Tuesday, May 29, 2012

दोन कथा...दोन तात्पर्य...

दोन कथा...दोन तात्पर्य... ’चार गोष्टी..न परतणार्‍या’ एक सधन स्त्री, एका विमानतळावरच्या प्रतीक्षालयांत, आपल्याला घेवून जाणार्‍या विमानाची वाट पाहात होती. कदाचित बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल या विचारानं तिन, दरम्यानच्या मनोरंजनासाठी, वृत्तपत्र-विक्रेत्याकडून कांही नियतकालिकांची खरेदी केली, आणि संभाव्य ’क्षुधाशमनार्थ’ कांही खाद्यपदार्थांचीही बेगमी केली. बाईसाहेब, खरिदलेल्या वस्तूंसह, परत प्रतीक्षागृहांत दाखल झाल्या आणि आपल्या आरामदायी आसनाचं अधिग्रहण कर्त्या झाल्या. कांही कालावधीनंतर, त्यांच्या शेजा्रच्या आसनावर एक गृहस्थ येवून बसला आणि हातांतलं नियतकालिक चाळू लागला. बाईसाहेबांनी, नियतकालिकांतला एक लेख वाचायला सुरुवात केली आणि बरोबरच्या खाद्यपदार्थातलां एक तोडात टाकला. गृहस्थानंसुद्धा बाईसाहेबांच्या कृतीची अगदी नकळत पुनरावृत्ती केली आणि खाद्यपदार्थातला एक घेवून तो चघळू लगला. बाईसाहेबांच्या हे लक्षांत आल्यावर त्यांच्या कपाळाला एक आठी पडली...पण, ’जाऊ दे ! अनवधानानं झालं असेल कदाचित..’ या विचारानं त्यांनी दुर्लक्ष केलं, आणि आणखी एक ’घास’ उचलला आणि ग्रहण केला. थोड्या वेळानं, गृहस्थानं, एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसं, खाद्यक्रिया सुरू ठेवली आणखी एक घास उचलून, खायला सुरुवात केली. गृहस्थाच्या प्रत्येक कृतीबरोबर, बाईसाहेबांचा पारा चढतच होता, पण मन धास्तावलं होतं, ’उगाच वादावादी वाढेल’ म्हणून त्यां जरी, मूग गिळून गप्प होत्या, तरी संतापापोटी उद्भवलेल्या बेचैनीमुळं, मनोमनी गृहस्थाला शिव्याशापांची लखोली वाहतच होत्या, ’ऐत्या बि्ळावर नागोबा, मेला !’ वगैरे, वगैरे.. करतां करतां, वाचनांत मग्न दोनीही सहप्रवाशांपैकी गृहस्थाच्या लक्षांत आलं की खाद्यपदार्थाचा एकच तुकडा उरला आहे आंता. त्यानं त्याचे दोन समान भगकेले आणि त्यापैकी एक शिल्लकठेवून दुसरा खाऊन टाकला. ’आता मात्र हद्द झाली याच्या निर्लज्जपणाची’ असं म्हणत बाईसाहेब तिरिमिरीनं उठल्या. आपलं सामान बरोबर घेवून संतापदग्धावस्थेंत त्यांनी आपल्या नियोजित ठिकाणी ताडताड निर्गमन करत्या झाल्या. इच्छित स्थळी पोहोयच्या आधी, प्रसाधनगृहांत जाऊन त्यांनी, झाल्या प्रसंगातल्या, त्या गृहस्थाच्या गर्हणीय वागणुकीच्या क्रोधानं, कपाळावर, कानशीलावर, नाकाच्या टोकावर, जमलेले घर्मबिंदू टिपण्यासाठी, ’पर्स्‌’ उघडली आणि... बाईसाहेबांचा चेहेरा त्यांनाच समोरच्या आरशांत बघवेना.. इतका उतरला होता..क्रोधाचे, नाराजीचे, कांहीही न करता आल्याच्या घुसमटीचे सगळे रंग उतरले होते एका क्षणांत...कारण त्यांनी खरीदलेले खाद्यपदार्थ त्यांच्याच पर्स्‌मधे नीट अवगुठितावस्थेंत, सुखरूप होते. त्यांनी वाचनादरम्यानं उपभोग घेतला होता तो त्या गृहस्थानं खरेदी केलेल्या पदार्थांचा...ज्याच्यावरच्या रागानं, गेला जवळजवळ तासभर त्या धुमसत होत्या..बाईसाहेबांनी खजिल मनानं, त्या गृहस्ठांना, त्याच जागी शोधण्याचा प्रयत्न केला...पण तो गृहस्ठ पण मार्गस्थ झाला होता तोपर्यंत...एका वेगळ्या समाधनानं. जवळच्या वस्तूला भागीदार मिळाल्याच्या समाधानानं पण आता कांहीही होवू शकत नव्हतं...दोघांचे मार्ग भिन्न झाले होते. परत कधी भेट होईल याची श्यक्यता पुसटशीही नव्हती.. हातांत होता फक्त पश्चात्ताप...आणि मनांत आयुष्यभर कुरतडून खाणारी खंत... ’अशी पांखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती.. दोन दिसांची (दोन घडीची..म्हणूया हवंतर..या गोष्टीच्या संदर्भांत ) रंगत संगत, दोन क्षणांची नाती !!’ या गीता प्रमाणे किंवा ’माडगुळकरांच्याच गीत रामायणांतल्या, ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या, भरत भेटीच्यावेळी, ’परत चला दादा, परत सिव्हासनाचं अधिग्रहण करून राज्यशकटाचं नियंत्रण हाती घ्या..’ अशी कळकळीची विनंती करणार्‍या परमप्रिय बंधूच आणि आयोध्येच्या जनतेचं सांत्वन करीत समजूत घालणार्‍या श्रीरामाच्या तोंडी, आयुष्याचं क्षणभंगूरत्व, हृद्य शब्दांत मांडून अजरामर केलेल्या गीतांतील ओळीप्रमाणॆ.. ’दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाहि गांठ’ तर कथेचं तात्पर्य: चार गोष्टी या जगांत अशा आहेत की त्या निसटल्या की परत ’हांसिल’ माही होवू शकत.. एक : फेकलेला दगड दोन: उच्चारलेला शब्द तीन: नुकसानीला कारणीभूत झालेला, घडलेला प्रसंग आणि, चार: सरलेली वेळ !! ***** एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस... एक दिवस एक फुलंविक्रेता केशकर्तनालयामधे आला, या नापित महोदयांच्या..केशकर्तनाची क्रिया पूर्ण झाल्यावर, सहाजीकच त्यानं सरसावत, खिशांत हात घालत, ’किती झाले ?’ असा स्वाभाविक प्रष्ण विचारला. नापित महोदय, आपले हात मागे घेत आणि मागे सरत उद्गारले, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’ चेहेर्‍यावर आश्चर्य आणंत, पण मनांत, सुखावत, फूल-विक्रेत्यानं, खिशांतला हात तसाच ठेवला. दुसर्‍या दिवशी आपलं दुकान उघदायला गेल्यावर नापिताला दाराशी एक पुष्पगुच्छ आणि एक आभार-पत्र ठेवलेलं मिळालं आणि त्याच्याही चेहेर्‍यावर मंदस्मित झळकलं नंतर कांही वेळानं एक पोलिसदादा केशसंभार कर्तनार्थ दाखल झाले दुकानांत. परत सगळा प्रसंग, जो आदल्या दिवशी घडला होता त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजे पोलिसदादानं पैसे काढणं, नापितानं ते नम्रतापूर्वक नाकारत, त्याचं कारण सांगणं वगैरे वगैरे. पुढल्या दिवशी परत आदल्या दिवशी सारखीच फुलं दाराशी..फक्त एक बदल म्हणजे आज आभार-पत्राबरोबरी एक ताज्या बटाटावड्यांचा पुडाही होता. त्या दिवशी मग एक ’खासदार’..चक्क..आले डोकं भादर्ण्यासाठी केशकर्तनालयांत..कर्तनोत्तर परत, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’. सुरू झालं नापिताचं पालुपद...’खासदार’ महोदय तत्परतेनं पैसे परत खिशांत कोंबत, शिळेवर एक त्यांच आवडत चित्रपटगीत वाजवत, टणाटण निघाले परतीच्या वाटेनं. चौथ्या दिवशी सकाळी, सत्कारणार्थ आपल्या ’कर्मभूमी’कडे निघालेल्या नापिताला, लांबूनच दिसलेलं दृश्य बघून तो बुचकळ्यांत पडला...जवळ गेला तो काय ! अहो आश्चर्यम्‌.. दुकानाबाहेर एक डझनभर खासदार उभे होते ’नापित कधी एकदा येतो आणि दरवाज्याच्या फळ्या उघडतो’ याची वाट पाहात. तात्पर्य: मित्रांनो ! हाच तर फरक आहे, सर्चसामान्य भारतीय नागरिक आणि जनतेला, ’मुकी बिचारी, कुणिही हांका !’ म्हणत आणि त्यांच्या (मतपेटींत खोट्या आश्वासनांनी हुरळून मतं टाकणार्‍या) भोळसटपणाला हसंत त्यांना ’हाकणार्‍या..भारतीय राजकारण्यांमधला !! आणि म्हणून शासनकर्ता राजकीय पक्ष, बालकांच्या वारंवार बदलाव्यालागणार्‍या ’दुपट्या-लंगोटां’प्रमाणेच बदलून, अंगी परिवर्तनवाद बाणवायला पाहिजे आंता आपल्याला... अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment