Monday, March 16, 2015

।।भासबोध।। ८४१ ते ९००

तैसे पाहता पटेल मनोमन । हरेक प्राणिमात्र सज्जन ।ब 'संत'पदाचे नामाभिधान । धारिण्या सुयोग्यची ।। ८४१ सर्वाठाई ठेवतो सद्भाव । त्यांस ना कोणाशी वैरभाव । कृति करी,जाणून कार्यकारणभाव । 'सम'संत जसा ।। ८४२ जसा सूर्यास्तानंतर अंधार । डोळसासही भासे सर्व निराधार । तडफतील अवघे जीवमात्र । जैसा जलचर जलधिविना ।। ८४३ सुखान्ती, कां ठावके, वाटते । भय अवचित मनी दाटते । अंधश्रध्द अंत:करण पेटून उठते । बोलण्या नवस सायास ।। ८४४ परंतु हे सामान्य सत्य । जलधीसही भरती-ओहोटी नित्य । तम-तेजाचा लपंडावांतल् तथ्य । निसर्ग निर्मित कल्याणकारी ।। ८४५ 'देव' स्वत:च भेदरलेला । बुध्द, ख्रिस्त, महादेव वा अल्ला । 'जर झाला अतिरेकी हल्ला' । म्हणती, 'लपावे कोठे ?'।। ८४६ राहावे सुखरूप भक्तनिवासी । म्हणजेच खोल त्याच्या मानसी । सापडणे कठिण 'मारेकऱ्यासी' । म्हणती, एकमताने ।। ८४७ पण हौस भक्त, महंतांस । ओरबाडिती स्वमानस । काढून 'थरथर कांपणाऱ्यास' । भर चौकांत ठेविती मधोमध ।। ८४८ मग रंगते 'रक्षणस्पर्धा' । भाबड्यांचा जीव अर्धाअर्धा । हिरव्या-भगव्या-निळ्यांची त्रेधा । वाचविण्या अनुयायी ।। ८४९ कारण भक्ताविणा कसला 'देव' । कसली ध्यान धारणा, श्रध्दाभाव । संपदाप्राप्तिप्रती सिध्द नाव । प्रवाही कसे बडवे ढकलतील ?।। ८५० घुमानला चालले साहित्यिक । ध्वनिवर्धक घुमवायला सारे उत्सुक । जत्रेस जाणारे श्रोते-प्रेक्षक । अनुदानपात्र ।। ८५१ हट्टी बाळास माय दाटे । 'थांब तुला बुवाकडे देते' । धिटुकल् म्हणे, 'दाव कोठे ?। ठोसे मारेन ढिश्यांव ढिश्यांव'।। ८५२ तैसेचि झाले माझे आहे । भय, धाक मला दावू पाहे । 'देवा' जवळी बांधुन दावे । जखडू दास पाहातांती ।। ८५३ परंतू जोवरी माझे प्रष्ण । न करू पावत त्यांचे शमन । मी विचारतचि राहेन । प्रतीक्षेंत उत्तराच्या ।। ८५४ उपदेश असा करावा । निरुपणी ज्याचा उलगडा व्हावा । तर्कशुध्द, सरळ-सोपा असावा । सकळांसी ।। ८५५ रजस्वला म्हणे ओवळी । जरि नुकतीच उमलेलि कळी । टाळालं जर तिला सद्यकाळी । संहार-दुर्गा पहाल ।। ८५६ तुमच्या आठवा आया, बहिणी । 'बाजूस' बसविले त्यांनाही कोणी । दिलेली प्रजोत्पनार्थ लेणी । दुर्लक्षुनी ! हेटाळिले ।। ८५७ जगण्यांत पडता कोडे । कशास अभाव'देवास साकडे ?। निसर्गनियमांचे नियमित धडे । आचराल तर उलगडेल ते ।। ८५८ बालके निरागस भोळी । शतकोत्तर पंचदश गेली । म्हणजे 'गोळ्या' खाउन मेली । अतिरेक्यांच्या ।। ८५९ कुणि आला कां हो प्रेषित । वाचविण्या त्यांना धावत ?। संकट कोण्या सूडाने प्रेरित । होते अनाठाई ?।। ८६० कच्या बच्या तान्ह्यांना । भींतीवरून खाली फेकतांना । कुठल्या श्रध्देचा म्हणा । माय-बापांना पाजिला ?।। ८६१ कुणांत रंगला सांगा 'देव' । रासक्रिडा की सारिपाटाचा डाव । सीतेसाठी सुवर्णमृगापाठी धाव । कां त्या दुष्टाने घेतली ।। ८६२ कां नाही उपटत समाजाचे कान ?। कां देत नाही जन्मदात्यांना भान ?। कां न राखितो सहृदयतेचा मान ?। म्हणे संकटविमोचक !।। ८६३ आतां येतिल चैत्रजत्रा । अंधश्रध्दांना नशेची मात्रा । चेंगरुनि, चिरडुनी शरीरे, गात्रा । विकलांग होतिल भाबडे ।। ८६४ काय साधता बाया-बापड्यांहो ?। सत्कर्माचा मार्ग नाही गड्याहाे । संतांनी फोडला टाहो । टाळण्या, आयुष्य वेचिले ।। ८६५ एकतरी हरेकाने अनुभवावी । आणि प्रचीती तिची घ्यावी । येथेतर प्रसवली ओवी । प्रत्यक्षावुभूतिगर्भांतुनी ।। ८६६ गाडगे आतांशा लागे तडकूं । तीव्रता झळीची कैसी रोकू ?। सावलींस्तव कैसे झाकू ?। जिणे जोवरी भोगांच ।। ८६७ काडीकाडी जमवुनि घरटे । द्विजद्वय वळचणीस रचिते । पंख फुटता झेप घेते । चोचींत ज्याच्या भरविले ।। ८६८ वळून परत पाहत नाही । 'अवकाश' शोधण्याची घाई । पंखांत बळ भरत राही । दुर्दम आशा, कुतुहल ।। ८६९ विळा-हातोडा, लेखणी, कुंचला । कुऱ्हाड, फावड़े, खुरपणी जोडीला । हल, उपलण्या; सरींतुनि फिरवायला । कर्मयोग्याची श्रध्येये ।। ८७० घाव टाकीचे पाळि-पट्यावर । चालतील न पडले जर ?। जातील भरडिले दाणे, ज्वार ?। भाकरी चुलीवर पडेल ?।। ८७१ पावकोक्ति, सूर्यध्वनिमुद्रणां । घेवोनि विविध उपकरणां। सरसावले तंत्रज्ञ, वैज्ञानिक संशोधना । 'ॐ' नादसम ! सिध्द केले ।। ८७२ प्रभावित, ऐशा वैज्ञानिक सत्याने । होतिल तथाकथित 'साधक, कोणजाणे ?। परंतु धर्म-कर्मठांनी गांशा गुंढाळणे । आंता श्रेयस्कर ।। ८७३ सुंदर घरे, इमले, माड्या । मार्गावर सजविलेल्या गाड्या । वस्तीवर आटलेल्या शुष्क बावड्या । संपदेची मोट निष्फळ ।। ८७४ झोपड्यांत वा वाऱ्यावर । कच्या-बच्यापोटी भूक अनावर । फोकाने मारे नागव्या कुल्यावर । 'भीक माग, रांडच्या' म्हणत माय ।। ८७५ ऐशा दारिद्रय-सदनी । विपदा, वंचना जेथे राज्ञी । इटुकल्या पांपणीतले पाणी । टिपायला येतो 'तो' ?।। ८७६ वार्धक्याने आधीचं वाकलेला । जगण्याच्या ओझ्याने अर्धमेला । सांगण्या 'गति-मोक्ष', जो गेला । निर्भत्सना त्याची निश्चित ।। ८७७ घासा पेक्षा घोटभर ठर्रा । निश्चित देइल निश्चिंत निद्रा । म्हणुनी तळव्यांवर मुद्रा । पडताचि, धावे गुत्त्याकडे ।। ८७८ अंतरांतला माझ्या वडवानळ । शब्दांस देवो निर्दालनबळ । जादूटोणा, करणी यांचं जंजाळ। उचलुनि फेकण्या मिळो शक्ती ।। ८७९ ।। दास-वाणी ।। नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवांचें पूजन करावें । नाना उपचारी आर्चावें । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/१७ परमेश्वराचे वास्तव्य, संतांचे जन्मगाव, कार्यक्षेत्र, समाधीस्थल ही तीर्थक्षेत्रे मानावीत. त्या ठिकाणी अध्यात्मिक स्पंदने तीव्र असतात. वेगवेगळया तीर्थक्षेत्रांच्या वारंवार यात्रा कराव्या.तेथील गैरसोयींचा पाढा न वाचता अत्यंत श्रद्धेने त्या दैवताची मनोभावे पूजा करावी. पत्र, पुष्प, फल, तांबुल, वस्त्रे इ अर्पून मुख्य परमेश्वर एकच सर्वव्यापी आहे या भावनेने ते ते दैवत पुजावे. ही खरी अर्चनभक्ती. उद्योगतीर्थस्थळी जावे । कर्मकारी हातांचे पूजन करावे । कल्याणार्थी उपकारक व्हावे । ऐसे करावे कांही ।। ८८० जेथे हात राबती सदैव । सृजनबुध्दिजन्य प्रकल्प वैभव । मनुष्यकल्याणार्थ मानव । जिथे अखंड कृतिशील ।। ८८१ देश-प्रदेशांत ऐसी ऊर्जास्थले । उभी तंत्रविज्ञानबले । सिंचन करण्या स्वेदगंगा उचंबळे । उत्पादनसमृध्दीहेतु ।। ८८२ 'तीर्थे', 'देवालये' उपासना-सदने । जरी उत्तम वास्तुशास्त्राचे नमुने । दलालाहाती, घृणास्पद भ्रष्टाचारचे खेळणे । कर्मकांडकऱ्यांनी सोपविली ।। ८८३ गुलाल, खण-लुगडी, श्रीफले । गाभाऱ्यांत श्रध्दापूर्वक वाहिलेले । सस्त्यांत ठेले परिसरांतले । प्रदर्शिती परत भाविकां विकण्यासी ।। ८८४ समचरण 'इटु' बरवा । वारकऱ्यास हवा हवा । गर्दी, गदारोळांत श्वास घेण्या हवा । गर्भगृही अभावानेचि ।। ८८५ 'लावणी', सौंदर्य-शृंगार-नृत्य साज । लावणी-हेतु, अंधश्रध्दा निर्मूलन बीज । प्रेक्षक-श्रोत्यांची वानवेचे काज । हेचि असावे ।। ८८६ करमणूक-मनोरंजन गोडवा । त्यांत कडु घोट कसा रुचा-पचावा । उपस्थित जे त्यांना द्यावा तकवा । ऐसा आमुचा उद्देश।। ८८७ 'अरे देवा !' म्हणता शेजारी । येउनी बसतो कां चतुर्भुज हरी ?। वेदना, विपदांना सहज वारी । चमत्कारें ! अनुभवलेंत ?।। ८८८ जोडींत जावे स्नेही, सुहृद । एकमेकांच्या जाणिवांना दाद । नकळत, शब्देविण संवाद । अलवार नजर, स्पर्शे मग घडतो ।। ८९० एकां डोळिया जर आले पाणी । दुसऱ्याची दहिवरते पांपणी । इतुके वसलेले मनोमनी । कोणि असावे सोबती ।। ८९१ कुणि कृष्ण, कुणि बालमित्र सुदामा । संसारी, गृहिणी-सखि-सचिव-भामा । जगतांना सुख-दु:खादी अटळ नेमिक्रमा । क्रमण्या जे धीर देतील ।। ८९२ नुसता बोलून 'त्या'चा धावा । 'रामा, रघुनंदना ! सोडव केशवा..!। घडणार नाही, ध्यानांत ठेवा । तराल भवसागरी कर्मयोगे ।। ८९३ वेदनागर्भिचे जाणोनि वर्म । कपिल जो शमनार्थ कर्म । 'तो पाहा बदलितो धर्म' । भुभु:कारिती वांनरे ।। ८९४ वारंवार ऐसी विधाने । थोर(?), मोठे(?) किंकारणे । बरळत राहाणे सातत्याने । अशोभनीय अनुभवसिध्द ज्येष्ठास ।। ८९५ धर्मांतर ? खोटे नाणे । भिंतावर चित्र वा घराचा रंग बदलिणे । मनांतील श्रध्देयांची स्थाने । बदलतील ? सांगा ।। ८९६ माणुसकी, धर्म कणखरं । जगण्या-मरण्यांतले अंतर । धावतांना अखंड बरोबर । जाणा, एकमात्र राहीलं ।। ८९७ जीवमात्र कल्याणकारणे । धर्म अवतरला ! अभ्यासला कोणे ?। पुष्ट्यार्थ कमकुवत करित राहाणे । विधाने ! ते जाणा अमानुषधर्मी ।। ८९८ स्वेदगंगा पवित्र, क्रियाशील, निर्मळ, । ज्ञान-कर्मेंद्रिये कार्यतरुवर शीतळ। पर्ण-फुलांमध्ये स्वादीष्ट फळ । तटावरी लगडती दुतर्फा ।। ८९९ नवशतकी ओव्यांतला शब्दप्रपात । आशयघनतेने होतो चकित । योगदान माझे या कार्यांत । कारण आकळेना ।। ९००

No comments:

Post a Comment