Wednesday, December 17, 2014

।।भासबोध।। १३८ ते १६१

अभ्यासले म्हणे संत । सहिष्णुता तरी अंतरांत । कांही केल्या ना रुजत । पीठासनाधिष्टांच्या ।। १३८ कांही जात्याच देखणे । भरडती जात्यांत दाणे । भारुडादि लोकसाहित्य लेणे । संशोधिती निष्ठेने ।। १३९ संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।। १४० कांही साहित्य'दुर्वास' । परस्परांचा करिती दुस्वास । घरकुल जरि साहित्य'सहवास' । 'वांदरे' स्थितं ।। १४१ फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी । चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२ सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या 'नामे' साधते ।। १४३ 'नाम' घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।। १४४ अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' । कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दु:खाने । भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५ चिमणी चिल्ली घरट्यांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।। १४६ जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।। १४७ मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषत: रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८ ।। दास-वाणी ।। आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोध येणे । ऐसीं नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/२१ जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची. हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही. न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे. जो तो जाणितो स्वकर्माने । सुख-दु:ख भोगणे-निवारणे । वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे । अन्य कुणा ?।। १४९ सख्य, मैत्र राखते वैर दूर । वोलांडुनि मोद-क्रोध अपार । वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर । सवंगड्यांचे ।। १५० द्वापारयुगी मैत्रीच न्यारी । सद्यकाली माजले कलिधारी । लांगूलचालन दारोदारी । करिती 'दामा'साठी ।। १५१ ।। दास-वाणी ।। पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/२४ पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२ कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती । भीती भारते अंतर ।। १५३ पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखद:खा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी । आपणची जाणा ।। १५४ अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?। आकळेना ।। १५५ ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । 'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।। १५६ ।। दास-वाणी ।। सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजें वाया । पदार्थज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/०६ अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात. जागृती - जागेपण स्वप्न - झोपेतील जागेपण सुषुप्ती - गाढ झोप तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा. काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या . त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान. तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म. शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत. आम्हासि ठावकी एकचि अवस्था । तिला विविध नामे संबोधिता । कर्मधर्म संभवतो विशेषत: । तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७ मनात कुजवुनि भोग, निद्रा । जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा । दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा । बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८ अनेक मंचिले म्या विद्वत्जन। तयांनी मथिले तत्वज्ञान । परि सामान्य जनता जनार्दन । वंचितचि राहिला भाबडा ।। १५९ लाल दिव्यांच्या आधी गाड्या । मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या । सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या । कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६० पंचाधीक दशकांवरती शतकोटी । किड्या, मुंग्यासम जन राबती । त्यांच्या कल्याणासाठी । काय बा केले ?।। १६१

No comments:

Post a Comment