन ।। १८६ जेथे नाहीच कावळा । तेथे ठेवा पिंडगोळा । दर्भाचा मग मार्ग मोकळा । करोनि देई किरवंत ।। १८७ गुलाले माखिला पिंड । मनुष्यासही क्षुधाशमनखंड । रित्यापोटी जेंव्ह ब्रह्मांड । भुकेल्या लागे जाणवू ।। १८८ घाटावरि ठेविती पिंड । तटावर अनावर आसवे अखंड । ताटावर तेराव्यास किरवंत कर्मठ । ओठ शिवोनी नि:शब्द ।। १८९ 'उरकले कां रे बाबा ?'। पुसती जिवंत आज्ज्या-आजोबा । घेती वेदना, दु:ख ताबा । अस्तुरि, कच्च्याबच्च्यांचा ।। १९० सर्वांगावर सुरकुत्या । अपचनाने अतिसार, वांत्या । 'जा दूर, येउ नको अंत्या' । श्वास लोभी आरडे ।। १९१ कोण्या उद्देश्ये लिखाण ?। जागवण्या अंधश्रध्द जन । त्याकरिता आवश्यक प्रकाशन । लोकार्पणार्थ ।। १९२

No comments:

Post a Comment