Friday, May 18, 2012

’सगळंच अनाकलनीय...

’सगळंच अनाकलनीय...’ ’नंदभवन, नंदलाल, ठुमक चलन लागे । पीछे माँ यशोमती बाबा नंद आगे ॥ पंडित नरेंद्र शर्माजी यांच्या लेखणींतून स्रवलेलं हे कौतुकामृत. आपल्या देशांतल्या, ’माय मरो पण मावशी जगो’, या संस्कृतिचा पुरस्कार करणार्‍याच आहेत. गोपाल जरी ’देवकिनंदन’ असला तरी, ’कंस मामा’ला भाचरांपासूनचे ’भय’इथंले संपत नाही’ या भयगंडानं ग्रासल्यामुळे, आपल्या सख्ख्या बहीण-मेव्हण्याला कैदेत टाकण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. मग वसुदेवानं आपल्याच गोंडस, गोजिरवाण्या तान्ह्या...कान्ह्याचं तुरुंगांतून, ’तस्करी’ करून दुथडी वाहणार्‍या यमुनेच्या पात्रांतून, डोक्यावरच्या टोपलींतून, पैलतिरावरच्या गोकुळांत नेऊन, नंद-यशोदेच्या पदरी दिल, ही कथा आपल्या सगळ्यांनाच कांही नवी नाही. नॅट्‌ वाईल्ड्‌ वर परवा एक अद्वितीय दृश्या बघितलं. एका चुत्यानं एका भल्या मोठ्या ’हुप्प्या’चा, पाठलाग करून त्याला पकडत त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि नंतरचं दृश्य इतकं मन हेलावून टाकणारं होतं की, जगणारे सर्व प्राणिमात्र..मग ते हिंस्र, वन्य, जंगली ’असंस्कृत’ असले तरी ’कणव’नावाची भावना उपजत असते याचं प्रत्यंतर मिळावं. ज्याला भक्ष केलं त्याच्याच बछड्याला हे चित्ता महाशय..बहुधा चित्तीण’ असावी...इतक्या हलक्या ’पंजानं’ खेळवत होती, त्याला लांडग्यापासून वाचवत होती, ते फांदीवरून पडायला लागलं, तर त्याला सावरत होती... क्या बात है ! इथं, ’माय’ मारून, ती ’वाघाची मावशी’ त्याच ’माय’च्या ’बच्चू’ला जगवीत होती. हे सगळं वाचलं, बघितलं, स्मरलं की वाटतं की बालकांचा ’लैंगिकछळ’ वगैरे कल्पित-कथा असाव्यांत.. पण नाही...हा छळ थांवविण्यासाठी ’कायद्याचा आसूड उगारायची वेळं न्यायासनाला भासायला लागली... मुळांत, ’उत्क्रांत’ माणूस क्रूर असतो का ? हो ! तो श्वापदांइतकाच क्रूर असतो..Virtue of an 'Animal instinct'...आणि संस्कृती’च्या कमाई बरोबरच, श्वापदांमधे, अपवादानचं आढळणार्‍या विकृतीचं माप अगदी पुरेपूर वागवत असतो तो त्याच्या अंतर्मनांत..माणूस विनाकारणसुद्धा हल्ला, खून करतो...Cold blooded killing. रामन राघव, जक्कल..सुतार..शहा...ही धडधडींत उदाहरणं आपण बघीतली आहेत. हेतू ? केवळ,माथेफिरूपणा, दुसरा जीव तडफडत असतांना तो बघत ’आनंदॊत्सव’ साजरा करणारा माथेफिरूपणा...जो सहसा श्वापदांत आढळत नाही...भरल्यापोटी कुठलाही ’हिंस्र’ नख लावत नाही....’विकृती ही माणसाच्या मेंदूची उत्क्रांतावस्थेतली ’कमाई’...जसं हसता येण हे पण केवळ माणसालाच शक्य तद्वतच...दुसर्‍या रडवितांना खूप हसणं...हे ही ! माझा एक मित्र आहे. श्रीकांत गद्रे. पुण्यांत तो बालकं-पालकांच्या मानसिकते बाबत, शैक्षणिक असोशी, रुची, आस्था जाणिवांबाबत नवनवीन प्रयोग सातत्यानं करीत असतो. त्यानं मला एक गमतीशीर खेळ, त्यानं स्वत: प्रयोग करून बघितलेला...मला सांगितला. खेळाचं स्वरूप होतं स्पर्धेचं ! कसली स्पर्धा ? तर पालकांची स्पर्धा. एका सभागृहांत त्यानं बर्‍याच पालकांना निमंत्रित केलं. स्पर्धेचं स्वरूप सांगितल्यावर सगळ्यांचाचं उल्हास, उत्साह वाढून सगळे एकदम ’सजग’ झाले. पालकांच्या बसायच्या जागेपासून साधारण शंभर फुटांवर एक सुतळी आडवी बांधून तिला असंख्य छोटे दोरे बांधले होते. स्पर्धक पालकांना, प्रत्येकी ओजळभर फुगे दिले होते. पालकांनी, आधी फुगे फुगवून, धावत जावून, ते त्या सुतळीला बांधून, धावत परत येणे आणि नंतर आयोकांकडून मिळालेली टाचणी घेवून, परत पळत जावून, आपणच किंवा इतरांनी फुगविलेले फुगे फोडणे...अशी स्पर्धा होती. आधी ’जोडायची’ आणि नंतर’ तोडायची स्पर्धा ! मंडळींना, फुगे फुगवायला जेवढा वेळ लागत होता त्याच्या एक दशांशापेक्षा कमी वेळ फुगे फोडायला लागत होता आणि फुगा फुटला की मोठ्यानं, स्वत:च्या ’निर्घृण’कृतीवर ’बेहद खुशी मनाते हुएं, खिदळत, किंचाळत होते. निष्कर्ष ? घडविणं अवघड पण बिघडविणं सोपं.. आणि विध्वंस, दुसर्‍याचा, आनंददायी असतो... अगदी गंमत म्हणून, आणखी एक सर्वपरिचित उदाहरण:...’तान्हा’ जीव उभं राहायला लागला की पायाखाली असते भूमी, अवनी, माती जिच्यां कणाकणांतूनच त्याची ’जडण घडण’ झालेली असते... आणि मग एखाद्या ’जीव घेण्या, जल-संकटांत’, जन्मदात्री माता त्याच तान्ह्याला पायतळी ठेवून, स्वत:व्हा जीव वाचवू पाहाते ! जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ॥ एका निरागस, निर्मळ, हळव्या मनाच्या सहृदय संतश्रेष्ठानं मागितलेलं ’दान’... पण साप विंचू त्यांचा ’विष’भाव त्यजतील ?...ते तर स्वसंरक्षणाचं साधन... भीती किंवा क्षुधा शमनार्थ वापरायचं शस्त्र...पण भरल्यापोटी, भयमुक्त वातावरणांत, केवळं करमणूक म्हणून ’हिस्र’ उद्योग करणार्‍या माणसांसाठीच केवळ हे दानं त्या संतशिरोमणीनं मागितलं असावं, बहुधा.. *****

No comments:

Post a Comment