Saturday, September 29, 2012

’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????

सदर चित्रांत एक सद्‌(?) गृहस्थ त्याच्या चलत्ध्वनिसंचावर छायाचित्र काढीत आहेत रस्त्यावर उभे राहून.. आणि त्यांचं चार-पांच महिन्याचं बछडं त्यानं आपल्या पायाच्या गुडघ्यांत दाबून धरलं आहे.. केवळ अतर्क्य दृश्य... ***** ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’ अरं काय ल्येका, काय तुझं चाललय काय ? असं काय आक्रित तिकड घडतं हाय ? नाय काढला फोटू तर फासावर जाशिला ? द्येवाला पायी घालतोस ? पाप कुठं फेडशिला ? ’असं पुन्हा दिसणार नाही’ म्हनतुयास निर्लज्जा ? मानूस नावाच्या श्वापदा तुला कुठली द्यावी सजा ? काय मानूस हैस की कोन ? ’गोंडस’ धराया पाय ? कोल्ही कुत्री सुद्धा तुला क्षमा करायची नाय दोन घडीचा डाव मांडून मोकळ होवू नका, जबाबदारी घ्या ! वर करूं नका काखा पायांत छान वाळे, कानटोपी डोईला ’कवळा’ कुठल्या भरवशानं तुला सोपिवला ? जस पेरशिला तस उगवल, माती-मायचा नियम हे सूत्र कोरून ठेव हृदयांत तुझ्या कायम ? असल्या अपेष्टांतनं जर झालाच उद्या मोठा, फोटो पाहून नक्की हानल डोस्कित तुज्या सोटा पाहिले असले बाप, आपल्याच शौकांत सदैव मश्गुल, काळीज, काळजी नाही, यांचा वंश ’काजळी-कुल’ असलं कांही अतर्क्य केल्याशिवाय आपली नोंद कुणी घेणार नाही आणि आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही, असं या सद्‌(?)गृहस्थाची धारणा असावी बहुधा ! यापेक्षा Child abuse आणखी काय वेगळी असते ? कसली नाती अन्‌ कसलं काय ! ’जिव्हाळा’ चित्रपटासाठी अण्णांनी,,कै.ग.दि.माडगुळकरांच्या सिद्धहस्त लेखणींतून...अहं...कुंचल्यांतून अवतीर्ण झाले्ल्या, स्वरमांत्रिक कै. श्रीनिवास खळ्यांनी नादमधुर केलेलं आणि कै. बाबूजी..सुधीर फडके यांच्या भावविभोर कंठांतून आळवलं गेलेलं गीत.. त्याचं ध्रुपद आठवतं...’लळा जिव्हाळा शब्दचं खोटे, मासा माश्या खाई..कुणीकुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’... मी गदिमांचा ’कुंचला’ म्हटलय आधीच्या ओळींत.. कारण अण्णांचं प्रत्येक गीत हे एखाद्या जिवंत , सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यांतल्या कडू गोड अनुभवांचा प्रसंगाचा पुन:प्रत्यय देणारं, चित्रदर्शी शब्दांकन असायचं.संदर्भाधीन छायाचित्रांतल्या ’माणसा’सारखी माणसं (?), संवेदनशील कविमनाला सृजनहेतु सजग करत असली तरी दिसणार कृत्य हे निंदनीयच ! या गीतांतलं वास्तव..’मासा माश्या खाई’ हे कांही फक्त विशिष्ट जलचरांपुरतच मर्यादित नाही तर तो केवळ एक दृष्टांत. बुडणार्‍या माकडिणीच्या नाकांपर्यंत पाणी आलं की, पिलाला आधी कडेवर नंतर, त्याला वाचविण्यासाठी डोक्यावर घेणार्‍या मादीच्या काळजांतली ’माय’ स्वरक्षणहेतु, अखेरीस, त्याला पायाखाली घेत दोन इंचांचा आणि क्षणांचा अतिरिक्त अवधी मिळवू पाहातेचं, हे एक जागतिक सत्य.. जसं कै. ’ग्रेस्‌’ माणिक गोडघाटे यांच्या कवितेंतली संकल्पना ’भय इथले संपत नाही’..पटतय ? हे भय मरणाचं, ’असणं’ नष्ट होण्याचं, विलयाचं आणि भुकेसाठी ! भूक ? जगण्याची, जगण्यासाठी कांहीही करण्याची.. आणि या भुका तरी कसल्या ? मनाच्या शरीराच्या ? संस्कृत ? विकृत ? ही विकृतीचं प्रकृती होऊ लागली तर ? अनेक वर्षांपूर्वी, पुण्यांत एका परित्यक्ता-आधार-गृहांत. मुलाखत चित्रित करीत होतो मी, १/२ इंच्‌ ओपन्‌स्पूल्‌ टाइप्‌ व्हिडिओ रेकॉर्डर्‌वर, कृष्ण-धवल ’दूरदर्शन’ साठी... वीणा...वीणा देव विचारित होती एका पीडित तरुण मुलीला, ’काय झालं बाळा ? काय घडलं ?’ त्या मुलीनं कांठोकाठ भरल्या डोळ्यानं आणि दु:खानं ओघळणार्‍या अश्रूंनी ओले झालेले गाल पदराच्या शेवानं टिपत, वीणाकडे असं काही पाहिलं की मला ते क्लोज्‌अप्‌ मधे व्ह्यू फाइंडर्‌वर दिसल आणि माझा बुबुळांवर पण नकळत धुकधुकं झालं आणि फोकस्‌ कळेना.. ’काय आणि कसं सांगू ताई ?’.. तरुणीच्या ओठांतून अस्फुट शब्द..अर्धवट वाक्य बाहेर पडलं, ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’

No comments:

Post a Comment