Monday, March 16, 2015

।।भासबोध।। अध्याय तिसरा: ९०१ ते ९७०

अध्याय तिसरा: अंतरांतला बेलगामी फुफाटा । ज्वालामुखी स्फोटक मोठा । जगण्यात साचलेला साठा । होवू पाहे उत्सर्जितं ।। ९०१ चिंतांचि देइल कार्यप्रवणता । सुख ठेवेल बसवुनी अन्यथा । हरेक सुदाम्यास न देतो हाता । वल्हवाया नौका हरी ।। ९०२ सुख ! आळसाला निमंत्रण । सुख ! माजवृध्दीचे कारण । सुख ! जरी सर्वसामान्यांचे स्वप्न । प्राप्य सहजी न होतसे ।। ९०३ दासे चेतविला वन्ही । सजग केले मनोमनी । मुक्त करण्या पिढी तान्ही । अंधश्रध्देच्या बेडींतुनी ।। ९०४ द्विधा मन:स्थिती रामाची । करावी हत्या सुवर्णमृगाची ?। की दैत्यांच्य अनन्वित अत्याचारांची । अखेरीस अस्तुरीच्छा ठरली श्रेष्ठ ।। ९०५ माय-तांत, अस्तुरी घरी । नंतर लष्करच्या भाकरी । मनोमन जाणिले अंतरी । आदर्श रामाने सुध्दा ।। ९०६ ऐशा रामाच्या पावलावरी । ठेवून पाउल जो वाटचाल करी । तोच 'आदर्श' ठरेल संसारी । निश्चितपणे ।। ९०७ त्याने धारिले चाप-बाण । हेतु ? भयग्रस्त उध्दरण । परंतु निराकरण करून । इच्छा-अपेक्षांचे आप्तांच्या ।। ९०८ आज धड़ाडा पेटवू हुताशन । पुरेपूर देऊन त्याचे क्षुधाशमन । अनिष्ट प्रथा-प्रवृत्ती अंधश्रध्दांचे हवन । मनोभावे ।। ९०९ सर्वांस प्रवृत्त करण्या शुभमुहूर्त ठरावा । भाकडांच्या जोखडांची हवा । देऊन भडाग्नी संताषवावा । जाळापोळाया कुकर्म ।। ९१० ।। दास-वाणी ।। माझे शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनहि नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०२/२९ आपण जेव्हा माझ्या शरिराला अमुक अमुक होतय असे म्हणतो तेव्हा जो म्हणणारा असतो 'तो' शरिरापेक्षा कुणीतरी वेगऴाच असतो. माझे मन असे जेव्हा आपण समजतो तेव्हा असे समजणारा तो मनापेक्षा कुणीतरी वेगळाच असणार. हा वेगळे अस्तित्व दाखवणारा माझ्यातला 'मी' म्हणजे आत्मा. तो शरीरही नाही आणि मनही नाही. देवशोधन दशक, ब्रह्मपावननिरूपण समास. शरीर ! रक्त-मांस-अस्थि-कूर्चादि गोळा । शरीर ! घरटे, राखण्या सहज भाव भोळा । शरीर ! जोवरी श्वास घेते मोकळा । नंतर मिळुन जाई मृदांगी ।। ९११ मन ! जोवरी शारीर अस्तित्व । मन ! जाणते आकांक्षांचे महत्व । मन ! जरी अदृश्य निर्गुणतत्व । सजग, तोवरी सुख-दु:ख ।। ९१२ शरीर, मन-भाव मिळून । साकारते संसारी जनजीवन । मृत्युपश्चात रक्षा होवुन । उडोनि जाई अवकाशी ।। ९१३ शरीर ! मनाविणा प्रेत । शरीर ! मनाविणा जाणरहित । शरीर ! मनाविणा अप्रवृत्त । म्हणोनि राखा 'मन' मनाचे ।। ९१४ मन ! शरीरास करिते कार्यप्रवण । मन ! शरीरास देते त्राण । मन ! शरीरास ठेवते तवान । कर्मयोग्याच्या ।। ९१५ सुख ! जखमेवर फुंकर । सुख ! ना आनंदा पारावार । सुख ! निरव शातीचा परिसर । वांछिती सकलजन ।। ९१६ दु:ख ! वेदना अपरंपार ! दु:ख ! उध्वस्त मनाचे घर । दु:ख ! तमगर्भी वावर । शत्रूसहि नको लाभाया ।। ९१७ रंग ! शुभ्राचे प्रतिनिधी । रंग ! आनंदाचा निधी । रंग ! नजरेंस सर्वां आधी । घालतसे भुरळ ।। ९१८ रंग ! प्रकटती विविधांगाने । रंग ! वापरा निगुतिने । रंग ! देणगी पेरिलि निसर्गाने । जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ।। ९१९ रंग ! पंचमहाभूतांचे अंग । रंग ! कधि शश, कधि नाग । रंग ! सुशीतळ कधी आग । प्रोत्साहन योगा वा भोगा ।। ९२० होवू नका अस्वस्थ । राहा नेहमी आश्वस्त । मनात बाळगू नका खंत । प्रष्ण विचारणे सोडू नका ।। ९२१ ओरबाडा गरुडाचे पंख । शब्दांत पेरा शेषाचा डंख । कोणी नसतो संत बित । झेप सज्ज हत्यारा ।। ९२२ जिणे न मिळे पुनःपुन्हा । स्वीकारा हरेक आव्हाना । देवकिनंदन जगला कान्हा । सुख-दु:खा सोबती ।। ९२३ मार्ग ! अवघड,कांटेरी वळणावरला । मार्ग । मउ हरळीवर कधि डंवरलेला । मार्ग ! कधी ठेचा खांत क्रमलेला । इप्सितस्थळ गाठण्या ।। ९२४ आज करुया निश्चिंत निर्णय । निश्चित होवू निर्भिड, निर्भय । निराकरण्या, काळ्या करणिचे भय । अंधश्रध्दोपजत ।। ९२५ झुंजुरका जाते भूपाळी गाते । द्विजगणांच्या किलबिलाटे जाग येते । कोवळा कवडसा कौलांतुन भेटे । आनंदकंद भवताली ।। ९२६ तरुवर कोवळी पालवी । नवीन दिवस, आशा नवी । चैत्रगौरी सजण्या-सजविण्या हवी । रंगबिरंगी रानफुले ।। ९२७ भोगले, सरले ते ठेवा अंतरांत । जपून स्मृतींच्या जरतारी बासनांत । उघडुन, न्याहाळण्या वृध्दापकाळांत । एकांडे असतांना ।। ९२८ सरले जेमतेम बालपण । युवावस्थेंत पदार्पण । गीतार्थ सागोनि सकळजन । उध्दरले ।। ९२९ 'संभवामि युगेयुगे' ऐसे । सभोवताली आपुल्या कितिसे ?। प्रखर तर्क-बुध्दि-ज्ञानप्रकाशे । आयुष्ये उजळिली ।। ९३० आपेगांवी फुफाटा, उल्लंघुनी काटेरी पायवाट । गांठिले पैठण, निर्भत्सना ऐकुनी थेट । नेवाश्यास, पैसाच्या स्तंभी टेकुनी पाठ । उक्तिल्या ओव्या नऊसहस्र ।। ९३१ अनाथ भावंडे वरकरणी सामान्य । कोणां ना कळली महती अनन्य । 'पोरे संन्याशाची', हेटाळणीचा पर्जन्य । संतत साहिला ।। ९३२ इवली मुक्ता धाकुल्यासाठी । 'मांडे करिते' शब्द ओठी । वन्ही साक्षात आला भेटी । धाकुल्यापाठी कौतुके ।। ९३३ चम्तकार ना, जाणा मथितार्थ । प्रबल इच्छाशक्तीने सार्थ । अपेक्षित फलासहित । कर्मयोग साधतसे ।। ९३४ तोच पाऊस, तोच गारवा । तेच ऊन, अन् तापलेली हवा । निसर्गाच्या विविध भावा । नसे उपायो ।। ९३५ आयुष्य निरामय हेचि धन । चालत नाही दुर्लक्षुन । व्याधिग्रस्त होते जेंव्हा चेतन । असतो झालेला उशीर ।। ९३६ वेळ ,प्रांत: वा सायंकाली । नियोजून करण्या हालचाली । योग अथवा विविध प्रणाली । नित्यनेमे अवलंबाव्या ।। ९३७ ओरपलेंत आयुष्यभर । मुक्त, सुखाचे लेउन पर । थोडे थांबुनि पळभर । वळून मागे पहा जरा ।। ९३८ राहिन गेले बरेच कांही । देण्यासारख् असूनही । सवड झाली, किंवा काढली नाही । जाणवेलचि सुरत्यास ।। ९३९ हृदयस्थ सुप्त गहिवर । दृश्यमान देही दहिवर । पाणांवती पापण्यांचे पर । कंठमणी वर-खाली ।। ९४० कृतज्ञ जगतांना असावे नेहमी । सुखकरांच्य स्मरुनी धामी । वारून दु:खाच्या तमी । उजळिला ज्यांनी आनंद ।। ९४१ आनंदाच्या विविध कोटी । परीक्षिता ज्ञानेंद्रियांची कसोटी । दृक्श्रवण, स्पर्श, गंध, रसनेसाठी । स्पर्धा हरघडी ।। ९४२ नांगर ओढी जोडी खिलारी । बीज धारी कृषिवल करी । कृतिशीलांच्या विविध परी । शुभंकर सुप्रभाती ।। ९४३ कंच हिरवा परिसर । खेळ खेळते झुळुक गार । जळभरणा कमनीय नार । अपार दृश्यात्मक ।। ९४४ तरुवर घालू पाहाती अवकाशा । गवसणी ! तैसी ठेवा महत्वाकाक्षा । प्राप्तण्या आरोग्य-संपदा, सुयशा । प्रकाशवाटा अटळ ।। ९४५ किरणे विखुरली रानोमाळ । गोवत्स सोडता लुचण्या आंचळ । तैसे तेज, गाठण्या तमतळ । जणु सरसावे ।। ९४६ निसर्ग ! गुरु कालांतींत । निसर्ग ! प्रत्यक्ष नाही शिकवितं । निसर्ग ! जगण्याची रीत । दावी पंचमहाभूती ।। ९४७ गर्व न स्पर्शावा माझ्या मना । 'हे ? ठावके नाही उपजेतरुवर घालू पाहाती अवकाशा । गवसणी ! तैसी ठेवा महत्वाकाक्षा । प्राप्तण्या आरोग्य-संपदा, सुयशा । प्रकाशवाटा अटळ ।। ९४५ किरणे विखुरली रानोमाळ । गोवत्स सोडता लुचण्या आंचळ । तैसे तेज, गाठण्या तमतळ । जणु सरसावे ।। ९४६ निसर्ग ! गुरु कालांतींत । निसर्ग ! प्रत्यक्ष नाही शिकवितं । निसर्ग ! जगण्याची रीत । दावी पंचमहाभूती ।। ९४७ गर्व न शिवो माझ्या मना । 'हे ? उपजे कैसे' ठावके ना । सांभाळण्या या 'अ-क्षर' धना । बळ द्यावे, वाचक-श्रोत्यांनी ।। ९४८ आळशी निरुद्योग्या पोटी । वृथा भुकेच्या गाठी । उपाय एक त्यासाठी । ज्ञान-कर्मेंद्रीयां करा कार्यरत ।। ९४९ वाचा, लिहा, अनुभव । वा ज्यावर जडला विशेष जीव । गाणे छानसे त्याच्या स्मृतीस्तव । विसराल भूक आपसुक ।। ९५० समोर इतुकी पसरलेली । पृथा विविध रंगी नटलेली । मनुष्ये, श्वापदे निळाईखाली । बाहती सदैव ओवीला ।। ९५१ सुचलोले हे 'शहाणपण' । वृध्दापकाळ होता दृश्यमान । वाटे टाकावे सांगोन । कृतांतकटकामलध्वजजरा लागता दिसो ।९५२ ज्याला न कळे स्वत:चे भले । त्यास कसे समजावावे नाकळे । ऐशंसाठी कोठोनि आणावे कानपिळे । कोडेचि एक ।। ९५३ घालू पाहता ब्रह्मांडाची घडी । थकाल प्रयत्नांती दोन घडी । वृथा घेउं नका उडी । अ-ज्ञानांत ।। ९५४ म्हणोनि यत्न सोडू नका । विज्ञानास घाला हाका । विश्वकण-शोध प्रयोगासारखा । प्रकल्प राबविती जे ।। ९५५ प्रेमळ, करुण तरि सावध । द्वारी उभ्या श्वानाच्या नजरेचा वेध । रक्षण्या यजमाना प्रतिबध्द । सर्वदा ।। ९५६ सख्या सारिखे हे सोबती । जैसे एकनिष्ठ सेवाव्रती । लळा जिव्हारी इतुका लाविती । दुरावल्यास वेदनाकारी ।। ९५७ निश्चित निरव नि शाॅत । चराचर निद्रिस्त निवांत । निशाचर अज्ञाताची भिंत । लंघू पाहे ।। ९५८ जीव परि अंगणांतला । सावधचित्ते बसलेला । अनाचारावर करण्या हल्ला । मिटलेल्या जरि पांपण्या ।। ९५९ चराचरा पलिकडली व्याप्ती !। मोजण्या ठावकी कोणती पट्टी ?। अक्षम सगळ्या तंत्रशक्ती । निर्मिलेल्या मनुष्ये ।। ९६० घाबरू कुणास ? कशासीठी ? मनांत संमंध भित्यापाठी । ग्रास न पडला भुकेल्या पोटी । तर मात्र जीव कंसनुसा । ९६१ माझे तप, माझी साधना । योगे सुकाती लाभली तना । गर्व धरी ऐसा मना । तो कसला संत ।। ९६२ अखेरीस सगळे वाया । दोन श्वासांमधली माया । जर जरा, वेदना शनवाया । निरूप योगी ।। ९६३ म्हणे आमुचा कुलस्वामी । पंचमहाभूतांच्या अंतर्यामी । संसारी, बाहेरी, धामी, ग्रामी । अनुभव देण्या सज्ज सदा ।। ९६४ पिंडी वसते भूपातळीतळी । परंतु ब्रह्मांडी जळी- स्थळी । उपकारक वा विक्राळी । निसर्गरूपे अवतरतो ।। ९६५ अनाकलनीय कां लिहावे ?। अविचारे कां वागावे ?। अविरत बरसण्या स्वप्नावे । आनंदघन ।। ९६७ अविवेके करिती हिंसा । अतर्क्य अघोरी पेशा । आवळती नरड्याभोवती फासा । स्वत:च्या नकळत ।। ९६८ उत्तरदायित्वापासून मुक्ती । शोधू पाहील कोणी व्यक्ती । लौकिकाथें ती दुष्प्रवृत्ती । मानितो समाज ।। ९६९ अपप्रवृत्तींना विन्मुख होणे । हीच सत्कर्म प्रारंभ लक्षणे । सर्वदा लोककल्याणकारणे । होति साहाय्यभूत ।। ९७०

1 comment:

  1. आपल्या ब्लोकला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा ..
    छान वर्णन केलेले आहे.

    ReplyDelete