Friday, May 18, 2012

’दुरावा...असा आणि तसा..’

’दुरावा...असा आणि तसा..’ ’तू दूरदूर कोठे, हुरहूर मात्र येथे विरहांत रात्र मोठी, प्रेमीजनांस वाटे’ किंवा, कां कुणास ठावूक पण मी ज्या कवितेला ’Most Unlike विंदा’ असं मानतो ती ’सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी, सांगू कसे रे मी तुला सांगू कसे रे याहुनी’ ही संगीतकार-कवी यशवंत देवांच्या सिद्धनाद-स्वरांनी सजलेली कविता, किंवा ’दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन्‌ मी इकडे’ ही, आणि ’हा असा दुरावा किती म्हणुन सोसावा ? रे वार्‍यावाचुन जीव कसा वाचावा ? कवयित्री योगिनी जोगळेकर यांनी शव्दबद्ध केलेली ही विरहव्यथा, आंतड्याला पीळ पाडणार्‍या, तेवढ्याच भावविभोर सुरांतून गजाननराव वाटव्यांनी श्रोत्याभिमुख केली.. अनेक वर्षांपूर्वी. जुळण्यांत आनंद आहे पण तुटण्यांत नाट्य आहे. (विधान जरा ’क्रूर’ आहे पण खरं आहे). पाहा ना ! रामायण, महाभारत किंवा अन्य कुठलही महाकाव्य...त्यांतून ’तुटणं’ विरह’, 'दुरावा' काढून टाका..आणि बघा ते वाचायला आवडतं का ते ? जुळणं आणि तुटणं, सहवास आणि दुरावा, बरसण आणि ओसरणं...हे दोनीही हातांत हात घालून चालतांत नेहमी. एकमेकांच्या सावली सारखे ’विरले सगळे सूर तरीही (किंवा ’तरी, ही’), उत्तररात्र सुरेल ओसरल्यावर आपण सजणे अशीच ओलं उरेल’ पुळणीच्या अवती भवती रेंगाळत, खारं वारं कानांत भरून, Romantic गोव्यांतल्या सागरतीरी तारुण्य व्यतींत केलेल्या, बाकीबाबांना, आलेली लाट (बंगालींत लाटेला ’कल्लोळ’ म्हणतांत. डोळ्यासमोर आणा लाट, आणि पाणी कसं ’लोळ’ण घेत किनार्‍यावर, ते जाणवेल तुम्हाला..) आणि ती ओसरल्यावर किनार्‍यानं धरून ठेवलेला ओलावा, ’शृंगारोत्तर’क्षणांच वर्णन करायला चपखलपणे न वापरला तरच नवल... -कविवर्य ’बाकीबाब’ बा.भ. बोरकर, एक जबरदस्त आशावाद आयुष्याच्या अखेरपर्यंत वागण्या बोलण्यांतून, अक्षर-शब्दांतून उधळणारे ’बाकीबाब’ यांच्या कवितेंतली ही ओळ. संगीतकार चंद्रशेखर गाडगीळांनी त्याच एक सुंदर गाणं केलय‌.. पंचवीस तीस वर्षांपूर्वी... अशाच विरहव्यथेवर किंवा ’तुटण्या’वर, बोरकरांनी आणखी एक कविता लिहिली आहे, तू गेल्यावर फिके चांदणे, घरपरसूंही सुने सुके मुले मांजरापरी मुकी अन्‌ दरदोघांच्यामधे धुके.. गहिवरल्यानं, ’दहिवर’ल्या पांपणीकाठांचं किती सार्थ वर्णन !! सहचारिणी ’गेल्यावर’, दुरावा जाणवायला, जाळायला लागल्यावर, मनाच्या तळांतून आक्रंदत उठलेले शब्द... कवितेचा आस्वाद घेणारा रसिक श्रोता, ती वाचतांवाचतां, नकळत त्या वातवरणांत दाखल होतो आणि त्यांतल्या ’दाहकते’चा अनुभव घ्यायला लागतो...पांपणीकांठ पाणावतांत, गळा दाटतो, हुंदका प्रकट होवू बघतो, भावुकभावुक होत ’कच्च्या’ अल्वार मनाच्या रसिकांच्या मनांत ’कसं सोसलं असेल, या ’गृहस्था’नं हे सगळं ?’ असे सहानुभूतीपूर्वक तात्कालिक, व्यर्थ प्रष्ण, (खरंतर) उगाचच उभे ठाकायला लागतांत... तोच !! शेवटच्या दोन पंक्ती, (कधीच लिहून मोकळे झालेले, आणि गंमत बघायला सज्ज झालेले) बाकीबाब...एक मस्त, ’गुगली’ टांकतांत, त्या ओळींमधे...शेवटी ! एक ’प्रौढत्वी’सुद्धा जपलेला बालसुलभ ख्ट्याळपणा, ’एक ’मिश्किल’ खोडसाळपणा यामधून उद्भवलेला ’गुगली’...: ’तू गेल्यावर दोन दिसांतच जर माझी ही अशी स्थिती, खरेच मग गेलीस सखे तर होइल माझी काय गती ?’ म्हणजे ? हो ! अहो, म्हणजे पत्निविरह हा, तिच्या माहेरपणामुळं वाट्यास आलाय कवीच्या..ती कांही ’तशी’ ’गेलेली’ नाही. झाली की नाही गंमत ? ओलावल्या पापणी कांठी एक खजील स्मितहास्य फुलविण्यांत ’बाकीबाब’ किती बाकबगार (वकूबगार ?) आहेत हे पटलं की नाही ? वपुंच्या ,सुरुवातीला हलक्याफुलक्या प्रसंग, संवादांतून फुलत जाणार्‍या कथा शेवटी शेवटी, हुरहुर लावणारी करुण झलर लेवून, अस्वस्थता मागे ठेवून जातांत. तसच पुलंचा नारायण किंवा अन्य कांही ’वल्ली’ व्यक्तिरेखाही त्यांच्या अंतर्मनांत कुठेतरी, अदृश्य, अनामिक चुरचुरणारी जखम, आंतल्या तोंडाच्या गळवासारखी ठुसठुसणारी, घेवून वावरत असतांत, किंवा कानेटकरांच्या ’लेकुरे उदंड झाली मधला, श्रीकांत मोघ्यांनी त्यांच्या अभिनयानं अजरामर करून ठेवलेला नायक...’ या गोजिरवाण्या घरांत माणसांना लागलय खूळ, कारण ? यांतली गोम अश्शी आहे की, आम्हाला नाही मूल..’ म्हणतांना प्रेक्षागृहांतल्याअ सन्नाट्याला मूकपणे, नि:शब्द ’बोलक’ करतो. त्याच्या बरोब्बर उलटी अशी बोरकरांची ही कविता... अखेरीस, ’फसल्या’चाही आनंद देणारी... *****

No comments:

Post a Comment