Thursday, September 27, 2012

’You just wait'

सदर चित्रांत एक पोक्त ग्रामीण महिला , सराइत चालकासारखी ’बाइक’वर स्वार झालेली दिसते आहे.. ’You just wait' डोरलं बांधलं मला तवा व्हती म्या झोळींत बोहल्यावर म्हणे नेलं, मामानं हातावर झेलित इवल्याश्या भाळावर एवढा मोठा टिळा, कुड्याबुगड्या कानी नी गळ्यांत बोरमाळा टिळ्यावर मायेनं रेखली लाल चिरी ल्यायला दिला परकर नि पोलक भरजरी, जरा चालायला लागल्यावर पांगुळगाडा आला धरभर आन्‌ वावरांत माजा राबता सुरू जाला पर बैलगाडीची मज्जा काय औरच अस्ती बाबा ’हुर्रर्र हुर्रर्र सर्ज्या-मौज्या’ आरडत पळवायचे आबा परकराचा वरती, शिस्तित कांचाबीचा ,मारून हिंडत व्हती नंतर म्या, सायकलवर टांग टाकून, माय कवतीकानं म्हनं, ’गांवभर उंडारती’ भ्या वाटतं.. बघुन कुनाकडं बी हासती..’ म्या म्हनं, ’राजपुत्र येनार घोड्यावर, बसवुन माला फुड्यांत, शर्यत वार्‍याबरूबर, खरचं आला एक दिशी, मनांतला राजा संग बाइकबाई,म्हनं, ’करतू वावरांला ये-जा’ सवतापाठी, ’बस’ म्हन्ला, ’चल जत्रंला जाऊ, सवतीपाठी बसून म्ह्न्ले, ’बाई तुझी पाठ लई मऊ !’ पडली माझी पावल कधीच जिमिनीवर न्हाईत असा थाट बाई, कुनाला सोपनांत तरी म्हाईत ? फटफटीवर बसून आंता जाते कुटं बी थेट विमानसुद्धा उडवन बरं, You just wait.. You just wait.. पुण्याची, दक्षिण ध्रूवावर Parajumping करणारी पहिली महिला शीतल महाजन, अंतराळ काबीज करू पाहाणार्‍या कल्पना चावला, सुनिता विल्यम्स्‌, यांच्या आयांनी पण ’पोटूशा’ असतांना अशीच स्वप्न पाहिली असतील कदाचित. शारीर सौंदर्य, नजाकत, वृत्तीनं सहनशील, परावलंबी, सेवाभावी वगैरे केवळ यांच विशेषणांचं सगुण-साकार रूप ही स्त्रीची प्रतिमा होती एकेकाळी. ती प्रतिमा पुराणं, इतिहासांत आणि अगदी अलिकडच्या काळापर्यंत अनेक पराक्रमांनी आणि अनेक क्षेत्र सहजी पादाक्रांत करून स्त्रीयांनीच मोडींत काढली आहे हे सर्वज्ञात आहे. अर्थात वेदांमधली पहिल्या ऋचेची रचैता एक स्त्रीच होती हे इथं विशेषत्वानं नमूद करायला हवं ! अपाला तिचं नांव.. तेंव्हा, बुद्धीच, सृजनक्षमतेचं माप निसर्गानं स्त्री-पुरुषाला, नर-मादीला अगदी समसमान दिलं आहे. उत्कृष्ट अवधि-नियोजन, मानवसंसाधन व्यवस्थापन, अर्थ पुरवठा नियंत्रण, संगोपन, हे सगळ शिकायचं तर कुणाही यशस्वी गृहिणीकडून शिकांव ! या सगळ्याचं एकत्रित वर्णन करायला, उपमा, विशेषणं, दृष्टांत रूपकं आदि साहित्यिक आभूषण अपुरीच पडतील तरी सुद्धा.. व्याघ्रावाहना जगदंबा, शारदा मोरावरी, महिषासुरारि महाकाली, त्रिशूळ शोभे करी अंबुजवासिनि लक्ष्मी, धनसंपदा नि समृद्धी खल दमना देइ धैर्य, शौर्य, स्थैर्य, बल, बुद्धी अश्या विविध रूपधारिणी स्त्रीचं वर्नन करण्याचा मोह अटळ आहे. आज विविध क्षेत्रांत, उत्तुंग-यशप्राप्त सुकन्या बघतांना, स्त्री-पुरुष भेद किती लयाला गेलाय याची जाणीव क्षणॊक्षणी आपल्याला होतेय. या पार्श्वभूमीवर जवळ जवळ वीस वर्षापूर्वी कधीतरी, स्वत: जवळच्या शब्दसंपदेची परीक्षा घेण्यासाठी मी ही विशेषणांनी युक्त रचना केली. ती,माझ्या आईने वाचली आणि,. शेवट पर्यंत अत्यंत श्रद्धेने आणि माझ्याविषयीच्या कौतुकाने ती प्रार्थना म्हणून वाचायची ! ॥जगदंबा स्तुतिअष्टक॥ प्रकटता तेज । आदिशक्ती बीज । जागेपणी नीज । भेदू पाहे ॥ व्याकूळ व्याकूळ । गर्तेतला तळ । शक्तिसेवा फळ ।उद्धरेल ॥ सत्या, शुभा, सुंदरा । त्रिशुळाच्या तीन धारा । दर्शने देई धैर्या । रिपुदमना ॥ जगदंबा करवीरी । भवानीआई गड शिवनेरी । देवी सप्तसृंगी वणीच्या डोंगरी । झालीये अवतीर्ण ॥ संपदेचे आगार । ज्ञानसमृद्ध भांडार । सारे होतसे असार । मातेचरणी ॥ व्याघ्रारोहि सुंदरी । शस्त्रां धरुनी चारहि करी । दैत्य निर्दय, अविचारी । संहारितसे ॥ दाही दिशा भरूनि राही । पंचमहाभूतांचि माय होई । त्रिकालाबाधित निवारा देई । विश्वमाता ॥ हे ऐसे स्तुतिअष्टक । शाब्दी श्रद्धामूल सार्थक । सदा देवो सारासार विवेक । जगण्यासी ॥ ****

No comments:

Post a Comment