Wednesday, March 25, 2015

'मी मराठी' साठी समीक्षा: 'पडद्याबाह्रेर': रविवार दिनांक १५, २२, २९ मार्च

'मी मराठी' साठी समीक्षा: 'पडद्याबाह्रेर': रविवार दिनांक १५-०३-३२०१५ साठी. ********* पडद्यामाजी काळे-गोरे । पात्रांमजी भले-बुरे । विकृत, विपरित यांचे होरे । जनसामान्या रिझविती (?) ॥ ’वृंदावनी’ एक तुळशी । निवडुंगाच्या भवती राशी । चित्रविचित्र सूडानिशी । चिरडू पाहती अविरत ॥ ऐशा एककल्ली कथा । फिरुन त्याचं, त्याचं व्यथा । वाहिन्या रोज मांडू पाहाता । कैसे संतोषावे आम्ही ? ’हं ! असो’....असा निश्वास । टाकुन होती सुजाण हताश । ’होतील कां पात्र शिक्षेस ?’ । मनांत करिती प्रतीक्षा ।। असो... आतां गत सप्ताहांतल्या, छोट्या पडद्यावरच्या घटनांचा आढावा...जो या स्तंभाचा मुख्य हेतू...तो घ्यायला सुरुवांत करूया... प्रेमविवाहोत्तरी दुरावले । जगणे कशास मग उरले । एकलेपण सुध्दा परवडले । तुलनेंत ।। २२६ ही तर शुध्द अनुभव-कथा । पोटार्थी पति-पत्नीची व्यथा । सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा । लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। भोगणाऱ्यास कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ जशी जाय पुढे कथा । मनांत दाटून येते व्यथा । दुराव्याचे प्राक्तन माथा । लागले ! ना इलाज ।। जरी 'आऊ' असती संत । नवरे होवू पाही 'महंत' । सहकारी कर्मचाऱ्यां हाकत । राहाती ! मेंढरे जणू ।। आतां एवढं (पेरूची) फोड़ करून लिहिल्यावर तरी तुमच्या लक्षांत यायला हवं हं ! ओळखलंत की नाही मालिकेची नांव ? सध्या, छोटा पडदा सायंकाळी, विरंगुळावेळी, अर्धातास व्यापणारी, ही त्यांतल्यात्यांत सुसह्य मालिका.. झी वाहिनीवरची, 'कां रे दुरावा' ! 'मी मराठी' हे दैनिक, कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ विष्णु वामन शिरवाडकरांच्या स्मृतिदिनी, म्हणजे २७ फेब्रुअरी, राज्यभाषा मराठी दिन, या सुमुहूर्तावर दिमाखदार सोहळ्यांत प्रथम अंक प्रकाशनानं सुरू झालं ! आंता स्वाभाविकपणे, त्यां साठी स्तंभलेखक करणाऱ्यांच्या खांद्यावर शुध्द मराठीठींत बूज राखणं आणि भ्रष्ट मराठीचा निषेध करणं क्रमप्राप्तच झालं ! सर्वाधिक प्रमाणांत, जनमानसांत या भ्रष्ट मराठीचा प्रादुर्भाव जर कुठून होत असेल तर तो विविध मराठी(?) वाहिन्यांवर च्या मालिकांमधल्या 'पात्रां'च्या तोंडी संवाद-लेखकानं कोंबलेल्या संवादांतून ! 'माझी' मदत, 'त्या'ची मदत ? कुठे शिकवतात अशी मराठी ? यांतल्या एक अभिनेत्रीनं तर मराठीत डाॅक्टरेट् मिळवलिये ! तरी त्या इतर सहकाऱ्यांबरोबर तशीच भ्रष्ट मराठी रेटताहेत ! पण सुंदर कथाबीज, पटकथेंत प्रसंगांची जाणीवपूर्वक मांडणी.. खिळवून ठेवणारी.. उत्तम पात्रयोजना, अभिनयाची तर जणू स्पर्धाच असते प्रत्येक भागांत ! पात्रयोजनेंत, एका मुळांत, अभिनयाची उत्तम अभिनेत्रीला, 'पुढचं पाऊल' या चित्रपटाच्या ( त्या ईटीव्ही वाहिनीवरच्या, भीषण मालिकेच्या नाहीं हं ) नायिकेला 'गोट्या' मालिकेंतल्या माउलीला, डॉ. मानसी मागीकरांना स्थानं दिल्याबद्दल दिग्दर्शकाचा मन:पूर्वक अभिनंदन ! आणि नटवर्य अरुणची नलावडे ? कोकणी माणसांचं नारळ, फणसासारखं बहिर्रूप आणि अंतरंग, काय सुंदर अभिनित करताय सर ! सलाम ! आणि आण्णांची मोठी सून ! तिनं पहिल्याभागापासून ठेवलेलं पात्राच्या व्यक्तिरेखेचं भान, जरास जास्त भडक वाटलं, तरी अप्रतिम ! खरंतर नकारात्मक भूमिका साकारतांना, जास्त परिश्रम घ्यायला लागत असावेंत ! अगदी भडकपणासहित, होसूत्याघ मधली जान्हवीच्या आई, दुर्वा मधली मोहिनी, आणि हिंदी मालिकांमधल्या अनेक 'व्हॅंपा' यांचा स्त्री-प्रेक्षकांना येणारा राग, हेच त्यांच्या अभिनयांच्या यशाची पावती असते, नाही कां ? आंतां या मालिकांमधला एक 'फंडा' (हा शब्द सध्याच्या तरुणाईत बरांच रूढ झालाय म्हणून वापरतोय हं ! माझ्यावरंच तो बूमरँग व्हायचा धोका पत्करूनसुध्दा !) पाहूया हं ! खूप बोलायाचे आहे, परि बोलणार नाही.. संपेल मालिकां ही धास्ती, मना कुरडतडून खाई खूप बोलायाचे आहे, परि बोलणार नाही.. लांबवाया मालीका, ऊपाय सांगा आहे कांही ? आतां वरच्या ओळींत मी, मालिका ऐवजी 'मालीका' लिहिलय ! कां ? तर तो काव्यरचनेचा जन्मसिध्द हक्क आहे ! त्याला म्हणतांत कवित्वास बहाल केलेला परवाना ! इंग्रजीमधे Poetic Licence... वृत्तबध्द किंवा छंदबध्द रचनेंत, लघु-गुरु साधण्यासाठी वैयाकरण्यांनी दर्शविलेली सहमती ! तर... जान्हवी, 'होसूत्यघ'... तिचा भाऊ पिंट्या, तिकडे, काॅंग्रेसगवत झालेली दुर्वा, केशव, सारेगमप मधले आण्णा, त्यांचा, बायकोच्या ताटांखालच मांजर झालेला मुलगा, धाकटी सून आदिती, मामतूझा मधली शुभ्रा... सगळे जर भडाभडा बोलायला लागले तर ? अनर्थ होईल ना ! मग त्यांच्या 'मूकाभिनयानं' साधणाऱ्या अनर्थाचा फायदा, तक्षकी राक्षसी पाश...TRP...प्रेक्षकांचा भाबड्या मनाभवती आवळायला कसा मिळणार ? पण, 'कन्यादान' या शीर्षकानं, गतस्मृती जागवत, दाखविलेल्या आशेच्या किरणांची ऊब मिळेल या भावनेनं पाहायला लागलो तर तिथंही अशुध्द मराठीची माशी शिंकलीच ! म्हणतांत ना, प्रथमग्रासे मक्षिकापात:.. तसं कांहीसं ! कार्यतत्पर, कडकशिस्तीचा, कर्तव्यकठेरतेचा भोक्ता, बेडर, निधड्या छातीचा अधिकारी, आपल्या 'कीर्तने' या आडनांवाच्या, कार्यालयांतल्या कक्षाच्या दारावरच्या नामफलककावर, 'क' चा ईकार ऱ्हस्व कसा सहन करूं शकतो ? कीर्तने च्या ऐवजी किर्तने ? काय हे पोंक्षेजी ? आणि तो घृणास्पद हांवभाव करणारा, अतर्क्य...इतके अतर्क्य की समाजानं मुख्य प्रवाहांत सामावून घेतलेल्या, तृतीयपंथियाला सुध्दा अपमानास्पद वाटांव....नृत्य शिक्षक ! हे गृहस्थ (?) एके ठिकाणी, Any excuse ऐवजी Any complaint ? असं म्हणाले हो चक्क ! हायरे दुर्दैवा ! मराठीबरोबर इंग्जीचाही खून ? डबल धमाका !!! आणि एका मोठ्या वस्त्रोद्योगाचा मालक असलेला नायक, निरुद्योगी असल्यासारखा, एका महाविद्यालयाच्या, आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेच्या तालमीला येतो ? रोज ? अरे काय रे हे ! कसले आदर्श ठेवता मुलांसमोर ? असो... आतां परत थोडंसं बरं कांहीतरी ! मंगळवारच्या 'होम मिनिस्टर्' या आदेश बांदेकरनं , गेली १० वर्ष अथक परिश्रम करून नावापूपाला आणलेल्या निर्व्याज, निर्मळ, अधिकाधिक सर्वसामान्यांना सामावून घेणाऱ्या कार्यक्रमांत, आमच्या परीचा...परिमला भटचा सहभाग म्हणजे छोट्याछ्या कारणांनी, हताश, निराश होणाऱ्या सर्वांनाच एक प्रेरणादायी, धगधगता वस्तुपाठच होता. माझं हे लिखाण आज महिलादिनी प्रकाशित होतय ! म्हणून परीला दंडवत ! तुम्हाला कार्यक्रमांत दिसली ती, हिमनगाचं पाण्यावर दिसणारं, १/८ शीर्ष ! ती आम्हा सगळ्यांचा म्हणजे मी, सुधीर मोघे, चंद्रशेखर गाडगीळ, सुधीर गाडगीळ अशा, १९८० ते १९८७ या काळांत, दादरला एकत्र राहाणाऱ्या सर्वांची,मैत्रीण ! ..तुमचे कार्यक्रम 'बघते' म्हणतांना, हळूच अखेरीस, 'सादरकर्त्यांची नांव नुसती दाखवता ती सागतसुध्दा जा ना ! आम्हाला कशी कळणार ?' म्हणायची ! ही सूचना सर्व वाहिन्यांनी ध्यानांत घ्यायलाच हवी ! तिनं, जन्मापासूनच, कुठल्या कुठल्या संकटांशी दोन हांत करीत, हसतमुखानं, धैर्यानं मार्गक्रमणा करीत इथवर पोहोचली आहे, ते ऐकलंत, तर तुमचा थरकांप उडेल.. पुढील भागांत गंगा...&tv या नव्या वाहिनीवरच्या मालिके विषयी.. &tv चं प्रसारण सुरू झालं सोमवारी,रझिया सुलतान या वाघिणीच्या ऐतिहासिक कथेवर आधारित मालिकेनं... ************ अरुण काकतकर. पडद्याबाहेर: दिनांक २२-०३-२०१५ साठी ********** मुघल सम्राट क़ुतुबुद्दीन ऐबक याच्या ऐतिहासिक काळांतली ही धीट बेदरकार आक्रामक प्रवृत्तीची ही युवराज्ञी.. रझिया सुलतान ! पहिल्याच भागांत, हिला दिग्दर्शकानं तिला थेट वाघोबाच्या पिंजऱ्यातच धाडलं ! म्हणजे धार्ष्ट्य दृश्यमान झालं ! नंतर त्याला मशाल हातांत घेऊन चिडवत, त्याच्या हल्ल्याच्या टप्प्यापासून दूर राहाण्यासाठी साध्या उड्या, कोलांट्या उड्या मारायला लावल्या ! म्हणजे अंगभूत लवचिकपणा प्रतींत झाला. आणि अखेरीस, उघड्या पिंजऱ्याचं दार बंद व्हायच्या आंत च तिनं बाहेर चक्क सूर मारला ! एकही शब्द, संवाद न वापरतां, दिग्दर्शकानं रझिया सुल्तान चं 'रझिया सुल्तान' हे ऐतिहासिक विशेषण करून टांकलं... क्या बात है.. याला म्हणतांत दृश्यदिग्दर्शन.. &tv या नवीन वाहिनीवरची या सुरुवातीच्या मालिकांपैकी या मालिकेला, कसबी दिग्दर्शक लाभला आहे, आणि तो ही मालिका अधीकाधिक मनोरंजक आणि ऐतिहासिक सत्याशी प्रामाणिक राहून लोकप्रिय करेले अशी आशा बाळगूया... गतवर्षी, 'महाराणा प्रताप' आणि 'अकबर' या दोन मालिका, सोनी आणि अन्य एका वाहिनीवर दाखलं झाल्या, आणि अशाचं, उत्तम निर्मितीमूल्यांमुळं लोकप्रिय झाल्या आणि भाव खाऊन गेल्या. त्यांतला छोटा प्रताप आणि त्याचा पिळदार शरीरयष्टी म्हणजे काय याचा कृतिपाठच जणू, असा, गुरुकुलस्वामी, यांनी मी विसरूंच शकणार नाही.. रझिया सुल्तानच्या दिग्दर्शकानं, त्या निर्मितीमूल्यांचा वस्तुपाठ, आदर्श म्हणून समोर ठेवायला हरकंत नाही ! आणि या भागांत, एका महत्वाच्या घटनेची नोंद घेतली नाही तर सर्व वाहिन्या आणि विशेषत: क्रिकेट पाहाणारे प्रेक्षक माझी, निष्काळजापणाबद्दल निर्भत्सनाचं करतील. सध्या देशांतलं आणि परदेशांत जिथं जिथं भारतीय नागरिक, निवासी वा आहेत.. तिथं तिथं सर्वत्र, घराघरांत, मनाननांत, वातावरण क्रिकेटमय झालय ! जागतिक करंडक स्पर्धेमुळ.. सूर्योदय कधीही न पाहू पावणारी मंडळी, आजकाल अगदी गजर लावून पहाटे तीन उठून चित्रवाणीच्या खोकड्यासमोर, खेरड्याच्या कमाल सजगतेनं ठाणे मांडून बसतायत्.. त्यातूनही.. नवलं वर्तले गे माये। उजळला प्रकाशु । विजय पाक वरती मिळाला । प्रवाहित आनंदांसूं ।। हे चक्षुर्वैही सत्य, वाहिन्यांवर याचि देही याचि डोळा अनुभवल्यामुळं, जणूं कांही करंडकावर, भारतातं नांव चक्क तिसऱ्यांदा कोरलं गेल्याचं स्वप्नं, प्रत्येक भारतीय पाहात आहे. आणि हे स्वप्न सत्यांत उतरवायचा संकल्प धोनी आणि मंडळींनी सोडलेला दिसतेय.. पाकिस्तान (खरंतर तिथंच, विश्वकरंडक खिशांत टाकल्याच.. अं हं.. आपल्याच खिशांत राहाणार याची खात्री, भारतीयांच्या मनांत रुजली) पाठोपाठ, दक्षिण आफ़्रिका, काल, रडतखडत कां होईना, धुळवडीच्या धुरळ्यांत, विजयाचे रंग मिसळण्यांत संघ यशस्वी ठरला (एकदाचा).. पाठोपाठ सर्व म्हणजे साहीही सामने, प्रतिस्पर्धी संघांना चारीमुंड्या चीत करीत, धोनी आणि मंडळींनी सर्व फटाके उडवून जल्लोश केला..। काय गंमत आहे या माध्यमाची ! घर बसल्या, चहाकॉफीचे घुटके घेत, 'अरेरे', ए ठोंब्या, हाण की ल्येका', क्या बात है ! इट्स डेफिनेट्ली अ सिक्स्..' अशी टीका, कौतुक करण्याची संधी आपल्याला हे माध्यम गेली जवळपास ४३ वर्ष मुंबई, महाराष्ट्रांत, (५६ वर्ष दिल्लींत), सातत्यानं देतय ! या माध्यमांत, प्रत्यक्ष मैदानावर घडणाऱ्या घटना दृश्यस्वरूपांत उपलब्ध झाल्यामुळं, खेळांतले बारकावे आपोआपच कळतांत. उदाहरणार्थ रिव्हू मागितल्यावर, पहिल्यांदा टाकलेला चेंडू 'नो बॉल्' तर नाहीना ? झेल घेतांना, आधी टप्पा तर पडलेला नाहीना ? यष्टिचीत करतांना, फलंदाज क्रीझ् च्या नक्की बाहेर आहेना ? चेंडू बॅट ला स्पर्श करूनं तर गेला नाहीना ? सीमेजवळचा झेल घेतांना, पायाचा स्पर्श तर सीमारेषेला झाला नाहीना वगैरे बाबी 'हाॅट् स्पाॅट्' वा अन्य तंत्रज्ञानाच्या साहाय्यान प्रेक्षक, संथदृश्यप्रक्षेपण बघत असतांना, नकळतच त्यांच खेळाविषयीच उद्बोधन होतच ! आत्ता माझ्यासारखा, दक्षिण आफ्रकेच्या फलंदाजीच्या पडझडीची दारूण अवस्था पाहतोय मी ! अखेर पाकिस्ताननं ३२ धावांनी विजय मिळवून, उपउपान्त्य फेरी गांठण्याच्या दिशेन एक 'पुढचं पाऊल', टाकलय ! .(अरे बापरे ! 'पुढचं पाऊल' ? नुसतं नांव काढलं तरी, मुघल सेनेच्या घोड्यांना पाणी पितांना संतांजी-धनाजीचं प्रतिबिंब दिसायचं या आख्ययिकेची आणि अतर्क्य आक्कासाहेबांची मूर्ती, डोळ्यासमोर उभी राहाते..) दक्षिण आफ्रिका नाहीतरी त्यांच्या अवसानघातकीपणाबद्दल प्रसिध्द आहेच.. अगदी १९८४ च्या विश्वकरंडकापासून.. फटाक्यांची जाहिरांत..चित्रीकरणाचा सुमार दर्जा असून, त्यांतला तिरकस, हरलेल्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा, आणि जेत्यांच्या मुद्रेवर स्मित पेरणारा आशय मात्र पुरेपूर पोहोचला अपेक्षित प्रेक्षकवर्गापर्यंत ! 'मासा काढ जा !' कोळीवाड्यातली हाळी वाटली ना तुम्हाला ? नाही.. नाही.. ! हे झिंबाब्वेच्या आघाडीच्या फलंदाजाचं नांव आहे ! खरंच ! विश्वास नाहीना बसत ? तर ती झिंबाब्व्मधल्या कोळीवाड्यांतली हाळी आहे. पहा.. तिथं झींबाब्वेंतसुध्दा मराठी हळ्य देतांयत आणि इकडं ? 'तू पण हस माझ्या'वर' ?', 'हस मला' ऐवजी ? चक्क अतुल परचुरेतोंडी ! होसुत्याघ मधले बोरकर आंडनावाचे शाखाधिकारी ! अतुल काय किंवा कोणी असो ! पापी पेट के लिये राष्ट्रभाषाका ग़ुलाम होना पड़ता है भौ ! पार अगदी इतिहासकालीन लोधी पासून सद्यकालीन मोदींपर्यंत.., आम्ही मराठी मंडळी दिल्ली तख्ताचे गुज़रे, ग़ुलाम... पापी पेटका सवाल है भौ... 'मराठी असे आमुचे माय बोली' ! ही असली ? आणि या सर्वांनी कविवर्य सुरेश भटांचे, ' लाभले आम्हास भाग्य , बोलतो मराठी' हे मराठी अभिमानगीत गायलय म्हणे ! दुर्भाग्य भटांचं..दुसरं काय ? असो.. 'तुम्हे ऐसा बर्ताव शोभा नही देता । मीठाई खाना मना है तुम्हे !' 'क्यूं ?' क्योंकी तुम विधवा हो । पती मर चुका है तुम्हाला ।' 'स्किन मैं तो जिंदा हूं ना !' हे संवाद.. कलर्स वाहिनीवरच्या, अनेक वर्ष चालू असलेल्या आणि आतां घरंगळत चाललेल्या.. 'बालिकावधू' या मालिकेंतल्या, सुरुवातीच्या कांही भागांची आठवण करून देतायत कां नाही ? प्रसंगांचं साम्य असलं तरी, &tv च्या 'गंगा' मालिकेतल्या तत्सम व्यक्तिरेखेंच्या स्वभावाचं मनोदर्शन, तिची परंपरा, रूढींशी टक्कर घेण्याची आक्रमकतेची प्रचिती, वर उल्लेखिलेल्या संवादांतून, स्पष्टपणे देते ! अगदी 'उडान' च्या बाल-नायिकेच्याही पुढची ! ईटिव्ही वाहिनी वरची मराठी मालिका मामतूझा मधे, हम शकलची जुनाट वापरून वापरून झिजत चाल्लेली शक्कल... काय दाखवतेय ? पटकथा लेखक दिग्दर्शकाची सुमार अक्कल? अरे, तो स्वत:ची सुटका करून घेतलेला 'खरा', का नाइ करतोय शुभ्राला हाक मागायचं धाडस जरा ? आणि नायकाच्या भावाचं पात्र म्हणजे, दिग्दर्शकाच्या सुप्तेच्छांच प्रतिबिंबच वाटतय ? इतका मूर्खपणा ? आणि सगळ्यां धाकटा गायबच आहे गेले कित्येक महिने.. अरे हो.. तो तिकडं होसुत्याघ मधे चित्रीकरणाचा व्यस्त आहे ना ? पण कांही म्हणा, होसूमीत्याघ मधे, 'फूटेज्' जरी रोहिणीला मिळत असलं तरी भूमिकेच भानं पहिल्या भागापासून राखायचं कसब डोळ्यांत भरती ते रत्नांगिरिकर कोल्हटकरांचं ! हॅट्स आॅफ् टु यू सर ! ********** अरुण काकतकर. 'पडद्याबाहेर': रविवार, दिनांक २९-०३-२०१५ साठी पारं'पा'रिक ? अरे नकारे माझ्या वाघिणीसारख्या मायबोली मराठीला रोजरोज भोसकू ! कार्यक्रम:राम कदम-मानाचा मुजरा.. निवेदक:प्रसाद ओक..वाहिनी:ईटीव्ही.. आंता एव्हाना कलर्स मराठी...झाली असणार ! ह्या 'अमुक' मराठी, 'तमुक' मराठी वगैरे शीर्षकांच्या वाहिन्यांमधला 'मराठी' आपला, कुकवाला धनी असावा तसा असतो. त्यापेक्षा सरळ, 'अमुक' भ्रष्ट मराठी असं म्हटल तर ताकाला जाऊन भांड लपविल्याचा दोषारोप तरी टाळता येईल त्यांना . किंवा अमुक 'भ्रम' (भ्रष्ट मराठी) वाहिनी असं म्हणावे ! नाहीतरी सगळ्या दृक्श्राव्य माध्यमांचा कणा म्हणजे सादर होणाऱ्या आशयांतला भ्रामकपणांच असतो की..म्हणजे जे सृष्ट ते थोड अतिरेकी, अतिशयोक्त दाखवायचं म्हणजे, असत्यावरची विश्वासार्हतावृध्दी.. Make believe.. किंवा ज्याला आमच्या व्यावसायिक विशेषणांत, Day-For-Night असं म्हणतांत ! म्हणजे, कृत्रिम उपकरणांद्वारे दिवसाची रात्र करून टाकणं ! पूर्वी ८,१६, ३५ मिमि छायकांच्या काळांत अशी एक गाळण कांच, म्हणजे Filter वापरले जात ! असो.. विषय वाहवला तरी तुमचं तांत्रिक प्रबोधन झालं की नाही ? या शीर्षकाचा एक इंग्रजी चित्रपट पण अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालाय ! चित्रपट-निर्मिती याच विषयावरचा.. त्रूंफॉं नावाच्या दिग्दर्शकानं यांत दिग्दर्शकाचीच भूमिका केलिये ! संधी मिळाल्यानं ज़रूर बघा... तर आतां यापुढे मराठी वाहिनी म्हणजे, 'भ्रम' ? ठीकै ? आणि गंमत म्हणजे, नंतरचे प्रहसन, उत्तरप्रदेशांतून आलेल्या लोकांनी बिघडलेल्या शुध्द(?) मराठी बद्दल.. हाय रे दुर्दैवा !!! 'दुनियादारी' ही नवी मालिका दाखल झाली आहे 'झी' वाहिनीवर !.. शीर्षक संगीत: नीलेशचं खूप छान, खळाळत्या निर्झरासारखं, उसळत्या कारंज्यासारखं आहे.. विषयाला साजेसं ! नीलेशची वाटचाल, अशोक पत्कींच्या पावलावर पावलं टाकंत चाली आहे. संगीतकार म्हणून आणि माणूस म्हणून ! इतक्या यशानंतर, अजून ते डोक्यांत गेलं नाहिये नीलेशच्या ! नाहीतर कांही पुणेकर संगीत-व्यपारी ! वाहीन्यांवर दुकानं मांडत हिंडतायत ! परत एकदा असो... तर..कांही तरुण मंडळी..युवक, युवती.. आपलं काम शोधायला, मुंबईंत आली आहेंत. एक शयनगृह, बैठकीची खोली, त्यतच अर्ध्या भागांत पाकगृह आणि एकच स्वच्छतागृहांत, अशा रचनेचा हा गाळा ! त्यांत तीन मुलं नि दोन मुली असे हे पांचजण राहातायत ! 'कुठल्यातरी मैत्रिणी किंवा एकत्रित पाहायच्यांत गरजेंतून निर्माण झालेल्या मैत्रिणींबरोबर राहाण्यापेक्षा, परिचित मित्रांबरोबरं राहाणं सुरक्षित वाटतं गं !' हे त्यांतल्या एका युवतीच्या तोंडचं विधान, नव्या पिढीपुढच्या.. विशेषत: युवतींपुढच्य... अनोख्या आव्हनांचं विदारक सत्य आपल्या समोर आणतं ! स्वच्छतागृह एकच असलेयामुळं, ते वापरत असलेला युवक असल्यासारखा, बाहेर GENTS अशी पाटी, तर युवती वापरतांत असल्यास LADIES अशी पाटी, ही योजना तर भन्नाटच वाटली ! दिग्दर्शकाला १०० गुण ! आतांतरी वेगळा वाटतोय मालिकेचा बाज. पुढं ? देखतें है आगे आगे होता है क्या ? यशवंतराव चव्हणांवरचा चरित्रात्मक माहितीपट, झी वाहिनीवर, रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत असा तब्बल ४ तास..प्रायंजकांच्या जाहिरातींसह दृक्श्राव्य माध्यमांत या सादरीकरण घाटांला, चित्रपट न म्हणतां, 'डाॅकुड्रामा' असं म्हणतांत. म्हणजे हयात नसलेल्या वव्यक्तींसाठी सुयोग्य पात्रयोजना.... आणि चित्रपट प्रभागाकडून, उपलब्ध असलेला आणि मिळवलेली तत्कालीन प्रत्यक्ष दृश्ये, यांचा बेनालिम मेळ ! दिग्दर्शक जब्बार पटेल या प्रकल्पांत बऱ्याच अंशी सफल झाले असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला आठवतय ? मुंबईत रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा रविवारी सकाळी ९ पासून तब्बल एक तास. 'रामानन्द सागरांची 'रामायण' मालिका इतकी जनप्रिय झालीवती की अबालवृध्द, आपली सर्व कामं सोडून किंवा उरकून, त्या खोक्यासमोर ठाण मांडून बसायची ! तितकीच नसली तरी तशीच जनप्रिय झाली आहे 'जय मल्हार' शीर्षकाची, झी वरची मालिका ! अप्रतिम नेपथ्य, बाह्यचित्रीकरणस्थळं..वेश-केशभूषा. सुयोग्य पात्रयोजना.. खंडोबाला स्वपत्नीनं दिलेल्या शापानंतर, म्हातारबाबा, ..'बानूबाय' अशी अत्यंत मार्दवानं ओतप्रोत हांक मारीत संबोधन करतो, ती फार गोड लागते कानाला. एकूणच पटकथा, संवाद सर्वच निर्मितीमूल्य दर्जेदार आहेंत. आशयाला लाभलेल्या सहानुभूती, आत्मीयता, श्रध्दा या पलिकडे या मालिकेच यश दिसतंय मला ! चैत्र-चाहूल ? चैत्र सुरू झाल्यावर ? अरे शब्दांचे अर्थ तरी ध्यानांत घ्या की, त्यांचा उपयोग करायच्या आधी.. 'जरासी आहट होती है तो दिल सोचता है कहीं ये वो तो नहीं' मदन मोहन-लता... एक अद्वितीय रचना.. लतानं सोने करून टाकलेली.. अं हं ! रसिकांसाठी सुवर्ण-स्वर नजराणा... तर यांतली 'आहट' म्हणजे चाहूल ! कुणी यायची वाट पाहांत असलेल्याला वारंवार होणारे भास.. काय दिवस आहेंत ! मराठी शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी, हिंदी-ऊर्दूचा आधार घ्यायला लागावा ? अर्थ माहीत नसला तर, चैत्रउत्सव किंवा वसंतोत्सव म्हणा की रे ! पण बहुधा दुसऱ्या कुठल्या वाहिनीनं वापरला असणार.. मग 'वेगळ' कांहीतरी म्हणून चुकीची शीर्षकं ? काय हे 'प्रवाही ताऱ्यां'नो ? अरेरे , मी पण कसा बिनडोक, ठोंब्या.. म्हणजे कार्यक्रमाचे, थेट प्रक्षेपण थोड़च असणार ? मी चौकशी केलीना ! त्यांच्याशी संपर्क कांही केल्या होईना.. मग अन्य स्रोताकडून माहिती मिळाली, 'कार्यक्रम पूर्वमुद्रित आहे' ! मग बरोबरच आहे. त्या चित्रीकरणाच्या वेळी वाहिनीला 'चाहूल' लागली होती चैत्राची, म्हणून चैत्र चाहूल, बरं का !! असो.. दुसरा काय म्हणणार ? पण आत्तांच, होसूमित्या मधे 'पाठकोरा' शब्द ऐकला आणि सुखावलो जीव ! मराठी भाषा संवर्धनाच्या आशा अचानक पल्लवित झाल्या... वाघा सीमा संचलन सोहळ्याला आधारित जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असणार. विश्वकरंडक सामन्यांदरम्यान वारंवार दाखवातायत !.. पाकिस्तानी सैनिकी अधिकाऱ्याचं फाटकं पादत्राण, भारतीय सैन्याधिकारी, अत्यंत सैनिकों शिस्तींत, देहबोलींतून हेटाळणीमिश्रित दया मुद्रेवर धारण करींत, फेविकॉल् लावून दुरुस्त करतो.. जाहिरातींतून सुध्दा माजोऱ्या शेजारी देशाची मिजास उतरावायला उत्पादकानं प्रवृत्त व्हावं म्हणजे, प्रत्येक भारतीयाच्या मनांत किती भडास खदखदतो आहे, याची प्रचिती येते ! समोर भारत-बांगलादेश यामधे, विश्वकरंडकाच्या उपउपान्त्य फेरीचा सामना सुरू आहे. विजय समोर दिसतेयस. आतां उपान्त्य लढत ! अरे अॉस्ट्रेलियन 'शिवीगाळेकर' आले की समोर ! पण पाकिस्तान आलं असतं तर मजा आली असती... बिच्चाऱ्यांना, फटाक्यांच खोकंपरत घेऊन जायला लागणार. विमानांत वज़न जास्त नको म्हणून, मधेच समुद्रांत टाकून द्यायचे फटाके, असं कांहीतरी शिंजतय त्यांच्या गोटांत.. उड़त उड़त कानावर आलं माझ्या... आणि हो ! त्या 'कन्यादान' मालिकेच खरं नांव असायला हवं, 'कन्यानाच'.. घरी,दारी, महाविद्यालयांत, पहिल्या भागापासून, सगळ्या कन्या नुसत्या नाचतायत ! आतां तर गायत्रीची आईपण तिला घरीच पाश्चात्य नृत्य शिकविणार आहे म्हणे ! बाकी उपायुक्तांना, तालमीच्या ठिकाणी जावून, बहुधा सगळ्यांना हिडिस फिडिस करण्याव्यतिरिक्त अन्य उद्योगों नाहिये ! ********** अरुण काकतकर.

No comments:

Post a Comment