Friday, December 5, 2014

।।।भासबोध।। १०७ ते १२५

स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ भेटल्याविना नाहि जवळीक ।पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ या कृतींद्वारा ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५

No comments:

Post a Comment