Monday, May 28, 2012

’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’

’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’ ’काय करणार ? दगडाखाली हात अडकलायना आमचा ? तो सुटेपर्यंत नाइलाजा आहे’ अशाप्रकारच विधानं आपण स्वत: करीत असतो किंवा कुणा आप्त-स्वकीय किंवा मित्रमंडळींकडून ऐकत असतो. पण ही ’हताशा’ कांही माणसांना शरण जाते कारण त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाच्या आणि धडाडीच्या आक्रमकतेला, ’कार्यकक्षा’ वगैरे नसतांत. ’अनंत अमुची ध्येयासक्ती’ या काव्योक्तीचं, ही मंडळी मूर्तिमंत उदाहरण असतांत... तुम्ही एक कादंबरी वाचली आहे ? इंग्रजी.. ? कादंबरीच नांव 'Alive..'. विषय: युरोपांतल्या पर्वतराजींत एका हिमाच्छादित शिखरावर, अपघातानं कोसळलेल्या एका विमानांतल्या, जवळजवळ ’चमत्कार’ वाटावा अशा पद्धतीनं वाचलेल्या कांही प्रवाशांची गोष्ट ! निसर्गाच्या ’उलट्या काळजा’शी स्पर्धा करीत त्यांतल्या दोन चिवट वीरांना, तब्बल २७ दिवस नियोजन आणि खडतर प्रवास केल्यानंतर, जित्याजागत्या ’माणसां’च्या प्रदेश दृष्टिपथांत आला...आणि मग सगळ सुरळीतं झालं...त्याची गोष्ट...वास्तवाच्या ’हिमाच्छादित ’विस्तवां’त होरपेळलेली... असंच आणखी एक वास्तव...एक जिद्द, ’दुर्दम्य’. राल्‌स्टन्‌चा जन्म, २७ ऑक्टोबर १९७५ रोजी, इंडियानापोलिस्‌मधे, डोन्ना आणि लॅरी, या जोडप्याच्या पोटी झाला पण त्याच्या कुटुंबानं, त्याच्या ११ व्या वर्षी डेन्‌व्हर्‌ला स्थलांतर केलं. शालेल शिक्षण कोलोरॅडो राज्यांतल्या, ग्रीनवुड्‌ नावांच्या एका खेड्यांतल्या, चेरी क्रीक्‌ हाय्‌स्कूल्‌ मधे झाल्यावर त्यानं, पिट्स्बॉरोतल्या कामेजी मेलॉन्‌ विद्यापीठांतून, यंत्र अभियांत्रिकी, फ्रेंच्‌ हे मुख्य विषय आणि ’पियानो-वादन’ हा आवडीचा, अशा विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. विद्यापीठांत त्यानं ’निवासी सहायक’ म्हणूनही काम केलं. परदेशांतही शिक्षण घेतलं आणि, तो एक स्वयंस्फूर्त खेळाडूही झाला पुढं. अ‍ॅरिझोना राज्यांतल्या फिनिक्स्‌ मधल्या ’इंटेल्‌’ कंपनीतल्या छानशा नोकरीचा या महाभागानं २००२मधे राजिनामा दिला.. कां ? तर गिर्यारोहणाचा त्याचा ’जन्मजात’ ध्यास त्याला कांही केल्या स्वस्थ बसूं देत नव्हता..कोलॅरॉडोमधले सगळे दुर्गम कडे त्याला सर करायचे होते..१४,००० फुटांपेक्षाही अधिक उंचावरचे...जवळजवळ ५३ की ५४ कडे होते असे..हे धाडस सुद्धा त्याला ऐन हिवाळ्यांत करायचं होतं...एकट्यानं..जे त्या आधी कुणीही स्वप्नांतसुद्धा आणलं नव्हतं. पण या पठ्ठ्यानं, आपलं ते स्वप्न प्रत्यक्षांत आणलंच एके दिवशी ! ऑगस्ट २००९ मधे राल्‌स्टन्‌नं, जेसिका ट्रस्टी नांवाच्या युवतीशी विवाह केला आणि या दांपत्याला, फेब्रूअरी २०१० मधे एक छानसा छकुला मिळाला जेसिका कडून. त्याचं नांव ठेवल राल्‌स्टन्‌नं, लिओ...लिओ राल्‌स्टन्‌. सध्या हे कुटुंब, कोलोरॅडोमधल्या बोल्डर्‌ या गावांत वास्तव्य करतय ! आता कहाणी राल्‌स्टनं दैवाशी केलेल्या...त्याच्यावर गुदरलेल्या संकटाशी केलेल्या दोन हातांची. २००३ मधे म्हणजे लग्ना आधी जवळजवळ सहा वर्षं, २६ एप्रिल ला, उटाह्‌ मधल्या पूर्व वायनी काउंटीत, हॉर्स्‌ शू कडेकपारींत, म्हणजे कॅनियन्‌ नॅशनल्‌ पार्क्‌च्याच एका भागांत राल्‌स्टन्‌ नेहमीप्रमाणे गिरिभ्रमण करीत होता. परतीच्यावाटेवर एका घळींतून खाली येतांना, एक लोंबकल्ळणारी, तोल हरवलेली महाकाय शीळा वेगानं खाली आली आणि राल्‌स्टन्‌च्या हातावर पडून त्याचा उजवा तळवा आणि मनगटापर्यंतचा हात अडकला, आणि कपारीची भिंत आणि ती शीळा यामधे चिरडला गेला...राल्‌स्टन्‌नं आपल्या या गिरिभ्रमणाची कोणालाच कल्पना दिलेली नव्हती त्यामुळं, त्याचा शोध घेत कोणी येईल याची श्यक्यतांच नव्हती. ’आपण आतां कांही वाचत नाही या ’शीला-पातां’तून.. आता फक्त मरणाची वाट पाहायची..’ असे नैराश्यजनक विचार मनांत घोळवत, राल्‌स्टन्‌नं, तब्बल पांच दिवस, हात दगडाखालून सोडविण्याचा प्रयत्न करीत, जवळच्या पाण्याचे...३५० मि.लि. म्हणजे, छोटी शीतपेयाची बाटली असते नां ? तेवढे.. अगदी छोटे घोट घेत, त्याच अवस्थेंत काढले.प्रयत्न व्यर्थ ठरत होते कारण शीळेचं वजन होतं, जवळपास ३६० किलोग्रॅम्‌..तीन दिवसांच्या, अथक प्रयत्नांनतर, तहानेनं व्याकूल आणि अर्धमेला झालेल्या राल्‌स्टन्‌नं, स्वतंचा दगडा खाली अडकलेला हात, सुटका करून घेण्यासाठी, तळहात आणि कोपर यामधे, स्वत:च तोडायचा ठरवलं..गिर्यारोहणाच्या कांही टोकदार हत्यारांच्या साहाय्यानं, राल्‌स्टन्‌नं, सुरुवातीला कांही ’ओरखडे’वजा जखमा करून बघितल्या..वेदनांचा अंदाज घेण्यासाठी. चौथ्या दिवशी त्याच्या लक्षांत आलं की सुटका करून घ्यायची असेल तर नुसतं मांसच नाही तर हाताच हाडसुद्धा ’तोडणं’ आवश्यक आहे. आणि, त्याच्याकडे उपलब्ध असलेली हत्यारं या कामासाठी सक्षम नव्हती, हे ही त्याला ठाऊक होतं.. पांचव्या दिवशी, जवळच पाण्याचा शेवटचा थेंब जेमतेम शिल्लक राहिक्याचं त्याच्या लक्षांत आलं आनि त्यानं त्याच्या ’महाप्रयाणाची’ तयारी सुरु केली. समोरच्या दगडावर स्वत:च नांव आणि संभाव्य ’मृत्यु-दिनांक’, वेळ आदि माहिती कोरली..स्वत:च्या चलत्ध्वनिसंचावर, कुटुंबियांसाठी ’शेवटचा संदेश’ चित्रमुद्रित केला..त्या रात्री ’आपण मरणार’ या खात्रीनं तो पडल्यापडल्या परत मूर्छित झाला.. आणि अहो आश्चर्यम्‌... दुसर्‍या दिवशी...१ मे, गुरुवार...सकाळी त्याला चक्क ’जितेपणी’ जाग आली. मनांत कल्पना आली त्याच्या की आपण आपलं हाड, फांदी मोडतो तसं मोडलं तर ? आणि ’जिगरबाजानं केलं कि हो तसं ! आणि मग एका गंजलेल्या, दोन इंची पात्यानं..जे त्याच्याकडच्या सामुग्रीचा भाग होतं.. त्यानं तुटलेल्या हाडाचा लटकतां भाग कापायला सुरुवात केली..स्वत:कडच्या त्या चिमुकल्या हत्याराचं तो कौतुकानं वर्णन करतो, ’स्वच्छ प्रकाश देणार साधन किंवा बहु-उपयोगी’ वगैरे तसलं कांही हत्यार असतं तरी हेच केलं असत ना मी ?’ हात ’तोडून’ स्वत:ची सुटका करून घेतल्यावर, राल्‍स्टन्‌ त्याच अवस्थेंत, घळ उतरून घसरत खाली आला..’पि्टॉन्‌-मिटॉन्स्‌’ आनि दोरखंडाच्या मदयीनं ’रॅप्‌लिंग्‌’ करीत..एका हातानं...ऐन दुपारच्या उन्हांत. त्याची गाडी १३ किलोमिटर्‌ दूर होती.. आणि दळणवळणाचं कुठलही साधन नव्हतं त्याच्याकडे..पण त्याच वेळी, एरिक्‌ आणि मोनिक्‌ मीजर आणि त्यांचा मुलगा अ‍ॅंडी, या नेदरलॅंड्‌च्या प्रवासी गिर्यारोहकांनी त्याला बघितल आणि त्वरित संबधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून मदत-कार्याला सुरुवात केली.तो पर्यंत, राल्‌स्टन्‌च वजन ४० पौंड्‌ कमी झालं होतं आणि शरीरांतील एकूण रक्ताच्या २५ टक्के रक्त वाहून गेलं होतं. अतिरक्तस्रावानं आपण मरणार, याची राल्‌स्टन्‌ला पुरेपूर खात्री पटली होती एव्हाना..पण दरम्यान, तो घरी न परतल्यामुळे , कुटुंबियांनी चौकशी सुरू केली होती आणि ते शोध पथक हेलिकॉप्टर्‌सकट पोहोचलं होतं दुर्घटनास्थळी...हात तोडल्यानंतर सहा तासांनी.. राल्‌स्टन्‌ म्हणतो, ’आधी हात तोडला असता तर रक्तस्रावानं किंवा तोडला नसता तर तहान-भूक-अशक्तपणानं...माझं कलेवर झालं असतं तसंही !’.. सुटकेसाठी हात तोडण्याची खुणगांठ त्यानं मनाशी वेळेवरच बांधली होती. नंतर, कालांतरानं, त्याच्या तोडलेल्या हाताला कृत्रिम हात , तळवा, कोपरासकट, बसवून मिळाला हॉस्पिटल्‌मधे... तो तुटलेला हात, घळींत पडलेली शीळा हलवून, शोधून आणण्यासाठी १३ माणसं, कांही अवजड यंत्रसामग्रीसह झटली, आणि राल्‌स्टन्‌नं त्या हाताचं व्यवस्थित दफन केलं अखेरीस !! म्हणतांत ना..I was complaining about my shoe untill I saw a person without feet.. तसंच कांहींसं... रोजच्या परिस्थींतल्या छोट्या मोठ्या संकटांची चिंता आणि तक्रार करीत बसणार्‍या आपणा सर्वांसाठीच ही कथा..अगदी वास्तव आणि सत्य घटना, आठ नऊ वर्षांपूर्वीच घडलेली..an eye opener नाही कां ? किंवा असही असेल, की, जिवावरचं बेतलं तर परिस्थितीनुसार सर्वसामान्य माणसंसुद्धा पुरेशी लढाऊ, जिगरबाज आणि प्रसंगी आक्रमकही होतांत... ****** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment