Wednesday, March 18, 2015

।।भासबोध।। ९७१ ते १००५

।। दास-वाणी ।। दुश्चीतपणे नव्हे साधन । दुश्चीतपणे न घडे भजन । दुश्चीतपणे नव्हें ज्ञान । साधकासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/२२ एकाग्रता हा चित्ताचा गुण. दुश्चीत म्हणजे मन विचलित होणे. साधनेला बसला पण मनाने भरकटला. परमेश्वराचे भजन सुरू केले पण मनात भलतेच भजन सुरू. अशा साधकाला आत्मज्ञान होण्याची शक्यता सुध्दा नाही. ज्ञानदशक, दुश्चीतनिरुपण समास. मन थाऱ्यावर न राहू पाहे । मन एकाग्रता शोधत आहे । मन अस्वस्थ उचंबळुन वाहे । प्रयत्नांतिही ।। ९७१ ऐसी अवस्था क्लेशदायी । टाळावी कोणत्या उपायो?। शून्य विचार अंतर्मनाठाई । सांसारिकासि अशक्य ।। ९७२ ।। दास-वाणी ।। आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावे अनन्य । अनन्य म्हणिजे नाही अन्य । आपण कैचा तेथें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/१७ हा जो परमात्मा आहे तो सत्व, रज, तम या तीनही गुणांच्या पलीकडे आहे. त्याला रंग रूप आकार नसल्याने तो निर्गुण आहे.एक विशिष्ट असा कोणताही गुण नसल्याने तो बहुगुण मानावा. ते आत्मतत्व अत्यंत शुद्ध आहे. त्या निर्गुणाशी साधकाला अनन्यभावाने एकरूप व्हायचय. अनन्य म्हणजे त्या एका ईश्वराशिवाय तीन्ही लोकांत दुस-या कोणत्याही वस्तूला अस्तित्वच नाही. अशा भावनेने एकरूप झाल्यास 'मी साधक ' असे वेगळेपण शिल्लक कसे राहील ? आत्मनिवेदन नववी भक्ती. बहुगुणी, निर्गुणि कैसा समान ? की जैसे रंग शुभ्राचे प्रतिमान ? विकारोत्कटी निर्विकार । प्रवृत्ति तैसी ?।। ९७३ 'नाही' नाही म्हणजे 'आहे'। नकार नकारा छेदू पाहे । तम जैसा तमास भेदू पाहे । अनंत, अगम्य अवकाशी ।। ९७४ अनन्य केवळ अवकाश । शोधू पाहता न पडे दृष्टीस । 'दिसले' म्हणजे केवळ भास । प्रगत तंत्रासही ।। ९७५ ।। दास-वाणी ।। माझे शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०२/२९ आपण जेव्हा माझ्या शरिराला अमुक अमुक होतय असे म्हणतो तेव्हा जो म्हणणारा असतो 'तो' शरिरापेक्षा कुणीतरी वेगऴाच असतो. माझे मन असे जेव्हा आपण समजतो तेव्हा असे समजणारा तो मनापेक्षा कुणीतरी वेगळाच असणार. हा वेगळे अस्तित्व दाखवणारा माझ्यातला 'मी' म्हणजे आत्मा. तो शरीरही नाही आणि मनही नाही. देवशोधन दशक, ब्रह्मपावननिरूपण समास. शारीर जाणिवांचा वेध । वेदना, निराशा वा आनंद । जोवरि मन तर्क प्रबुध्द । घेतची राही ।। ९७६ 'आंत' ? माझे हृदयांत ?। 'आंत' ? माझे ओठ, पोटादी अवयवांत ?। 'आंत' ? माझे ज्ञानेंद्रियांत ?। अदृश्य 'तो' जाणावा कैसा ?।।९७७ की अजाणवे तो आत्मा ?। की निरूपे दृश्य तो आत्मा ?। की आठवाने विचळे तो आत्मा ?। अनुत्तरित अनेक ।। ९७८ ।। दास-वाणी ।। शरणागतांची वाहे चिंता । तो येक सद् गुरू दाता । जैसें बाळक वाढवी माता । नाना येत्ने करूनी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/४० ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला जन्मल्यापासून मोठा कर्तृत्ववान होईपर्यंत नाना खस्ता खाऊन साथ देते त्याचप्रमाणे संपूर्ण शरण आलेल्या साधकांची सद् गुरू माउली चिंता करत असते, मोक्षाचा मार्ग दाखवून शेवटपर्यंत सोबत करते. माउली आणि सद् गुरू ची माया, उत्कट प्रेम एकाच उच्च पातळीवर असते. शरणागत एकलव्य होता । परंतु द्रोण झाला क्षमादाता ?। गुरुने दक्षिणा मागता । तत्क्षणी अर्पिली ।। ९८९ साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान । नाना वाद्ये सिकविती जन । ते हि येक गुरू ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/०४ साहित्यातील विविध छटा, संगीतातील बारकावे, वेगवेगळया शास्त्रीय रागदारीचे प्रकार, गायनातील हरकती, नृत्याचे पदन्यास आणि मुद्रा, तालांच्या मात्रा, अनेक वाद्ये उत्तम पद्धतीने शिकवणारे असंख्य शिक्षक असतात.त्यांनाही एक प्रकारे गुरूच मानावे, श्रेष्ठही मानावे. परंतु परमेश्वराशी सूर आणि ताल जुळवून देणारे, शब्दब्रह्माच्या आधारे साधकाला अद्वैतबोध प्राप्त करून देणारे सद् गुरूच सर्वश्रेष्ठ होत. कांही गुरू वैचित्र्याच्या खाणी । दडवुनी ठेविती ज्ञानसमृध्द सुवर्णनाणी । हिणकस, निरुपयोगी शिकवणी । देती अधन शिष्यांना ।। ९८० ।। दास-वाणी ।। सांडून अक्षै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखे दु:ख । आणीक कांहींच नाही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/४१ कधीही संपत नाही असे जे अक्षय स्वरूपी समाधानाचे सुख सोडून देऊन सत्ता, संपत्ती, किंवा योगमार्गाने प्राप्त झालेल्या सिद्धीसामर्थ्याच्या मागे लागतात ते मूर्ख मानावेत. कुठलीही कामना किंवा इच्छा ही कायमच अपूर्णावस्थेत जिंवंत राहाते. आता पुरे असे कधीच वाटत नाही. अतृप्तीमुळे सलग दु:खमय अवस्थेतच माणूस राहातो. समर्थ रामदास अशा सिद्धीच्या चमत्काराच्या जोरावर लोकप्रियता मिळवणा-या गुरूला दांभिक गुरू मानतात. कामना कां बा त्यजावी ?। कां मना वेसण घालावी ?। काम ना करिता अपेक्षावी । मात्र हे अयोग्य ।। ९८१ ।। दास-वाणी ।। शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य असावा संसारदु:खी । संतप्त देही ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/३३ विवेक ३ पातळयांवर राहातो. अध्यात्मिक : आत्म अनात्म व्यावहारिक : सार असार पारमार्थिक : नित्य अनित्य शिष्याला हे तीनही विवेक हवेतच. पिढिजात श्रीमंती ही भोगाला प्रवृत्त करते म्हणून विरक्तीच्या शिक्षणासाठी शिष्य गर्भश्रीमंत नसला तर उत्तम. संसारातील विविध घटनांचा मनस्ताप होऊन त्यातील फोलपणा लक्षात आलेली व्यक्ती पारमार्थिक अध्ययनावर लक्ष पटकन केंद्रित करू शकते. शिष्यलक्षण समास. भाबड्यां परत परत संसारातुनी । परावृत्त करोनि कर्मापासूनी । कोणते फळ मिळवुनी । 'त्यां' हवे समाधान ?।। ९८२ 'जमात' वाढवू पाहाती ? कर्मप्रवृत्ता भिकेला लाविती ?। त्याच्या झोळींतला वाटा मागिती ?। कां हे ऐतखाऊ अध्यात्मगुरु ?।। ९८३ ।। दास-वाणी ।। मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर । मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०३/०९/४० मृत्यू असे म्हणत नाही की हा फार मोठा माणूस आहे. याला सोडून देऊ. मृत्यू हरी हर किंवा भगवान राम, पूर्णावतार श्रीकृष्ण यांनाही चुकलेला नाही. या मर्त्यलोकात म्हणजे पृथ्वीतलावर 'उपजे ते नाशे ' हाच नियम असून मृत्यूची भीती न बाळगता मिळालेल्या मनुष्यजन्माचे उत्तम वागणुकीने सामाजिक, पारमार्थिक हित साधून घेणे हेच योग्य. जो गेला त्याची मूर्ती ?। पार्थीव वा कागदावर आकृती ?। 'भजा, पूजा, ओवाळा आरती । 'त्याला' ! लक्षण मूढमतीचे ।। ९८४ ।। दास-वाणी ।। जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्यू येईल कैचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/१०/२८ सिद्धपुरूष हे आत्मरूप झालेले असतात. देहबुद्धी नष्ट झाल्याने ते जीवंत असतानाच मुक्त झालेले राहतात. अशा दैवी पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याच्या शिष्यपरिवार आणि भक्तांच्या दु:खाला पारावार नसतो. साधूचा देह नष्ट झालाय आत्मा नाही हे ज्ञान नसल्यामुळे हा शोक होतो. आत्म्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. साधू आत्मस्वरूप असल्याने नित्य अनित्य विवेेकाने त्यांनी जन्ममृत्यूवर विजय प्राप्त केलेला असतो. चौदा ब्रह्मांचा दशक, देहांतनिरूपण समास. जो नाहीच तो दाखवा !। तेथे असते नुसतीच हवा । अध्यात्म्यांचा गनिमी कावा । अडकू-फसूं नकां त्यांतं ।। ९८५ शिक्षित म्हणजे साक्षर । समज असे अत्यंत गैर । कसबी कलाकार कारागिर । अक्षर वंचित, तरि मानपात्र ।।९८६ ।। दास-वाणी ।। मुळीं पाहता येक स्वर । त्याचा तार मंद्र घोर । त्या घोराहून सूक्ष्म विचार । अजपाचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०५/०३ नीट पाहिले तर 'सा' हा एकच स्वर तीन सप्तकांमधे लावता येतो. ध्वनिकंपनाच्या तीव्रतेनुसार तार (उच्च),मंद्र(मध्यम),घोर (खर्ज) असे सा चे उच्चारण होते. घोर हा सूक्ष्म स्वर मानतात. अजपाजप म्हणजे वैखरी वाणीने उच्चार न करता केलेला जप. त्याची कंपने अर्थातच घोर स्वराहूनही सूक्ष्मच असणार. प्रत्येक श्वासउच्छ्वासागणिक परमेश्वराचे केलेले अखंड नामस्मरण म्हणजे अजपा. आकार प्रथम, स्वरेल स्थिरं । इकार, उकार अंताक्षरानुसार । लावणे आलापांत हितकर । गाणाऱ्यासी ।। ९८७ श्वासउच्छ्वास पंचमहाभूतांकारणे । सहजसाध्य होते जगणे । म्हणोनि त्यांस अखंड रक्षिणे । अटळ मनुष्यासी ।। ९८८ ।। दास-वाणी ।। मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें येकाचें येक दिसे । भासों नये तेंचि भासे । विलक्षण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/२७ आराध्यदैवताच्या सगुण रूपाचे ध्यान करायला बसला. चित्त एकाग्र नसल्याने रामाच्या मूर्तीऐवजी गणपतीचीच मूर्ती डोळयासमोर आली. हे ही एकवेळ ठीक, परंतु मनच था-यावर नसल्याने देवदेवताऐवजी भलभलतीच दृष्ये मिटलेल्या डोळयांसमोर तरळू लागली. हे विचित्र भास ध्यानाची अखंड स्थिती साधकाला साधू देत नाहीत. सर्वसामान्यांची ही व्यथा समर्थांनी मांडली आहे. 'नसल्या' 'अभावदेवां'च्या सुरत कथा । संस्कृत साहित्य समृध्दी करिता । उपलब्ध ! चतुर, शोधक नजरेस येता । रंजक ठरती जनसामान्या ।। ९८९ लौकिकार्थी अश्लाघ्य, शारीर जरी । विश्राम विरंगुळ्यास नर-नारी । चविष्टपणे चघळती तरी । स्वाभाविक, नैसर्गिक ।। ९९० ।। दास-वाणी ।। कष्टेविण फळ नाही । कष्टेविण राज्य नाही । केल्याविण होत नाही । साध्य जनीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०३ प्रयत्नांचे सातत्य म्हणजे कष्ट. या जगात फुकट प्राप्त झालीय अशी एकही गोष्ट नाही. फळ ही कष्टाची देणगी आहे. राज्य सत्ता तर सामुहिक प्रदीर्घ कष्टांचे फळ आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे. ही साध्याची गुरूकिल्ली आहे. हाच कर्मयोगोपदेश । करतील कधी दास ?। करीत होतो प्रतीक्षेस । मासा नऊ ।। ९९१ साध्य होतेचि निश्चित । अपवाद नियमा बहुधा नाहीत । कृतिप्रवणता जर संस्कारांत । दिली माय-बाप-गुरवर्यें ।। ९९२ ।। दास-वाणी ।। येकदा मेल्याने सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वाचविना । तो आत्महत्यारा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/०९ शिल्लक राहिलेल्या इच्छा (वासना) भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे एकदा मरून जीवाची सुटका होत नाही. पुन्हा जन्म घेतला की गर्भवासापासून,बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळया यातना भोगाव्याच लागतात.अशा जन्म मरणाच्या फे-यातून मुक्तीसाठी साधना करून जो स्वत:ला वाचवत नाही तो आत्मघातकीच मानावा. जन्मला तो मरणारची । परतून तेथुनि येण्याची । सुविधा कधीच निसर्गाची । नव्हती-नाही-नसेल ।। ९९३ म्हणोनि, मन न होय द्विधा । साधायचेी ते जगत असता साधा । 'आता नाही येणे, जाणे' साधा । निरोप रुजवा हृदयांतरी ।। ९९४ ।। दास-वाणी ।। देवाचे कर्तृत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राव । कळल्यावीण कितेक जीव । उगेच बोलती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/१४ मुख्य देव परब्रह्म निर्गुण निराकार आहे. त्याच्यापासून त्याच्या ईच्छेने माया निर्माण झाली. मायेपासून सगुण साकार असा विश्वाचा अफाट पसारा निर्माण झाला. परमेश्वर करून अकर्ता म्हणतात तो असा. माया निर्माण केली. पुढे स्वत: काहीच केले नाही. या विषयी शास्त्रशद्ध माहिती न घेता स्वत:ची मते निर्माण करून लोक बोलतच राहतात. जनस्वभावनिरूपण समास. जगणे जगोनि बोलू पाहे । अनुभव मनाशी सांगत राहे । पण ऐकेल त्याचे ऐसा आहे । कोण, कोठे ?।।९९५ ।। दास-वाणी ।। विचारे येहलोक परलोक । विचारे होतसे सार्थक । विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०७/२० इहलोक म्हणजे प्रपंच . परलोक म्हणजे परमार्थ. दोन्हीकडे विचारपूर्वक आचरण हवे. तरच आयुष्याचे सार्थक आणि जीवाचे कल्याण होईल. चिरंतन म्हणजे नित्य नाशवंत म्हणजे अनित्य याचा सूक्ष्म विचार म्हणजे विवेक. हा एकदा जमला की अनित्याकडून नित्याकडे म्हणजे मोक्षाकडे प्रवास सुरू होतो. परलोक परमार्थ असे । तर आम्हा तो हरघडि दिसे । केवळ परमार्थीचेच पिसे । लागलेल् असते संसारी ।। ९९६ ।। दास-वाणी ।। नाना वस्त्रें नाना भूषणें । येणे शरीर श्रृंघारणे । विवेकें विचारें राजकारणे । अंतर श्रृंघारिजें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/०६/०१ अनेक प्रकारचे कपडे आणि दागदागिने शरिराचा श्रृंगार वाढवतात. रूबाब आणि दिखाऊ सौंदर्य वाढते नक्की. परंतु सारासार विवेक, सखोल विचार, समाजहिताचे राजकारण या गोष्टींनी अंत:करणाचे सौंदर्य वाढते. अंतरंगी जो सुंदर तोच उत्तमपुरूष. देखाव्यास शारीर सुंदरता । नि जाणत्या मनांत सहृदयता । अद्वैत असे साधता । व्यक्ती होते 'मनुष्य' ।। ९९७ ।। दास-वाणी ।। जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण । जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/२६ देवाचे मुख्य स्वरूप निर्गुण आहे हे समजणे म्हणजे ज्ञान होय. माझे आत्मस्वरूप समजून घेणे हे खरे जाणणे आहे. नाव, पत्ता, रंगरूप, उंची वजन शिक्षण संपत्ती हे फक्त देहाचे वरवरचे ज्ञान होय. जो मूळ मी आहे तो समजला तर मूळ परमेश्वराशी अनन्य होता येते. परमेश्वरा तुझ्याशिवाय या जगात इतर कशालाही अस्तित्व नाही अशी पक्की भावना म्हणजे अनन्यता. ती प्राप्त झाली की साधक मुक्तच मानावा. जाणपणनिरूपण समास. जोवरी तो येतांना नाही दिसला । हसला, दुखावला, वा कोपला । पार्थीवांत दडून बसला । तोवरी तो शून्यचि आम्हा ।। ९९८ आम्हा साधले संसारी । साधूंनी साधोनि कधीतरी । नौका वल्हवतांना भवसागरी । करोनि पाहाव्या वल्गना ।। ९९९ ।। दास-वाणी ।। कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तमगती । ऐसें हे ऐकावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०१/२५ ऐकणे, वाचणे, ऐकलेले पुन्हा चिंतन करणे यांना एकत्रित श्रवण म्हणावे. मनुष्याने जन्मभर काय ऐकावे ? नऊ प्रकारच्या भक्ती .. श्रवण : ऐकणे कीर्तन : सांगणे स्मरण: परमेश्वराचे अखंड नामस्मरण पादसेवन : सेवा अर्चन : षोडशोपचार यथाशक्ती पूजा वंदन : मनोभावे नमस्कार दास्य : मी देवाचा दास असा भाव सख्य : देव माझा सखा, मित्र. आत्मनिवेदन : संपूर्ण समर्पणभाव चार प्रकारच्या मुक्ती .. सलोकता : देवलोकात वास्तव्य समीपता : देवाच्या अगदी जवळ वास सरूपता : देवासारखे आपण होणे सायुज्यता: आपणच देव होणे उत्तम गती म्हणजे मोक्ष, मुक्ती प्राप्त होण्यासाठी जे जेे आवश्यक तेवढेच ऐकावे, वाचावे, दुस-यास सांगावे. हेच खरे श्रवण होय. दास्य, सख्य तेवढे सोडोनि । चारहि मुक्ती नकोंत आचरणी । वृथा कालापव्यय आप्तरक्षणी । नकोची आम्हा ।। १००० ।। दास-वाणी ।। दृष्टांती काही अपूर्व आले । अंत:कर्ण तेथेंचि राहिले । कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/२२ निरूपण ऐकायला बसला. मूळ तत्व समजण्यासाठी एखादा छानसा दृष्टांत सांगितला गेला. ते उदाहरणच इतके आवडले की मनाने तिथेच रेगाळला. निरूपण पुढे निघून गेले तिकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.कुठपर्यंत काय वाचलय काहीच कळेनासे झाले. जे लक्षात ठेवायला हवे तो सिद्धांत आणि अनुषंगित महत्वाचे विषय समजलेच नाहीत. श्रोता अवलक्षणनिरूपण समास. तुमचे लाभो तुम्हासचि दृष्टांत । झगडणे, मरत असता जगण्यांत । स्वेदबिंदूंची कष्टकार्यांत साथ । देते समाधान ।। १००१ अध्यात्म प्रचारा उचलता लेखणी । स्वेदबिंदूंची करुण कहाणी । व्यथा, वेदना दुखणी-बाणी । दृष्टिआड करू नका ।। १००२ उपाय 'उपासना' सांगो नका । ना बोलतो नवस फुका । कष्ट करितो कार्यश्रध्द मुका । उपास ना घडवे आप्तांसी ।। १००३ उलथुनि अनंत ब्रह्माडे । ज्ञानेंद्रियासि सताड उघडे । ठेवोनि, धुंडाळिता न सापडे । तो 'नायक' ।। १००४ म्हणे 'शोधा अंतरंग । दिसेल त्याचे स्फटीकांग । नमस्कार त्यासि साष्टांग' । म्हणे 'घाला' ।। १००५

No comments:

Post a Comment