Tuesday, September 18, 2012

’पोटासाठी काहीही’

सदर चित्रांत एका ट्रक्‌च्या चाकाचे Nut-bolts पहारीच्या साहाय्यानं आवळणार्‍या ’पति-व्रता’ दिसते आहे.. ’पोटासाठी काहीही’ पोटासाठी काहीही, ना मागे हटणार तसुभरही तळहाताला येत्यांत फोड, सगळी भुकेसाठी तडजोड मालक ’ते’ पन अस्तुरि मी, अन्‌ तान्ह्याची बी मी आई दोघांनाबी हुर्द दिलय, जीवापाड प्रेम केलय मनगटि माझ्या वज्रचुडा, डोइवर पदराचा पहारा खडा पिंजर रेखुन भाळावर, गाडी आणणार रुळावर कैकयि जगतेय युगायुगांत, समानतेची गीतं गात सात हजार वर्षांपूर्वीच्या रामायण कालादरम्यान रघुकुलांतल्या राजा दशरथाच्या महाराणी कैकयीचंच उदाहरण कशाला ? कारण तिची भूक तिच्या पदाप्रमाणेच खूप मोठी होती. सर्वसामान्यांचीधडपड चालू असते ती सकाळ संध्यालाळच्या दोन घासासाठी स्वत:च्या आणि बायको पोरांच्या.. तुलनेनं अगदी अलिकडच्या काळांतली कितीतरी उदाहरणं आहेत, नवर्‍यानं अंगिकारलेल्या व्रतांत तनमनानं समर्पण करीत अजरामर झालेल्या ’पतिव्रतां’ची...हो..हो ! प्राचार्य राम शेवाळकरांची हीच व्याख्या आहे, ’पतिव्रता’ या शब्दाची.. ! पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, या बरोबरच वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे, स्वातंत्र्य लढ्यांतले चाफेकरबंधू, क्रांतिकारक पतीला, ब्रिटिश राजवटींत, तुरुंगात माती कालवलेल्या पिठाची भाकरी खावी लागते म्हणून, घरी स्वत:च्यासाठी माती कालवलेली ’रोटी’ करून खाणारी पंजाबातली राजबन्स कौर..अशा पतिकर्तृत्वाच्या वटवृक्षाच्या पसार्‍याला घरांत त्यांचे संसार मूकपणे विनातक्रार सांभाळत, अनामिक राहून ’बळ’कट करणार्‍या अनेक वीर-पत्नी...फार काय गोवा मुक्ति लढ्यांत, खांद्याला खांदा लावून लढणार्‍या पंडित महादेवशास्त्री जोशींबरोबर सौ. सुधाताई, पंच्याहत्तर ते सत्त्याहत्तरमधे आणिबाणीविरोधी लढ्यांत, प्राध्यापक मधू दंडवतें बरोबर सौ. प्रमिला ताई, आंतरराष्ट्रीय स्तरावर, वर्णद्वेषविरोधी लढ्यांत दक्षिण आफ्रिकेंत नेल्सन्‌ मंडेलांबरोबर विनी मंडेला... किती किती म्हणून उदाहरणं द्यावींत ? पण तरीसुद्धा ही सगळीच असामान्य व्यक्तिमत्व. पण प्रत्येक सामान्यांतसुद्धा असामान्यत्वाचा एक स्फुल्लिंग दडलेला असतो.योग्य वेळ येतांच त्या ठिणगीचा भडका उडतो.. जिणं जगतांना अडचण ठरणार्‍या, अपमान निवारण, अन्याय निराकरण, गुंडशाहीच्या प्रतिकारार्थ आदि ’सामान्य(?)’ कार्यांसाठी. आणि तसंसुद्धा, सगळेच जर असामान्य झाले, ’चला कल्पतरूं’च्या ’आरवा’प्रमाणे, तर ’असामान्यत्वा’ची गरजच भासणार नाही, नाही का ? असो नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा ! हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण चित्रांतल्या कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणार्‍या महिलेप्रमाणं, वर्षभर उन्हातान्हांत, थंडीवार्‍यांत, पावसापाण्यांत, काळ्या आईची मशागत करीत, कृषिवल पतीबरोबर खपलेल्या कारभारणीच्या मनांत, दाण्यावर आलेल्या, वार्‍याच्या झुळुकेवर डोलणार्‍या कणसावर स्वत:च्या छोट्याछोट्या आकांक्षा, स्वप्न झोके घ्यायला ठेवत, ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार... मग तिनं, का नाइ म्हणावं... पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान, वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान, दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर, गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर, सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी, पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी, कधीपासुन टोपपदरी घ्याव वाटतय मनांत बैलजोडी आणत्याल नवी तवा सांगन ’त्यांच्या’ कानांत, लेक लई हुश्शार माझी, तिला कराय्‌चिये डॉक्टर, पोरं चढविल झळाळ, खंबीर वाश्यांच्या घरावर या दुर्दम्य आशावादाला सर्वथ: फलद्रूप करूं पाहाणारं अगदी चपखल दृश्य आहे की नाही वर दिसणार्‍या चित्रांत ?

No comments:

Post a Comment