Monday, September 17, 2012

’कुणाला काय हो त्याचे...’

सदर चित्रांत एक कष्टकरी...बिनचेहेर्‍याचा, आपल्या सायलल्‌वरून विटांचा अक्षरश: ढिगारा घेवून चालत चालला आहे.. ’चित्रिका’ २३-०९-१२ साठी मजकूर.. (तुषार जी कृपया) ’कुणाला काय हो त्याचे...’ दुचाकिने वाहताहे कुणाचे हा ओझे ऊन तापलेले, ’मुका’’दम’ पोळी भाजेथेंब थेंब उतरतो घामाचा भुईंत कोंभ अंकुरला, वर येई तरारत मात्र कणसाचे भरल्या वेगळेच राजे... कुणासाठी घरे यांनी बांधावी ? कशास ? दमा, क्षयासाठी नसे दया-क्षमा ’त्यां’स कुणाच्या दारी हो तोरण ? सनई बेंडबाजे... ’ओझे’ ? अंहं ! आहे ही तर ’भाकरीची कथा’ कच्च्याबच्च्यांसाठी पोटी गिळायाची व्यथा तव्यावरी हात जरी माउलीचा भाजे.. कधी ऊन, थंडी, वारा कोसळती धारा, सोसतं मुक्याने, नाही टाकायाचा ’भारा’ मिळवाया होवे, ’त्यांनी’ वांछिलिये जे जे... ओढायाची अशी रोज थकली पाऊले, बाळघास देतादेता चिउले, काऊले थकल्या ’बापानं’ श्वास राखला पाहीज... घरी उफाड्याची वाढे न्हातीधुती पोर डोरल बांधेपातूर जिवालाहे घोर टवाळांना दूर ठेवू कोणत्या मी काजे ? आम्हा नसे हसूं रडूं नसेच चेहरा हातापायावर फक्त टरारल्या शिरा भावभावना ? कसल्या ? काळीजचं(काळजीचं?) थिजे मात्र एक घ्या ध्यानांत, लई झालं आतां ! कुठवर रडायाची वेदनांची गाथा ? ’अंगार’ल्या मनांत, रुजती बदला(बदल्या?)ची बीजे... निवार्‍याला घराचा आकार देण्यासाठी, भाजलेल्या विटा’ वाहून जळलेल्या संवेदनांमुळे, जगण्याचा ’वीट’ आलेल्या त्या बिनचेहेर्‍याच्या ’माणसा’(?)ची कथा सांगतय हे चित्रं ? वाहकानं या भाजलेल्या विटा वाहत कुठल्यातरी गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पासाठी मदन मोहन लता या स्वरद्वयीनं अजरानर करून ठेवलेली एका चित्रपटांत्ली गझल, रस्मे उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे त्यांतला एक शेर आजकाल क्षणोक्षणी रोजमरा क्र्र जिंदगी अडखळत, चाचपडत, ठेचकाळत...मरणं सोप नाही म्हणून...जगू पाहाणार्‍या सर्वसामान्याच्या, अंधारी येणार्‍या डोळ्यासमोर तरळत असतो बोझ होता जो गमोंका, तो उठा भी लेते जिंदगी बोझ बनी तो, उठाएं कैसे असा प्रष्ण पडलेल्यांना, या चित्राचा बिनचेहेर्‍याचा नायक म्हणजे एक उत्तरच आहे... ...ठिगळं लावलेल्या धडुत्याच्या झोळींत, कमरेला किंवा पाठीवर तान्ह्याला बांधून, दहा बारा विटा लोखंडी घमेल्यांत घेवून, डोईवर ठेवून चालणारी माउली आणि त्या विटा एकावर एक रचत कोणा अनामिकासाठी घरकुल साकारणारा गवंडी, दार, खिडक्यांच्या चौकटी बनविणारा सुतार, किंवा एखाद्या बॅंकेत निर्विकार चेहेर्‍यानं, नोटा मोजत त्या ग्राहकाला देणार्‍या किंवा त्याच्याकडून घेणार्‍या कर्मचार्‍याला पाहिलं की मला, ’इदं न मम’ असा मंत्रोच्चार करीत अग्नीकुंडांत हवन देणार्‍या ऋषी-मुनींचीच आठवण येते. पाठीवर लाठ्या किंवा छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलणार्‍या क्रांतिकारकांइतकेच हे कष्टकरी निरपेक्ष नवनिर्माणाच्या वारीतले वारकरी नव्हत काय ? पाठीवरचं छकुलं मोठ होवून रांगत, दुडुदुद्डु धावत, आधी झोपडींत आणि नंतर आई-बापाच्या घामानं पक्क्या होत जाणार्‍या भिंती उभ्या राहिल्यावर त्यांच्या आड स्वतंच जग निर्माण करून आनंदविभोर होईस्तो, त्याच्या प्रस्थानाची वेळ येते. आणि मग, ’आपण इथून का जायचं ? कुठं ?’ असा केविलवाणा प्रष्ण व्यथित विस्फारलेल्या नजरेंत घेवून, एकदा आई-बापाकडं आणि एकदा त्यांनीच उभारलेल्या दिमाखदार इमल्याकडं बघत, त्यापासून दूरदूर खेचत नेल जाणारं ते बाललेण दिसू लागतं आणि गलबलत काळजांत ! दररोज कोट्यवधींच्या रकमा हाताळून, घरी आल्यावर, संसाराच्या रामरगाड्यांनं क्लान्त भार्येनं, फुटक्या कपातनं दिलेला चहा, तितक्याचं थकलेल्या आणि निर्विकार चेहेर्‍यानं,मुखावाटे पोटांत ’ढकलणार्‍या कर्मचार्‍याचीही तीच की हो कथा ! ’भाळी कोरले कुणाच्या कुणाचे गोंदणं कुणा काय त्याचे आणि काय देणं घेणं’ **** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment